स्वत: विषयी थोडेसे…ब्लॉगविषयी बरेचसे

हा ब्लॉग वाचून तुम्ही काही प्रश्न मनात घेऊन इथे आले असणार त्यातल्या काही संभाव्य प्रश्नांची उत्तरे देतो.

कोण तुम्ही ? काय काम करता ? पोटापाण्याचा उद्योग काही?
माझे नाव अनिकेत कवठेकर. मी टेक्निकल रायटर आहे गेल्या १३ वर्षांपासून, अर्थातच IT मध्ये. मुळात मी अभियांत्रिकीची पदवी घेतली व नंतर लिखाणाचा किडा स्वस्थ बसू न देत असल्याने सिंबायोसिस मधून पत्रकारिता शिकलो. कारण हेच की लेखक व्हायचं. पण लेखक व्हायला कॉलेजला जावं लागत नाही, हे दोन वर्षे कॉलेजला गेल्यावर कळलं. मग पत्रकारितेच्या Internships केल्या. त्यात पत्रकारिता हे आपलं फिल्ड नाही हे कळलं. मग चुपचाप IT मध्ये शिरलो. मार्केटिंग कम्युनिकेशन, कंटेंट रायटिंग, टेक रायटिंग केलं. नमनाला घडाभर तेल झालं. असो.

[responsivevoice_button voice=”Hindi Female” buttontext=”ही पोस्ट इथे ऐकू शकता..जरा हिंदी टोन आहे पण वाचायचं तरी टळलं!”]

मग हे काय खूळ काढलंय ? बसा कि गप आता. भौतिकशास्त्र आम्हाला आधीच छळून गेलंय. आता पुन्हा तेच कशाला? ते पण मराठीत?
हो, सांगतो. Physics तसा माझा आवडता विषय, ११वी-१२वी ला. पण १२वी मध्ये scoring महत्त्वाचे असल्याने विषय आवडला नाही तरी चालतो, प्रत्येक Topic चं वजन मार्कात तोलायचं आणि तो तेवढाच ‘घासायचा’ असा प्रघात असल्याने तसा प्रयत्न केला. पुढे अभियांत्रिकी (engineering) ला गेलो. तिथे physics चा नातलग mechanics सामोरा आला. त्याचा तर पोरांना एवढा धसका की काहींचा न ‘सुटल्याने’ वर्ष राहिली, काहींनी जीव दिला. त्याची पुस्तके म्हणजे दिव्य प्रकार. थातुरमातुर ‘थिअरी’ उरकून डायरेक्ट ‘प्रॉब्लेम’ सोडवायला घ्यायचा. पदवी पातळीलासुद्धा मुलांना जरा गोडी लागावी असा प्रयत्न नाही. चांगल्या विषयाशी मुलांचं शत्रुत्व होतं बळंच. पण mechanics किंवा पर्यायाने physics हे विषय मुळात खूपच मजेशीर आहेत, जितके वाईट किंवा रटाळ वाटतात तितके तर नक्कीच नाहीत. त्यांचा उबग आणण्यात शिक्षक(म्हणजे लेक्चरला बसला असाल तर..conditions apply), ११-१२वी ला physics कडे केलेलं दुर्लक्ष किंवा ते झेपलेलं नसणं, केवळ sums वर दिलेला भर आणि english भाषेशी न जुळलेले सूर..ही अनेक कारणं..आणि हो..याविषयांची पुस्तकं सुद्धा sums नी ओसंडून वाहत असतात संकल्पना समजावून सांगण्यात ती कमी पडतात.

तुम्हाला हे का लिहावंसं वाटलं?
म्हणूनच म्हटलं की चला ह्या विषयांवर जरा मराठीत लिहू. मी शास्त्रज्ञ नाही, माझा engineering चा प्रवास पु.लं. च्या शब्दात ‘खडतर’ असाच होता. अगदीच चघळून राहिलेला चोथा शिल्लक असलेली पुस्तकं वाचून engineering च्या मुलांचं डोकं भणभणतं. म्हणून मराठीत तोच गोषवारा रंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतोय. विषयाची नावड कमी करायचा एक प्रयत्न. (Theory चं Brilliant Jigar समजा!)

मराठीतच का लिहिलं? नसता उपद्व्याप?
मराठी माझी मातृभाषा आहे, तशी लाखो लोकांचीही आहे, (त्यात तुम्हीपण आलात.) एवढंच नाही तर मराठी ही ज्ञानभाषा आहे.(दुसरी फ्रेंच.)..त्या भाषेतील आशय वाहून नेण्याची क्षमता अथांग आहे. आणि बरंका ..English मध्ये already इतकंऽऽऽ लिहून ठेवलेलं आहे या विषयातलं..म्या पामराने त्यात अजून काय भर घालावी?

Focus काय या लेखांचा?
सुरुवातीेला mechanics साठी लागणाऱ्या संकल्पना मांडतोय विक्रम वेताळाच्या कथारूपात..

कुणाशी share करू ही लिंक?
आवडलं तर engineering शिकणाऱ्या (प्रथम वर्ष)..विशेष करून mechanics ला उबलेल्या किंवा तो विषय राहिलेल्या मुलांना ही लिंक पाठवा. त्यांना नैराश्य येण्यापासून वाचवा.
पण याचा अर्थ असा नाही की engineering शिकणाऱ्यांसाठीच ह्या कथा आहेत. ज्याला किंवा जिला या संकल्पनाविषयी कुतुहल आहे त्यांनी तो जरूर वाचावा.
आवडलं तर कळवा..नाही आवडलं तर जरूर कळवा. कळावे लोभ असावा ही विनंती.

कळावे.
अनिकेत कवठेकर


मूळ लेख: विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात