सर्व द्रव्यांमधला समान धागा कोणता? (What is the similarity between all the nine substances)

राजा कालस्य कारणम्..म्हणजे राजाच्या इच्छेने राज्यात बऱ्याचश्या गोष्टींना चालना मिळते. घरातल्या कर्त्या पिढीच्या मताने घरातल्या गोष्टी घडतात. विक्रमाच्या राज्यातही काही वेगळे घडत नव्हते. पण सृष्टीमध्ये अशाही काही गोष्टी घडतात की जिथे असा कोणी माणूस, कोणी सजीव काही करताना दिसत नाही. जसं लोहचुंबक(magnet) जवळ आल्यावर गुळाला मुंगळे चिकटावे तसा लोहकीस त्याला चिकटतो. थंड पदार्थ व गरम पदार्थ जवळ जवळ ठेवल्यावर थंड पदार्थ काही अंशी गरम होतो व गरम पदार्थ काही अंशी थंड होतो. थंडीत तेलाचा व तुपाचा दिवा लावावा, तर तेलाचा दिवा जळत राहतो पण तुपाच्या दिव्यातले तूप सतत गरम करावे लागते, नाहीतर दिवा शांत होतो. म्हणजे तेलाचा व तुपाचा स्वभाव म्हणावा तर ते झाले निर्जीव पदार्थ. पण तरीही प्रत्येकाची वागण्याची तऱ्हा निराळी. तीच गोष्ट बर्फाळ प्रदेशांची. तिथे थंडीने सारे जीव काकडून मरत असतील असं समजावं तर बर्फाच्या थराखाली ते मस्तपैकी पाण्यात विहरत राहावेत. जगत राहावेत. 

“विक्रमा राजा तूच आहेस..असे काही विचार आणू नकोस मनात. तुझ्याच आज्ञेने तुझ्या राज्यात गोष्टी चालतात. पण ज्या पदार्थांना तुम्ही निर्जीव म्हणता त्या पदार्थांनी स्वत:हून काही काम करावं म्हणजे धक्काच आहे मला..काय आहे रे हे गौडबंगाल? आणि मला वाटतं प्रत्येक द्रव्यामध्येच असं काही ना काही आहे..मला आधी सांग की तू म्हणतोस त्या पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, दिक्, काल, मन व आत्मा या सर्वांमध्ये काही साम्यस्थळे आहेत का? प्रशस्तपाद ऋषींनी काही म्हटलंय काही म्हटलंय का याविषयी?”

“हो वेताळा..प्रशस्तपाद ऋषींनी या नवद्रव्यांमधली साम्यस्थळे एका श्लोकात सांगितली आहेत.
पृथिव्यादीनां नवानामपि द्रव्यत्वयोग: स्वात्मन्यारम्भकत्वं गुणवत्वं कार्य्यकारणविरोधित्वमन्त्यविशेषवत्वम् ||20||
द्रव्यत्त्वयोग – द्रव्याच्या स्वरूपात असणे (exist in form of substances)
स्वात्मन्यारम्भकत्त्वं – आपल्या समवाय संबंधांमुळे क्रियारंभ करणे(Initiate actions in themselves as per their concomitant relations)
गुणवत्वं – गुण असणे(have properties)
कार्य्यकारणविरोधित्त्वं – निर्माण करणाऱ्या कारणाला किंवा साधलेल्या परिणामाला विरोध न करणे (do not oppose the cause of their creation or the effect they created)
अन्त्यविशेषवत्त्वम् – शेवटी काहीतरी वेगळा शेष राहणे (have specific individuality)

वेताळा ही सर्व द्रव्ये आहेत हे त्यांच्यातले पहिले सारखेपण. पण त्यांच्यात फरक आहेत. त्यांच्यातल्या पृथ्वी, आप, तेज, वायू यांना मूर्त अस्तित्व आहे. काल व दिक् ही केवळ निमित्तमात्र आहेत. काही मात्र मन व आत्म्यासारखी अदृष्य असूनही परिणाम घडवणारी आहेत. पण पदार्थांच्या जडण घडणी मध्ये, त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या अस्तित्त्वामध्ये यांचे काही ना काही योगदान असतेच. मग प्रत्येक पदार्थात ही सर्वच  असतील किंवा नसतीलही. या नऊंशिवाय दहावे काही द्रव्य नाही हे निश्चित. आणि या द्रव्यांमुळेच पदार्थांना गुण(properties), कर्म(actions), सामान्य(categorization), विशेष(individuality) व समवाय(inherence or concomitant relations) लाभलेले असतात हे पण आधी बोललो होतो.”

“हो विक्रमा तू सांगितलेल्या श्लोकातही गुणवत्त्व व अन्त्यविशेवत्त्व आलंय ते हेच असणार हे कळलं मला. पण या श्लोकात जो स्वात्मन्यारम्भकत्त्वं हा शब्द आहे तो मात्र नवीन आहे. काय आहे त्याचा अर्थ?”

“वेताळ महाराज, तुम्ही जो पहिला प्रश्न विचारलात त्याच्याशी याचा संबंध आहे. पण याठिकाणी आपण स्वात्मन्यारम्भकत्त्वम्(make changes in themselves) आणि कार्य्यकारणविरोधित्त्वं(do not oppose the cause of their creation and the result of their actions) हे दोन्हीही शब्द एकाच संदर्भात घेतले पाहिजेत. कारण त्यातूनच खरं गम्य हाती लागतं.”

“अरे काय हे? उदाहरण दे रे राजा..थांब मीच विचारतो..समजा एक चमचा तूप तुझ्या राजसेवकाकडून पाणी भरलेल्या घागरीत पडले तर ते तूप तळाशी न जाता पाण्याच्या पृष्ठ भागावर पसरते..हे कसे होते?”

“वेताळा या ठिकाणी दोन द्रव्ये आहेत..पाणी व तूप. आता तूप हे पाण्यापेक्षा हलकं. जेव्हा ते पाण्याच्या संपर्कात येते तेव्हा त्याचे रेणू पाण्याच्या रेणूंच्या संपर्कात येतात.पाण्याचे रेणू आंतर रेणवीय बंधाने बांधलेले असतात. ते  या तुपाच्या रेणूंना जाऊ देतात व पुन्हा एकमेकांच्या जवळ येतात. अशा रीतीने तुपाचे रेणू पसरत जातात. परंतु तुपाचे रेणू हे पाण्यापेक्षा हलके  असल्याने ते न बुडता पृष्ठभागावर थर किवा तवंग तयार करतात.”

“पण विक्रमा हे कशावरून रे खरं? हे रेणू एकमेकाला ढकलतात कशावरून?”

“अगदी योग्य प्रश्न वेताळा..अणु रेणूंबद्दल फार पहिल्यापासून बोललं जातंय, पदार्थांमध्ये त्यांचे विशेषरूप असलेले हे अणु रेणू असतात व ते लाखों-करोडोंच्या अब्जावधींच्या संख्येने असतात अशा अनेक संकल्पना होत्या. रॉबर्ट ब्राऊन नावाचा वनस्पतीशास्रज्ञ जेव्हा पाण्यात पडलेल्या परागकणांना(pollen grains) सूक्ष्मदर्शकाखाली पाहात होता तेव्हा हे परागकण अतिशय वेगाने इकडून तिकडे, तिकडून अजुन कुणीकडे असे ढकलले जाताना त्याला दिसले. या ठिकाणी फक्त पाणी व ते परागकणच होते. ढकलणारे जलचर तर तिथे नव्हतेच. म्हणजे पाण्याचे रेणु हेच त्या परागकणांना ढकलत होते हे लक्षात आलं. आईनस्टाईन या शास्रज्ञाने या प्रयोगाच्या आधारेच अणु रेणूंचं सूक्ष्मपातळीवरचं अस्तित्त्व सिद्ध केलं..”

“अरेच्चा म्हणजे वनस्पतीशास्त्रज्ञाच्या प्रयोगावरून पदार्थविज्ञानातलं गृहितक(assumption) सिद्ध झालं..”

“हो आणि वैशेषिकातलं स्वात्मन्यारम्भकत्त्वम् ही सिद्ध झालं..”

“पण विक्रमा दुसरं जे तू म्हणालास की द्रव्ये ही कारणांना व कार्यांना विरोध करत नाहीत हे काय आहे?”

“वेताळा आपण आधीसुद्धा पाहिलं होतं की एका पदार्थामध्ये अनेक द्रव्ये येत जात असू शकतात. ती एकमेकांवर परिणाम करत असतात. म्हणजे विस्तवावर पाण्याचे भांडे ठेवलेले आहे असे समजू. याठिकाणी तेजद्रव्य व पाण्याच्या रूपातील आपद्रव्य आहे. तर जोपर्यंत विस्तव आहे तोपर्यंत पाण्याच्या रेणूंमधले आंतर रेणवीय बंध सैल होतात व बाष्पनिर्मिती सुरू होते. म्हणजेच पाणी हे या अवस्थाबदलाला विरोध करत नाही. एका अर्थी असंही म्हणू शकतो की पाण्याची निर्मिती ही सुद्धा बर्फवितळण्यातूनच झालेली असते. म्हणजे ‘बर्फाचा तेज द्रव्याशी संयोग’ या कारणाने पाण्याची निर्मिती होते. त्याच ‘पाण्याचा तेज द्रव्याशी संयोग’ या कार्याने वाफेची निर्मिती होते. पाणी हे यातील कशालाच विरोध करत नाही. हेच ते कार्य्यकारणविरोधित्त्वं(do not oppose the cause of their creation and the result of their actions).”

“थोडक्यात काय तर तेज द्रव्याचा आप द्रव्याशी संयोग झाला की आपद्रव्य हे आज्ञाधारक अपत्याप्रमाणे वाफेत रूपांतरित होते. तेज द्रव्य निघून गेलं की पुन्हा पाणी व मग बर्फ. या साखळीतच प्रशस्तपाद ऋषींनी सांगितलेली स्वात्मन्यारंभकत्त्वं व कार्य्यकारणविरोधीत्त्वं ही दोन्ही तत्त्वे येऊन जातात.”

“होय वेताळा..या दोन्ही संकल्पनांचा संबंध द्रव्यांच्या अवस्थाबदलाशी आहे व यालाच एकूण त्या द्रव्यांचं धर्मकर्तृत्त्व असं म्हटलं गेलंय.
स्वात्मन्यारम्भकत्त्वम् (make changes in themselves) + कार्य्यकारणविरोधित्त्वं (do not oppose the cause of their creation and the result of their actions) = धर्मकर्तृत्त्वम्
यात नंतर अधिक संशोधन करून उष्णता क्षयमान(entropy) अशी संकल्पना आली. आपण आधीच पाहिलं की स्थायूद्रव्यांचं धर्मकर्तृत्व जास्त(low entropy). त्यांचं रूपांतरण जसं आप व वायूंमध्ये होतं तसं धर्मकर्तृत्व कमी होत जातं (high entropy) किंवा वैशेषिकांच्या भाषेत अधर्मकर्तृत्व वाढत जातं.”

“पण विक्रमा, तू जो श्लोक सांगितलास तो फक्त काही स्थायू(solid), द्रव(liquid), वायू(gas) व तेज(heat/energy) या भूतद्रव्यांपुरताच नाही ना? सर्वच द्रव्यांना वरील दोन लक्षणं लागू पडतात असं म्हटलंय ना प्रशस्तपादांनी?”

“वेताळा, अतिशय सूक्ष्म निरीक्षण व चांगला प्रश्न..पाश्चात्यांच्या भौतिक शास्त्रांमधली बदलांची चर्चा ही ‘बाह्य कारण’(external cause) किंवा ‘कारण-परिणाम संबंध’(cause-effect relation) यांवर बऱ्याचशा गोष्टी सोडून देते. पण वैशेषिक मात्र तसं नाही. बाहेर दिसणारे बदल हे या भूतद्रव्यांमध्येच दिसतात हे मान्य. वैशेषिकांमध्ये सुद्धा
‌आश्रितत्वञ्चान्यत्र नित्यद्रव्येभ्य:||12||
स्थायू (solid), द्रव(liquid), तेज (energy), वायू(gas) ही भूतद्रव्ये इतरांवर अवलंबून असतात. आकाश(plasma), काल(time), स्थल(space), आत्मा(self/atma) व मन(mind) ही महाभूतद्रव्ये इतरांवर अवलबून नसतात.

म्हणजेच या भूत द्रव्यांमध्ये तर फक्त दृष्य कारणं व दृष्य परिणामच दिसतात. पण यानंतरची आकाश(plasma), काल(time), दिक्(space), मन(mind) व आत्मा(self/soul) ही द्रव्ये तर महाभूते आहेत व ती नित्य द्रव्ये आहेत.”
“पण विक्रमा ही नित्य आहेत म्हणजे ती निर्माण किंवा नष्ट होत नाहीत. मग कारण व परिणाम कसे आले? स्वत:मध्ये बदल करणं कुठून आलं?”

“वेताळा, एक एक पाहू. आकाश द्रव्यामध्ये मुख्यत: विविध प्रकारच्या लहरी असतात असं मानलं आहे. खरं तर या लहरी सुद्धा द्रव्याची अजूनही पुढची म्हणजे वायूंच्या नंतरची अवस्था मानण्यात येते. यात त्या द्रव्याच्या अणूंमधील बंध हे अजूनच सैल पडलेले असतात व ते द्रव्य लहरींच्या स्वरूपात किंवा आकाशरूपात आहे असे मानण्यात येते.”

“अरे पण असं कुठं होतं का?”

“वेताळा सूर्य इत्यादि ताऱ्यांवर अतितप्त तापमान असते. त्यामुळे त्यावरील मूलद्रव्येही तरंग रूपात अस्तित्त्वात असतात. स्थायू, द्रव, वायूंच्या स्वरूपात असलेल्या त्यांच्या गुणधर्मांपेक्षा तरंगरूपातील गुणधर्म वेगळे असतात. खाली दिलेल्या चित्रात सूर्यावर कोणकोणती मूलद्रव्ये तरंगरूपात आहेत हे समजते. कॅल्शियम, लोह, हायड्रोजन, मॅग्नेशियम, सोडियम व प्राणवायू ही मूलद्रव्ये या चित्रात दिसतात.”

“म्हणजे तापमान कमी झालं तर ही मूलद्रव्ये वायू, द्रव किंवा स्थायूरूपात येणार असं म्हणायचंय तुला?”

“हो वेताळा. तैत्तिरीय उपनिषदात (यजुर्आरण्यक, ब्रह्मवल्ली, द्वितीयप्रश्न, प्रथम अनुवाक) या निर्मितीची आकाशापासूनची उतरंड दिलेली आहे.
तस्माद्वा एतस्मादात्मन: आकाशस्सम्भूत:‌ | आकाशाद्वायु: | वायोरग्नि: | अग्नेराप: | अद्भ्य: पृथिवी|
आपल्या संदर्भात म्हणू शकतो की निर्मितीची प्रक्रीया आकाशापासून सुरु झाली. आकाशापासून वायू, वायुपासून अग्नी, अग्नीपासून आप, व आपापासून स्थायू. हीच गोष्ट वैशेषिकातही वेगळ्या श्लोकाच्या स्वरूपात आली आहे.”

“अरे विक्रमा, सूर्यावरची ही द्रव्ये पृथ्वीवरही आढळतातच की आणि तीही खनिजांच्या स्वरूपात..खोल खोल पृथ्वीच्या पोटात..”

“वेताळा, या संबंधांवरूनच तर सूर्य व पृथ्वी मध्ये संबंध प्रस्थपित करता आला. शिवाय पृथ्वी ही एकेकाळी सूर्याचाच भाग होती वगैरे गृहितकांना यातूनच तर बळ मिळते..”

“थांब थांब विक्रमा भरकटू नकोस..नवातल्या पाच द्रव्यांमधली साम्यस्थळे आपण पाहिली..पण काल, दिक्, आत्मा व मन यांच्या बाबतीत स्वात्मन्यारम्भकत्त्वम् (make changes in themselves), कार्य्यकारणविरोधित्त्वं (do not oppose the cause of their creation and the result of their actions) हे कसे असते ते सांग.”

“हो हो..काल(time) व दिक्(space) ही द्रव्ये केवळ निमित्तमात्र आहेत. ती सर्वगामी आहेत, त्यांचा विस्तार मोठा आहे पण त्यांचा आपण आधी म्हटलेल्या पाच द्रव्यांवर काहीच परिणाम होत नाही. ती केवळ निमित्तासाठी येतात व नंतर निघून जातात. असं त्यांचं सतत चालू असतं. म्हणजेच पाहणाऱ्याच्या इच्छेनुसार ती येतात व बदलांना मोजमापाची चौकट देतात. झालेल्या बदलांना दिक् व काल यांचा संदर्भ प्रदान करतात.”

“उदाहरण..उदाहरण..”

“राजाच्या तबेल्यातून एक घोडेस्वार पहाटे पाच वाजता निघाला, सहा वाजता निघण्याच्या स्थानापासून तो पूर्वेला ४० किलोमीटर अंतरावर होता – हे विधान आणि
एक घोडेस्वार निघाला व काही अंतरावर जाऊन थांबला

हे विधान यात ऐकणाऱ्याला अर्थबोध कुठल्यातून होतो? तर पहिल्यातून होतो. कारण तिथे घडणाऱ्या बदलाचा ऐकणाऱ्याला संदर्भ मिळतो. दिक् व काल यांचं हेच वैशिष्ट्य की ते संदर्भ पुरवतात. पहाटे ५ वाजता काळ आला. नंतर एक तासाने तो पुन्हा आला. म्हणजे काळाचा संदर्भ बदलला. काळ बदलला केवळ निमित्तापुरता. तीच गोष्ट दिक् किंवा दिशेची. तबेला हा दिशेचा आरंभ बिंदू. मध्ये काळाचा एक तास गेला. पाहातो तर घोडेस्वार तिथे नाहीच. कुठे गेला शोधावं तर पठ्ठ्या पूर्व दिशेला ४० किलोमीटर वर दिसला. जागा बदलली घोडेस्वाराने. पण हा सुद्धा दिशेतला नैमित्तिक बदल. अशा प्रकारे स्थल व काल यांमध्ये नैमित्तिक बदल होत असतात. शिवाय ते एका अर्थाने भूतद्व्यांमध्ये होणाऱ्या बदलांना विरोध करत नाहीत कारण ते केवळ निमित्तापुरतेच असतात..”

“अरे निमित्त, निमित्त काय सारखं सांगतोस..कोणाला हवं निमित्त? कशाला हवंय? आणि मन व आत्मा यांचं काय?”

“वेताळा, तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे. मन व आत्मा या द्रव्यांच्या गुणांमध्ये मनाचे संख्या(number), परिमाण(unit), पृथकत्व(separateness), संयोग(conjunction), विभाग(disjunction), परत्व(largeness), अपरत्त्व(smallness) व वेग संस्कार(emotive force) हे गुण सांगितले आहेत. अर्थातच मन हे भावनांच्या आधारे विविध अवयवांद्वारा बळ प्रयुक्त करते. मन लहान व मोठे होते. इकडून तिकडे जात असते. शिवाय मन हे एकच नसून अशी अनेक मने पदार्थात असू शकतात.. ”

“म्हणजे एखाद्याने मनात आणलं की त्याला बर्फ नको पाणी हवं तर त्याचे हात काम करणार..बर्फाचं पाणी बनवणार..म्हणजे मनाने घेतलं तसंच होणार..अर्थात मनात बदल होणार, ते कधी गोड पदार्थांवर जाणार, कधी द्रव्य राशींवर जाणार..म्हणजे मन इतर द्रव्यांप्रमाणे बदलाला सहाय्यक होण्याचे व स्वत:मध्ये बदल करण्याचे गुण दाखवते..म्हणजे हे सगळं मनाच्याच इच्छेने का?”

“नाही..निदान वैशेषिकात म्हटल्याप्रमाणे आत्म्यालाही संख्या(number), परिमाण(unit), पृथकत्व(separateness), संयोग(conjunction), विभाग(disjunction), हे गुण सांगितले आहेतच. पण आत्म्याला भावना संस्कार(associative force), बुद्धि, सुख, दु:ख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म व अधर्म हे गुण सांगितले आहेत. यांचा परिणाम म्हणून आत्मा हा विविध पदार्थांमध्ये वेगवेगळे बदल घडवून आणतो. यात मनाला ही मदतीला घेतो.”
“अच्छा म्हणजे मन व आत्मा हे स्वत: बदलतात व वेगवेगळे बदल स्वत:च्या सोयीने करण्याचा घाट घालत असतात, त्यामुळे स्वत:नेच निर्माण केलेल्या बदलांना जेव्हा दृष्यरूप प्राप्त होते तेव्हा त्यांनी विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही…

अरे पण थांब थांब हे म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितल्या सारखे काहिसं वाटतंय.. आत्मा हा प्रवासी, पाच इंद्रिये हे घोडे, मन हा लगाम वगैरे..”

“अगदी खरं सांगतोयस वेताळा..”

“पण विक्रमा हे सगळं सांगायला फारच लांबड लावलीस बुवा..ही साम्यस्थळे कळायला जरा जडच होती. आता मला जरा पटकन कळणाऱ्या गुणांविषयी सांग..जसं वास कशाला असतो..पृथ्वीद्रव्याला की द्रव? गुरुत्व कोणत्या द्रव्यांना असते? तापमान कोणत्या द्रव्यांना तापवते? पण आता उशीर झाला..द्रव्यांमधली अशी साम्यस्थळे व भेदस्थळे मला जाणून घ्यायची आहेत..चल विक्रमा येतो..याच निमित्ताने पुन्हा भेटू काही काळानंतर …हाऽहाऽऽहाऽऽऽ”

आजुबाजूच्या सृष्टीतील विचारी आत्म्यांनी एकदाचा नि:श्वास सोडला. किती व काय काय ऐकलं होतं त्यांनी. काहीही झालं तरी या द्रव्यांबद्दल काहीतरी समजल्यासारखं वाटंत होतं. सूर्यावरही पृथ्वीवरची द्रव्ये आहेत किंबहुना पृथ्वीची नाळ सूर्याशी याच द्रव्यांमुळे जोडलेली असल्याचे कळते हे ऐकायला मस्तच वाटत होतं…शिवाय पुढे अजूनही नवीन गोष्टी कळणार म्हणून सर्वच आनंदित व उत्सुक होते. गोष्ट ऐकण्यासाठी स्तब्ध व स्थिर झालेले काल द्रव्य बर्फ वितळल्यावर वाहू लागलेल्या नदीसारखे पुन्हा प्रवाही झाले होते..

(क्रमश:)