पदार्थाच्या अंतरंगाचा म्हणजे वर्गीकरण, विशेष व समवाय या अंगांचा परिचय (Getting to the real nature of Padarth by studying its classification, individualities and concommittant relations)

पदार्थाच्या द्रव्य, गुण व कर्म इत्यादि बदलणाऱ्या किंवा अनित्य अंगांची चर्चा तर झाली. पण त्यामुळे पदार्थाची ओळख मात्र नाहीच झाली. उलट केवळ बाह्यांगाचीच ओळख झाल्यामुळे तर अंतरंग काय असेल या विषयी अधिकच उत्सुकता ताणली गेली. हे म्हणजे एखाद्या माणसाची वर वर ओळख झाल्यावर तो जसा दाखवतो तसाच कलाकार आहे का शत्रुराष्ट्राचा हेर आहे हे कळण्याइतकं अवघड पण तरीही अतिमहत्त्वाचं काम. काही अतिशय सुंदर दिसणाऱ्या वनस्पती या किटकांना आकर्षून घेतात व नंतर गिळंकृत करतात. उलट कोरफड, निवडुंगांसारख्या वरवर अतिशय राठ, कोरड्या वाटणाऱ्या वनस्पती आतून असतात ओलसर. सुंदर दिसणारी  फळे विषरी निघावीत व फणसासारखी अतिशय कुरूप फळे आत मात्र गोड निघावीत. असा प्रकार सृष्टीत सर्वत्रच पाहायला मिळतो. तो सर्व बाजूने विचार करतो म्हणजे बाह्य व अंतरंगांचा समतोल समन्वय साधू शकतो तोच पदार्थाला समजू शकतो व त्या पदार्थाची योग्य योजना करू शकतो..

विक्रमाच्या अंतरंगामध्ये असे विचार तरंग उमटंत असताना वेताळाचे धूड त्याच्या खांद्यावर येऊनही पडले. “काय राजा..तू राजासारखाच विचार करणार हे मला माहित आहे. प्रत्येक पदार्थाची तुझा राज्यशकट हाकण्याच्या कामी योजना करणं हा तुझा स्थायीभावच आहे. ते जाऊ दे. मला आज पदार्थाच्या नित्य म्हणजेच न बदलणाऱ्या अंगांची माहिती दे. आणि हो त्यात चांगली उदाहरणेही दे.”

“होय वेताळा..मागे एकदा आपण पाहिलं त्याप्रमाणे प्रशस्तपाद ऋषींनी म्हटलंय..
षण्णामपि पदार्थानामस्तित्त्वाभिधेयत्वज्ञेयत्वानि |11|
To all the six categories belong the properties of being-ness, predicability and congnisability.
पदार्थाच्या साही अंगांमधले साम्य म्हणजे त्यांना अस्तित्व असते, शब्दांत व्यक्त करता येते व ती जाणून घेता येऊ शकतात. नित्य अंगांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास सामान्य म्हणजे पदार्थ कोणकोणत्या गटात मोडतो, विशेष – त्याचं विशेष अस्तित्व काय आणि समवाय – त्याचे अतूट संबंध कोणते या गोष्टी त्या पदार्थाच्या अस्तित्त्वाशी संबंधित आहेत, त्यांना तुम्ही जाणून घेऊ शकता व त्यांचं शब्दांत वर्णन करु शकता.”

“हा समवायित्व संबंध फार महत्त्वाचा दिसतो वैशेषिकांत. पण मग काय या तिन्ही अंगांचे असे अविभाज्य संबंध असतात? शिवाय ही नित्य अंगे संख्येने किती असतात..सोप्या शब्दात सांगायचं तर किती गट पडू शकतात पदार्थांचे? त्यांचे विशेष किती असू शकतात? ”

“वेताळा, प्रशस्तपादांनी सांगितलंय..
द्रव्यादीनां पञ्चानां समवायित्वमनेकत्वञ्च  ||13||
To the five, Substance and the rest, belong the characters of inherability and plurality.
द्रव्ये, गुण, कर्म, गट व विशेष हे संख्येने अनेक आहेत व ते अविभाज्य घटकांचे बनलेले असतात.
याठिकाणी बोलायचं झाल्यास पदार्थाचे वर्गीकरण(classification) तुम्ही अनेक गटांमध्ये गरजेनुसार करू शकता. शिवाय विविध गटांचे व विशेष अंगांचे समवायित्व संबंध अनेक असतात. उदाहरण द्यायचं झाल्यास ‘धातू(metal)’ हा एक गट घेतला तर या गटातील बऱ्याचशा द्रव्यांची समान व अविभाज्य लक्षणे असतात. तन्यता(ductility), वर्धनीयता(stretchebility), विद्युतवाहकता(electric conductivity), उष्णतावाहकता(heat conductivity), चकाकी(glaze) ही बऱ्याचशा सोने, चांदी, तांबे, अल्युमिनियम इत्यादि धातूंची लक्षणे असतात. किबहुना या लक्षणांवरूनच तेथे वर सांगितलेल धातू आहेत हे कळतं. हे झाले गटाचे समवाय संबंध. आता विशेष अंग पहायचं झाल्यास त्या अंगाचा त्या पदार्थाशीच समवाय संबंध असतो. पाणी हे नेहमीच्या द्रव अवस्थेत असो, थंड केलेल्या बर्फाच्या म्हणजे स्थायु अवस्थेत असो किंवा वाफेच्या म्हणजे वायुरूपात..जोपर्यंत पाण्याचा मूलकण किंवा रेणू तिथे अस्तित्वात आहे तो पर्यंतच तिथे पाण्याचे अस्तित्त्व आहे. म्हणूनच विशेष अंग ही त्या पदार्थाची खरी ओळख आहे व त्या पदार्थाच्या रोमारोमांत भरलेली आहे. हा झाला विशेषाचा त्या पदार्थाशी असलेला समवाय किंवा अतूट संबंध.”

“विशेष अंग ही अस्तित्वाची ओळख(unique identity)! मग या गटवारीचे, विशेषाचे व समवाय संबंधांचे काही गुण असतील?”

“नाही वेताळा. पदार्थाचे सर्व गुण हे द्रव्याकडूनच येतात. आधी सांगितल्या प्रमाणे..
गुणादीनां पञ्चानामपि निर्गुणत्वनिष्क्रियत्वे ||14||
To the five, Quality and the rest, also belong the character of being devoid of qualities, and that of being without action.
फक्त द्रव्यांनाच गुण(properties) असतात व त्यांच्याच बाबतीत कर्मे(actions) संभवतात. गुण, कर्म, सामान्य, विशेष व समवाय हे निष्क्रीय असतात व त्यांना स्वत:चे कोणतेही गुण नसतात.”

“आलं लक्षात. आधी द्रव्य ओळखायचं, मग बाह्यांग कळतं. मग त्याच्या गुणाचा व कर्माचा मागोवा घ्यायचा. पण मला सांग की ही ३ नित्य अंगे आहेत – गट, विशेष व समवाय – ती सगळ्या द्रव्यांमध्येच आढळतात?”

“हा खूपच महत्त्वाचा मुददा आहे वेताळा. गट, विशेष व समवाय ही अंगे सर्व द्रव्यांमध्ये असतात. मागील वेळी अनित्य अंगांचा अभ्यास करताना आपण म्हटलं होतं..
द्रव्याश्रितत्वञ्चान्यत्र नित्यद्रव्येभ्य:  ||18||
The character of subsisting in substances (belongs to substances, qualities and actions) with the exception of eternal substances.
द्रव्य, गुण व कर्म यांना फक्त अनित्य द्रव्यांमध्येच आश्रय मिळतो. याचा दुसरा अर्थ हा की गटवारी, विशेष व समवाय ही अंगे नित्य व नित्य दोन्ही प्रकारच्या द्रव्यांना लागू पडतात. म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, काल, दिक्, मन व आत्मा या सर्वांचे आपण गट पाडू शकतो, सूक्ष्मस्तरावर जाऊन विशेष पाहू शकतो. तसेच या नऊही द्रव्यांचे काही ना काही अतूट संबंध असतात.”

“अच्छा म्हणजे तरंगरूप आकाश, काल, दिक्, मन व आत्मा यांचे आपण गट पाडू शकतो?”

“होय वेताळा, तरंगांचे पूर्वीपासूनचे गट म्हणजे शब्द व वर्ण. आता नवीन शास्रानुसार तर त्यांमध्ये अवरक्त(infrared), अतिनील(ultraviolet), विद्युत्चुंबकीय(electromagnetic) असे नानाविध गट आले आहेत. काल व दिक् हे तर तसे नैमित्तिकच असतात. पण तरीही मोजण्याच्या गरजांमधून सूक्ष्मकालापासून दीर्घकालापर्यंत अनेक गट असतात. तेच स्थलाचे, सूक्ष्मापासून, अणूपासून, त्रासरेणू पासून सूर्यादि माहाकाय पदार्थांपर्यंत अनेक गट. तीच गत मनांची व आत्त्म्यांची.”

“विक्रमा या नित्य अंगांमध्ये काही साम्यस्थळे आहेत काय?”

“वेताळा, प्रशस्तपाद ऋषींनी याविषयी एक श्लोक सांगितला आहे..त्यात या नित्य अंगांमधली साम्यस्थळे सांगितली आहेत..
सामान्यादीनां त्रयाणां स्वात्मसत्वं बुद्धिलक्षणत्वमकार्य्यत्वमकारणत्वमसामान्यविशेषवत्वं नित्यत्वमर्थशब्दानभिधेयत्वञ्चेति ||19||
The three beginning with generality have the character of having their sole being within themselves, having Buddhi or the Cognitive Faculty as their sole indicator of not being an effect, of not being the cause, of having no particular generalities, of being eternal, of not being expressible by the word ‘artha’.
सामान्य, विशेष व समवाय ही अंगे स्वयंभू असतात, बुद्धी हेच त्यांना जाणण्याचे साधन असते, ते दुसऱ्या कशाच्याही निर्मितीला कारण बनत नाहीत, त्यांचा विनाश होत नाही व दुसऱ्या कशाही मुळे त्यांना अर्थ प्राप्त होत नाही.”

“उदाहरण दे रे विक्रमा.”

“हे बघ वेताळा, मागील वेळी आपण हत्ती व सिंह यांविषयी बोललो होतो. गट पाहिला तर हत्ती व सिंह दोघेही वन्य पशू. पण त्यांच्या खाण्याचा संबंध आला तर हत्ती शाखाहाराशिवाय काही करणार नाही तर सिंहाची गुजराण मांसाहाराशिवाय होणार नाही. त्यांच्या अस्तित्त्वाशी त्यांच्या या ओळखीचा संबंध आहे. हे झालं सामान्य अंग..ते कळायला सिंहाला प्रत्यक्ष खाताना पाहायची गरज नाही. दुसऱ्या कुणा अधिकारी व्यक्तीकडून ते बुद्धीने जाणता येतं. शिवाय एका विशिष्ट सिंहाला नव्हे तर सर्वच सिंहाना ते लागू होतं. पण त्यामुळे मांसाहार करणाऱ्या प्राण्याला वा पहाणाऱ्याला काही फरक पडला नाही. हे वर्गीकरण आपण आपल्यासाठी केलं. सिंहाचं मांसाहारी असं वर्गीकरण झालं की ते बदलंत नाही. शिवाय सिंहामुळे वर्गीकरणाला काही विशेष अर्थ प्राप्त होत नाही. उलट सिंह मांसाहारी आहे असं म्हटलं की सिंहाला मात्र अर्थ प्राप्त होतो.”



“आता विशेष अंगाचं सांग..”

“हे बघ वेताळा, अनेक गोष्टींमध्ये नीरक्षीरविवेक हा शब्द येतो. म्हणजे मिश्रित पाण्यातून राजहंस पाणी व दूध वेगळं काढतो म्हणतात. म्हणजेच दोन विशेष किंवा दोन द्रव्ये शोधून काढतो. आता त्याच्या पुराव्याविषयी फारसं काही माहिती नसल्याने एक साधा प्रयोग करू..जो गृहिणी रोज करतात..”

“कोणता प्रयोग?”

“वेताळा, घरी येणाऱ्या पाण्यात अनेक वेळा माती मिसळलेली असते. गृहिणी हे पाणी पातेल्यात साठवतात व काही काळ स्थिर ठेवतात. यामुळे होतं काय की पाण्यातील माती ही गुरुत्वामुळे खाली बसते व पाणी काही अंशी स्वच्छ होते. याही पुढची पायरी म्हणजे त्या पाण्यावर तुरटी फिरवतात. ही तुरटी पाण्यातील विरघळलेल्या सूक्ष्मस्थायूंना चिकटते व तळाशी घेऊन जाते. यामुळे वर वर निर्मळ वाटणारे पाणी व खरे शुद्धपाणी यांत फरक ओळखता येतो.”

(photo credit: wisdonsurf.blogspot.com)

“विक्रमा वरील श्लोकाशी या विशेष अंगाचा पडताळा दे..”

“बर..कोणत्याही पदार्थाचा विशेष हा तो पदार्थ जेव्हा आकाराला येतो तेव्हाच बरोबर आलेला असतो. पाण्याचा विशेष रेणू वेगळा. मातीचा रेणू वेगळा. पण तो दरवेळी प्रयोगाने सिद्ध करावा लागत नाही कारण ते अधिकारी व्यक्तींनी पुराव्याने सिद्ध केलेले आहेत. शिवाय हा रेणू स्वत:हून काहीही करायला जात नाही. त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या द्रव्यांच्यावर त्याचे वर्तन बदलते.”

“अच्छा म्हणजे मागील वेळी उष्णता क्षयमान(entropy) म्हटलास तसं..बर पुढे बोल..”

“शिवाय त्या गढूळ पाण्यातून आता तुरटीमुळे पाण्याचा रेणू व मातीचा रेणू वेगवेगळे झाले तरी स्वत: त्या रेणूला काहीच फरक पडला नाही. आधी पाण्याशी संयोग(association) झाला होता, आता वियोग(disassociation) झाला इतकंच. शिवाय या रेणूंचा अभ्यास मी केलेला आहे व तो या पातेल्यातल्या रेणूंना मी लावून पाहतोय. या अर्थी या पातेल्यातल्या पाण्यामुळे रेणूसंबंधीच्या ज्ञानात भर पडत नाहीये, पण फक्त पडताळा मिळतोय व त्या आधारे मी पाणी शुद्ध करु शकतोय.”

“वेताळा, प्रत्येक माणसाच्या शरीराचे विशेष हे त्याच्या गुणसूत्रात(genes) असते..किंबहुना नवीन संशोधनात जो डि. एन. ए.(DNA) हाती लागला आहे तो त्या मानवाच्या शरीराचा विशेष होय. पण वैशेषिकानुसार तर हा मानवाच्या भूतरूप शरीराचा(material body) विशेष होय. पण मानवाशी संबंधित कंपने(waves), काल(time), दिक्(space), मन(mind) व आत्मा(soul) या सगळ्याचा त्या डिएनए शी संबंध लावल्याशिवाय त्या मनुष्याचा विशेष हाती लागत नाही. तू म्हटलास ती वर्गीकरणे आहेत वेगवेगळ्या संदर्भात वापरलेली..”

 “बर..बर..पण विक्रमा ह्या तीन अंगांद्वारे व त्यातून निर्माण होणाऱ्या अतूट संबंधाद्वारे तू पदार्थाचे अंतरंग कसे जाणणार ते सांग..”

“यातील एक उदाहरण तर खालील श्लोकातच आहे..
काक: काक: पिक: काक: को भेद पिककाकयो:‌|
वसंत समये प्राप्ते काक: काक: पिक: पिक: ||
याचा अर्थ असा की कावळा काळा, कोकिळ ही काळा. असा एक कावळा व एक कोकिळ गप्पपणे शेजारी-शेजारी बसले आहेत त्यांच्यात फरक कसा ओळखावा? कवी म्हणतो..एकदा वसंत येऊदे.. कोकिळ कोण व कावळा कोण हे वेगळ ओळखत बसावं लागत नाही. काव काव आवाज ऐकला म्हणजे तो कावळाच आहे व कुहुकुहु असा आवाज ऐकला म्हणजे तो कोकिळच आहे हे कळते. हा समवाय संबंध आहे.”

“विक्रमा हा श्लोक छान आहे. पण काही नवीन उदाहरण?”

“फारसं नवीन नाही पण तुला लगेच पटेल असं उदाहरण देतो. एका वाटीत माती आहे, लाकडाचा काळा भुस्सा आहे व लोखंडाचा किस आहे. आता यातील लोखंडाचा किस लोहचुंबकाकडे आकर्षित होतो हा त्याचा अतूट संबंध. त्यामुळे त्या मिश्रणावरून लोहचुंबक फिरवला तर लोखडाचा चुरा चुंबकाला येऊन चिकटतो. त्यामुळे पदार्थाचे खरे स्वरूप प्रकटते. वेताळा याही ठिकाणी हे लोखंडाचे चुंबकाला चिकटणे हा त्याचा स्वयंभू गुण आहे. तो कोणी शिकवलेला नाही. तसेच या स्वयंभू वागण्यामुळेच हा चिकटणारा किस लोखंडाचाच आहे हे प्रयोगा अंती सिद्ध झालेले आहे. दरवेळी तो प्रयोग पुन्हा पुन्हा करावा लागत नाही. तसेच जगात सगळीकडेच लोहकीस लोहचुंबकाला चिकटतोच चिकटतो. इथं काही वेगळं चाललेलं नाहिये. हो, त्या ज्ञानाचा पडताळा मात्र मिळतोय.”


“अच्छा म्हणजे विक्रमा, या पदार्थाच्या नित्य अंगांचा वापर करून तुम्ही त्यातील घटक वेगवेगळे करू शकता व हवे ते घेऊन नको ते टाकूही शकता. तू म्हटलास तसं पदार्थाची ही सारी अंगे त्यातील द्रव्यावर आधारित असतात. मग आता मला भूत द्रव्य व नित्यद्रव्यांविषयी माहिती हवी. अरेऽ पण हे काय? प्रहर संपला. मला परत जायला हवं. पुन्हा भेटू विक्रमा द्रव्यांची चर्चा करण्यासाठी..हाऽहाऽऽहाऽऽऽ”

सर्वच प्रजाजनांसाठी फार महत्त्वाचा असा हा संवाद होता..जाती, कुळे, गोत्रे ही वेळोवेळी केलेली वर्गीकरणे पण प्रत्येक माणूस वेगळाच असतो हे एकून प्रजाजनच काय पण सारे पशुपक्षीही अचंबित झाले व सुखावले..
तुम्ही अमृताचे पुत्र आहात..
असा प्रगल्भ विचार देणाऱ्या वैदिक धर्माची व विसाव्या शतकात त्याची कीर्ती साता समुद्रापार नेणाऱ्या स्वामी विवेकानंदांची सर्वांना प्रकर्षाने आठवण झाली.

(क्रमश:)