नवद्रव्यांमधले पहिले द्रव्य : मी पृथ्वीपरमद्रव्य (I , The Solid Super-substance)

दगड, धोंडे, पानं, झाडं, माती या सर्वांना निसर्ग या मोठ्या शब्दात आपण टाकून मोकळे होतो खरं पण यात या स्थायूंचं अस्तित्वच लोपून जातं.. प्रत्येक स्थिर राहणाऱ्या डोंगरात, घळीत, घरात, मंदिरात, किल्ल्यात, मोठ्या वटवृक्षात, समुद्र किनार्याच्या खडकांमध्ये या अनेकविध आकाराच्या स्थायूं नीच स्थिरता, आधार, भक्कम पणा दिला .. धबधबे झेलले स्थायूंनीच, तोफगोळे व तोफांचा मारा स्थायूंचाच, झोपाळे स्थायूंचेच, ऊन -वारा -पावसापासून निवारा स्थायूंचाच, भेदक कडे, सुळके ही त्यांचेच.. हिमनग सुद्धा त्यांचेच.. हिरे , माणके, कोळसे, हाडे सर्व ठिकाणी हा स्थायूच भरून राहिलाय.. दोन रानरेडे चवताळून एकमेकाला टक्कर देतात तेव्हा धडकतात ते त्यांच्या डोक्यावरचे टणक स्थायूच.. पकडलेल्या शिकारीचे पोट फाडायला सिंहांना मदत करतात ते धारदार सुळ्यांचे व नख्यांचे स्थायूच .. जंगली श्वापदांचा अंदाज घेत म्यानातील तलवारीच्या रत्नजडित मुठीवर हात ठेवत विक्रम या स्थायूंच्या विश्वात रमला होता..
“अरे अरे विक्रमा, हे काय स्थायू स्थायू चाललंय? असं वाटतंय की भगवान श्रीकृष्णाने जसे विश्वरूप दर्शन देऊन प्रत्येक ठिकाणी मी कसा भरून राहिलोय हे सांगितलं तसं काही स्थायूंचं सांगतोस की काय? ”
“हो वेताळा, आधी कणाद त्यानंतर प्रशस्तपद यांच्या ग्रंथामध्ये केवळ स्थायूच नाही तर सर्वच म्हणजे स्थायू , द्रव, वायू , तेज, आकाश, काळ, दिक, आत्मा व मन यासर्वांनाच विशेष द्रव्ये म्हटले आहे….एका अर्थी ही नवद्रव्ये संपूर्ण विश्वालाच घडवतात.. सुप्त राहतात.. पण तरीही सर्वत्र भरून राहतात.. वेगवेगळी कळत नाहीत.. आपण सामान्य माणसं या प्रत्येक द्रव्याचे विश्वरूप दर्शन अनुभवाने घेऊच शकतो.. या द्रव्यांचे विराट रूप पाहूच शकतो ”
“कसं ?”
“थांब मी पृथ्वी किंवा स्थायू परम द्रव्याला आवाहन करतो.. हे परमद्रव्या मला तुझं दर्शन दे..तुझं विराट रूप मला दाखव.. मी तुझा आजन्म ऋणी राहीन..”

bheema.jpg

(copyright/source: religion.wikia.com)

असं म्हणता क्षणी आजूबाजूच्या सर्व स्थिर – चर, सजीव -निर्जीव, सूक्ष्म-महाकाय यांनी भरलेल्या सृष्टीतील सर्व लहान थोर, सूक्ष्म -अतिसूक्ष्म स्थायू कण वेगाने एकत्र आले आणि एक अतिशय महाकाय, रंगीबेरंगी विराट पुरुष समोरा आला.. अतिशय दणकट, विशालकाय, कणखर, राकट असा तो अतिविशाल पुरुष पाहून साऱ्यांचेच डोळे दीपले.. सर्वांनाच आपण महापराक्रमी भीमाचाच अवतार पाहतोय की काय असा भास झाला.. हजारो काळ्यामेघांच्या गडगडाटाला फिका पाडील अशा घनगंभीर आवाजात तो राजा विक्रमाला म्हणाला “राजा विक्रमा, आज कशी काय आठवण काढलीस? बोल हा मी पृथ्वीपुरुष किंवा स्थायुपुरुष तुझ्यासमोर उभा आहे.. ”
त्याचं ते`अतिविराट, अतिभव्य रूप कोणाच्याच नजरेत सामावत नव्हतं.. डोळे अक्षरश: दिपून गेले होते.. सगळेच स्तिमित झाले होते.. तेव्हा विक्रम म्हणाला “हे स्थायूपुरुषा तू अतिभव्यच आहेस.. तुझं हे अतिविराट रूप लक्षात घ्यायला आम्ही कमीच पडतो.. तेव्हा तूच आम्हाला तुझ्या विषयी सांग .. ”
“विक्रमा तू पाहतच आहेस तसा मी तीन मुख्य प्रकारात वसतो: सर्व सजीव वनस्पती तसेच प्राणिमात्रांची शरीरे, त्यांची इंद्रिये व त्यांना जाणवणाऱ्या वस्तू.
यातील शरीरे ही दोन प्रकारची असतात: मातेच्या गर्भातून जन्माला येणारी व तशी न येणारी. म्हणजेच जरायुज किंवा गर्भातून जन्मणारे आणि अण्डज किंवा अंड्यातून जन्माला येणारे. माणूस, गायी आणि इतर चार पायांचे प्राणी हे जरायुज किंवा सस्तन वर्गात मोडणारे आहेत. पक्षी व सरपटणारे प्राणी हे अंडी घालणारे किंवा अंडज आहेत.
इंद्रियांत मी मुख्यतः वासाची जाणीव करून देणाऱ्या गंधेंद्रियात आहे. ते सर्वच प्राण्यांमध्ये असते. ते मुख्यतः स्थायूद्रव्याच्या अणूंचे बनलेले असून त्या अणूंवर जल तसेच इतर द्रव्यांचा काहीही परिणाम होत नाही.

f2c84-noseandsubstance
तिसऱ्या म्हणजे तुम्हाला माहित असलेल्या नेहमीच्या वापरातील वस्तूंचे रेणू हे दोन, तीन तसेच त्याहीपेक्षा अधिक अणूंच्या एकत्र येण्यातून बनलेले असतात आणि ते तीन प्रकारचे असतात – माती, दगड व पाने-फुले. त्यातील पहिल्या प्रकारचे स्थायू म्हणजेच माती ही पृथ्वीच्या विविध प्रदेशांमधील सर्वात वरच्या थरांमध्ये मिळते.

 

ae3bc-colorful_gems_design_vector_5352012b252812529

दुसऱ्या प्रकारच्या स्थायूंमध्ये म्हणजेच पाषाणांमध्ये खनिजे, विविध रत्ने, हिरे, माणके व अन्य मोडतात. तिसऱ्या प्रकारच्या स्थायूंमध्ये गवत, औषधी वनस्पती, झाडे – त्यांची फुले व फळे, वेली, फुलांविनाच फळे येणाऱ्या वनस्पती व अन्य तत्सम प्रकार मोडतात.”
हे परमपुरुषा तुझी ही लहान थोर रूपे आम्ही आमच्या आजूबाजूला पाहतच असतो. पण ती रूपे, त्या वस्तू कायम टिकत नाहीत ती मोडतात, तुटतात, छिन्न विछिन्न होतात. मग तेव्हा तू कुठे जातोस?
विक्रमा, ‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळी राहती ‘ हे तू ऐकलंच असशील, तसंच माझंही आहे. अणुरूपात मी अनंतकाळापर्यंत राहतो , पण नेहमीच्या बघण्या-वापरण्यातील वस्तूंचे अस्तित्व हे तात्कालिक असते. तात्कालिक अस्तित्व असणाऱ्या वस्तूमध्ये माझ्या सूक्ष्म घटकांची एक विशिष्ट रचना होते व त्यांना नेहमीचा आकार येतो. ती रचना मोडली म्हणजेच भॊतिक बदल झाला की मी सूक्ष्म रूपात जातो. पण पाकज म्हणजे रासायनिक बदल झाला तर मी तुम्हाला लक्षात न येणारे रूप घेतो. पण माझे अणुरूपातले विशेष अस्तित्व किंवा ओळख कायम राहते.”
“मग हे स्थायुपुरुषा आम्ही तुला ओळखायचं कसं? तुझी लक्षणे कोणती?”
“चांगला प्रश्न. आम्ही अनेक रंगांमध्ये असतो, पांढरा, काळा, नारंगी, पोपटी. आम्हाला वेगवेगळ्या चवी असतात गोड, कडू, तिखट, आंबट, तिखट, खारट. आम्हाला छान व नकोसा असे दोन प्रकारचे वास असतात. आम्ही धड ना गरम असतो ना थंड, आमचं तापमान तेज द्रव्याच्या परिणामाने बदलतं. शिवाय आम्हाला संख्येने मोजता येते एक, दोन, तीन..आमची लांबी-रुंदी-उंची मोजता येते.”
“पण हे स्थायुपुरुषा तू म्हणतोस ते गुण इतरांनाही असतील जसे रंग वगैरे आप द्रव्याला असेल, वायूंना एक-दोन-तीन असे मोजता येईल..मग तुझा वेगळेपणा काय..पदार्थविज्ञाना नुसार तुझ्यात काही वेगळेपणा आहे का?”
“वा! वा!! आवडला प्रश्न मला..एक तर स्थायू पदार्थांना वास असतोच असतो..मग तो स्थायू मोठा असो किंवा अगदी सूक्ष्म धुळीएवढा असो..तुम्ही जेव्हा उदबत्ती लावता तेव्हा स्थायूचेच अतिशय लहान कण हवेत तरंगतात व दूरवर सुगंध पोहोचवतात..तशीच गोष्ट दुर्गंधाची..यालाच तुमच्या नवीन संदर्भात तुम्ही Brownian Motion म्हणता. असो. पण पदार्थविज्ञानाच्या दृष्टीने मला समजून घ्यायचं असेल तर हे माझं रूप पाहा..”

tortoise.jpg

असं म्हणताक्षणीच एक अतिभव्य कासवच येऊन उभं राहिलं..सारे पुन्हा आश्चर्यचकित झाले..
“कासव?” सगळ्यांनीच धक्क्याने, अविश्वासाने, निराशेने म्हटले. राजा म्हणाला “तुझा आवडता प्राणी, तुझं रूप कासवासारखं का झालं.. असं काय आहे या संथ प्राण्यात ?”

“अरे विक्रमा कासव हा संथ आहे, शक्तिवान आहे, तो आपणहून उगीच जास्त फिरत नाही..माझंही तसंच आहे..स्थायूंना म्हणजेच आम्हाला हालवण्यासाठी बळंच लावावं लागतं..आम्हाला हालवणारं बळ नाहिसं झालं की आम्हीपण निवांत बसून राहतो कासवासारखे आत पाय घेऊन. यालाच नैमित्तिक प्रवाहीपणा म्हणजे काही कारणानेच किंवा बाह्यबळामुळेच (External Force) हालचाल करणं असं म्हणू शकतोस. यालाच जडत्व(Inertia) असंही म्हणतात.”

“अरेच्चा म्हणजे तुला धक्का दिला की तु हालणार म्हणजे विस्थापन (Displacement)आलं, मग वेग मोजणं (Speed)आलं, मग त्वरण (Acceleration)आलं, मग संवेग(Momentum) आला, मग तुला धक्का मारणारं बळ किती हे मोजणं (Force)आलं आणि या हालचालीला विरोध करणारं घर्षण(Friction) आलं व खाली खेचणारं गुरुत्वाकर्षण आलं..आऱ्याऱ्या आता मला कळलं सारं..”वेताळ म्हणाला.

“वेताळा गतीची समीकरणं (Equations of motion) विसरलास वाटतं! मग हे स्थायुपुरुषा तुम्हीही वाहता व पाणीही वाहतं..मग दगडधोंड्यांच्या व पाण्याच्या वाहण्यात काय फरक?” संभाषणाचा धागा पुढं नेत विक्रम म्हणाला.

“बरोबर आहे..पण पाण्याला केवळ थोडा उतार मिळाला व जागा मिळाली की ते वाहू लागतं. पण आम्हाला वर्गात झोपलेल्या विद्यार्थ्याप्रमाणे जागं करावं लागतं, सतत हालवावं लागतं..कारण आम्हाला घर्षणबळ सुद्धा स्थिर बसवायचा प्रयत्न करतं..या सगळ्यावर मात करण्यासाठी आम्हाला धक्का देऊन हालवणारं बळ सतत पाठीशी असावं लागतं..नाहीतर आम्ही पुन्हा बसतो एकाजागी..निवांत..निश्चल..”
“मग हे स्थायुपुरुषा, दगडधोंडेही उंचावरून पडतात, धबधबाही पडतो..मग गुरुत्वबळ(gravity) दोघांवरही काम करतं?”
“अगदी बरोबर विक्रमा..गुरुत्वबळ स्थायु व द्रव या दोन प्रकारच्या द्रव्यांवरच प्रभाव दाखवतं..बाकी द्रव्यांवर म्हणजे वायू, तेज, आकाश, दिक्, काल, मन यांच्यावर गुरुत्वाची मात्रा चालत नाही..पण हे राजन आता उत्तररात्र संपून नवीन दिवस येण्याची चाहूल लागते आहे..सहस्र किरणांनी जगाला तेज देणारा सूर्य येतोय..त्याच्या संपर्काने बर्फ इत्यादि अनेक स्थायूरूपे द्रवांमध्ये रूपांतरित व्हायला उत्सुक झाली आहेत..सृष्टिचक्र अविरत चालू राहण्यासाठी आता मला सृष्टीत विलीन व्हायला हवे येतो मी..”
असे म्हणून स्थायूपुरुष लुप्त झाला..पण अनेकविध आकारांमधले त्याचे अस्तित्त्व आता सर्वांनाच जास्त तीव्रपणे जाणवू लागले. वेताळानेही विक्रमाचा निरोप घेतला व म्हणाला”विक्रमा, स्थायुपरुष दर्शन झाले हे चांगलेच..पण आता बाकी द्रव्यांच्या पुरुषांनाही बोलावण्याची जबाबदारी तुझीच बरंका..येतो मी विक्रमा हाऽहाऽऽहाऽऽऽ”
(क्रमश:)

आधार: प्रकरण ४ भाग १: पृथ्वी (Discussion on characteristics, properties and classification of solids)

मूळ कथा: मुखपृष्ठ