हे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला ? (Why to study Physics in the first place)

अमावस्येची रात्र.. दूर वर ऐकू येणाऱ्या प्राण्यांच्या अस्तित्व खुणा.. काही ओळखी काही अनोळखी आवाज ऐकत जात असताना राजा विक्रम नेहमीप्रमाणेच चिंतनशील झाला.. दरबारातील एकेकाचे चेहरे, त्यांचे आवाज, त्यांचे स्वभाव, त्यांचे डोळ्याला दिसणारे रूप, अनुभवाने त्यांच्या स्वभावाची झालेली खरी ओळख, गुप्तहेरांकडून त्यांच्या राजनिष्ठेविषयी झालेली पडताळणी, त्यांची खासियत आणि त्यांची भाषा, धर्म, कबिला, मातृभूमी यांच्या आधारे राजा विक्रम प्रत्येकाचे एक पूर्ण चित्रच डोळ्यासमोर रेखाटत होता.. त्याच्यामार्फत त्याला अनेक वरकरणी न कळणाऱ्या गोष्टी जाणवत होत्या.. डोळ्याला न दिसणाऱ्या पण या सर्व बाजूंनी पाहिल्यावर जाणवणाऱ्या गोष्टी..

“काय कमाल आहे नाही हि माणसे दिसतात कशी पण प्रत्यक्षात असतात काय? खरंच दिसतं तसं नेहमीच असेल असं नाही.. ” विक्रम स्वतःशीच पुटपुटला.. पण हे पुटपुटणं वेताळाला ऐकू गेल्याशिवाय कसं राहीलं असतं ?

“काय राजा? पुन्हा दरबारी लोकांचा विचार आला तुझ्या मनात? ते दरबारी दिसतात कसे, चालतात कसे, बोलतात कसे, वागतात कसे.. त्यांचे वैशिष्ट्य, त्यांचे गट – तट, त्यांचे एकमेकातले संबंध कसे आहेत याचा विचार करतोयस. काहीतरी मोठाच खल चालला आहे तुझ्या मनात. पण मला सांग की असा पदार्थाच्या व्यक्तिमत्वाचा विचार कधी तुम्ही करता? “

“वेताळा पदार्थाच्या व्यक्तिमत्वाचा त्याच्या दिसण्याचा(appearance), हालचालींचा(movements), गुणांचा(properties), विशेष ओळखीचा(individuality), गटवारीचा(classification) आणि त्या पदार्थाच्या इतर अविभाज्य घटकांचा(inseparable components and relations) अभ्यास म्हणजेच पदार्थ विज्ञान(physics). मुळात पदार्थधर्म असं जेव्हा प्रशस्तपाद ऋषींनी म्हटलं तेव्हा त्यांना असाच अर्थ अभिप्रेत असावा.”

“पदार्थधर्म? म्हणजे पदार्थाला धर्म असतो?”

“माणसांच्या धर्मासारखं नाही. पदार्थाच्या वागण्याची विशिष्ट पद्धत म्हणजे पदार्थ धर्म..हा धर्म म्हणजेच पदार्थ कसा दिसतो, वास कसा असतो, कसा आवाज येतो, विविध परिस्थितीत पदार्थ कसा वागतो हे सर्व जाणून घ्यायचं, ओळखण्याच शास्त्र म्हणजे पदार्थ विज्ञान.. “

“विक्रमा तू म्हणजे कै च्या कै सांगतोस? माणसांचं चित्र काढतात तसं तू पदार्थचं व्यक्तिचित्रच(personality sketch) काढायला निघालायस! अरे मला माहित असलेले पदार्थविज्ञान किंवा भौतिक शास्त्र(physics) म्हणजे कसं व्याख्या(definitions) पाठ करायच्या, याचे नियम(laws), त्यांचे नियम, हे सूत्र(equations) कसं कसं आलं, ते सूत्र कसं आलं हे शास्त्र म्हणजे पदार्थ विज्ञान.. कुठल्या जगात वावरतोस तू? “

“हे बघ वेताळा, तू म्हणतोस ते खरं आहे पण पूर्ण पणे खरं नाही. म्हणजे एखाद्या अनोळखी माणसाला पहिल्यांदा पहिल्या पासून तो माणूस परममित्र किंवा हाडवैरी होईपर्यंत आपण त्याला फार चांगलं ओळखू लागलेले असतो हे तुला मान्य आहे?”

“म्हणजे काय? वादच नाही.. परममित्र आणि कट्टर वैरी हे एकमेकांना चांगले ओळखून असतातच..”

“मग मला सांग एखाद्या माणसाला तुम्ही ओळखू लागता म्हणजे नक्की काय करू लागता? तो माणूस गोरा दिसतो कि सावळा, त्याच्या डोळ्याचा रंग कोणता, त्याचा आवाज कसा आहे, उंची किती, जाड-बारीक, केस मोठे – कमी, वय, स्वछ की भोंगळ अशा अनेक समोर दिसणाऱ्या गोष्टी तुम्ही ओळखू लागलेला असता. हे सगळं तुम्ही जाणता अजाणता लक्षात घेतलेलंच असतं? “

“बरोबर.. “

“मग ही बाह्य(external appearance) ओळख झाल्यावर तो माणूस विचार कसा करतो, त्याची स्वतः:ची खरी ओळख काय? त्याच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य काय, त्या माणसाला भाषेवरून, मातृभूमीवरून, गावावरून आणि इतर कशाकशावरून कोणत्या कोणत्या गटात तुम्ही मनाने ठेवून बघता.. या वरूनही त्या व्यक्तीची सखोल माहिती (in-depth analysis)अजाणता आपल्याला होत राहते.. शिवाय त्याचे नातेसंबंध समाजाशी, कुटुंबाशी. मित्रांशी कसे आहेत हेही आपण पाहतो.. या सर्वांमधून त्या माणसाचे अंतरंग आपल्या ध्यानात येतं.. ‘तो माणूस हा असा आहे तर’ असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला त्याचा संपूर्ण अभ्यास झालेला असतो “

“मग त्यात काय नवीन सांगतोयस ?”

“अरे वेताळा, अगदी जन्म झाल्यापासूनच आपण आपले डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ या ज्ञानेंद्रियांनी आजूबाजूच्या वस्तू आजमावयाला शिकलेले असतो..ही पाच ज्ञानेंद्रिये प्रत्येक वेळेला अनुभव घेऊन तो मेंदूला पाठवत असतात. मेंदूही तो अनुभव साठवत असतो. एकदा एक माणूस दिसतो कसा हे पाहिलं की ती माहिती मेंदूमध्ये साठते.. पुन्हा दिसला की म्हणूनच तर आपण त्याला ओळखतो..”

“अरे पण याचा पदार्थविज्ञानाशी काय संबंध?”

“अरे वेताळा एखादा पदार्थ जाणून घेण्याचे विज्ञान म्हणजे पदार्थविज्ञान. एखादी अनोळखी वस्तू पहिली तरी आपण सुरुवातीला तिचा आकार, रंग, वास, चव, तापमान पाहायचा प्रयत्न करतो. तिच्याशी संबंधित आवाज कोणते आहेत ते लक्षात घेतो. म्हणजे अगदी नुकतंच जन्माला आलेलं बाळ इकडेही उत्सुकतेने पहाते, स्वतःच्या हातापायांकडे उत्सुकतेने पहाटे, वर टांगलेल्या खेळण्याकडे उत्सुकतेने पाहाते, पाळण्याकडे उत्सुकतेने पाहाते.. कारण त्याचा पदार्थांना जाणून घ्यायचा अभ्यास सुरु झालेला असतो.. पदार्थविज्ञानाचा अभ्यास सुरु झालेला असतो..”

“हे आपलं उगीचच बोलायचं बरका.. पदार्थ विज्ञानाचा अभ्यास एवढेसे मूल कसे करेल?”

 

“मी म्हटलो तसं पदार्थविज्ञान हे जाणून घ्यायचं, अजमावायचं, पाहिलेल्या गोष्टीमधला संबंध लावायचं शास्त्र आहे. कारण ते मूल वस्तू फेकते , उचलते, चावते, चाटते, वास घेते, तोडते , जोडते. हे करत असताना ते सतत पाहत असते, लक्षात ठेवत असते. ती वस्तू ढकलल्यावर कशी जाते, किती वेगाने जाते, त्या वस्तूचा लहानात लहान तुकडा कसा असतो, त्या वस्तूला तिच्या गुणधर्मानुसार तुम्ही कुठल्याकुठल्या गटात टाकू शकता, त्या वास्तूचे अविभाज्य घटक कोणते हे पाहणं म्हणजेच तर ती वस्तू किंवा पदार्थ समजून घेणं.. “

“अरेच्चा म्हणजे हे पदार्थविज्ञान म्हणजे असं निरीक्षणाचे, अनुभवण्याचे, जाणून घेण्याचे शास्त्र आहे तर.. पण मग यात सारे निर्जीव पदार्थच का घेता तुम्ही? सजीव काय पदार्थ नाहीत?”

“हे पहा वेताळा आधी आपण ढोबळ मानाने पाहू. मोठ्या आकाराच्या वस्तू आणि मग लहान आकाराच्या वस्तू. ढोबळ आकाराचे पदार्थ हे स्थायू, द्रव, वायू, तेज आणि आवाज यांद्वारे ओळखू येतात.. “

“एखादं उदाहरण दे पाहू.. “

“असं समज की काव्या नावाची मुलगी तिच्या पालकांबरोबर नवीन वर्षाच्या साठी लागणारी वह्या पुस्तके घ्यायला गेली आहे. शाळेची नवीन स्कूल बॅग सुद्धा घेत आहे. नवीन पुस्तक हाती येताच ती काय पाहील? “

 

“पुस्तकात काय लिहिलंय ते ?”

“छे.. ती पाहील पुस्तकाचे कव्हर कसे आहे? आकार कसा आहे? रंग कसा आहे? साधारण किती पाने असतील? वजनाला कसं वाटतंय? आत चित्रे कोणती आहेत? पानाचा रंग कसा आहे ? अक्षरे कशी लिहिली आहेत? नवीन पुस्तकांना कसलासा छान वास असतो तो सुद्धा ती पाहिलं.. मग विषय वगैरे आहेच.. “

“म्हणजे पदार्थविज्ञानाच्या दृष्टीने तिनं काय पाहिलं?”

“पुस्तक स्थायू असणार हे तर गृहीतच असतं.. मग त्याचे गुणधर्म म्हणजे रंग, वास, स्पर्श ती पाहिल. अगदी लहान मुले तर अनोळखी वस्तूंची चवही पाहतात. पण पुस्तकाच्या पानांच्या फडफडीतून येणारा आवाजही ती पाहिल.. मग यावरून ती मनाशी नोंद करून ठेवेल.. आकाराने मोठं, वजनाला थोडं हलकं, हिरव चित्र असलेलं, नकाशा पहिल्या पानावर असलेलं, आतली पाने पांढरट रंगाची असलेलं, नकाशांनी भरलेलं पुस्तक म्हणजे भूगोलाचं पुस्तक.. “

“पण याच काव्याच्या ऐवजी एखादा पिंटू खेळाच्या दुकानात गेला तर कसा तो पदार्थविज्ञानाचा अभ्यास करील? “

 

“मग तर काय मजाच मजा.. विज्ञानच विज्ञान.. या खेळण्याचा रंग कोणता.. त्या खेळण्यातून कसला लाईट बाहेर पडतोय, त्या तिकडच्या खेळण्याचा कसला भारी आवाज होतोय.. म्हणजे या चिंटूच्या हाती एखादी बॅट आली तर तो तिचा रंग पाहिल, आकार पाहिल, वास पाहिल, क्रिकेटियर्स क्रीज वर जशी बॅट ची टकटक करतात तसं तो फरशीवर ती बॅट ठक ठक करून पाहिल. मग त्यावर स्टिकर पाहिल. सही कोणाची आहे का पाहिल, एखादा प्लास्टिक बॉल त्या बॅट वर टाकून त्याचा आवाज कसा येतो ते पाहिल.. मग ती बॅट कशी बशी उचलून मोठ्या क्रिकेटियर सारखा उभा राहिल, कल्पनेतच एखादा शॉट खेळेल.. त्याला कळेल की बॅट जड आहे का हलकी, लहान आहे का मोठी, त्या बॅट मध्ये काय काय आहे? हॅण्डल आणि खालचे फळकुट जोडलंय.. घासून गुळगुळीत केलंय.. ते खालचं फळकूट एकाच जाडीचं नाहीये काही ठिकाणी चप्पट आहे तर कुठे फुगीर आहे.. हॅण्डल ला दोरी गुंडाळली आहे.. त्या हॅन्डल मध्ये.. “

“अरे बास बास बास.. खेळण्यांच्या दुकानात गेलेकी लहान लहान मुलं तासनतास रमून जाताना मी पाहिलीत.. पण ती असा अजाणते पणे पदार्थविज्ञानाचा अभ्यास करत असतील हे कुठे माहित होतं.. पण काय रे विक्रमा या तुझ्या विज्ञानात इतक्या व्याख्या, इतकी सूत्रे, इतकी गणिते का असतात रे? ते सांगत नाहीस, उगीच ते पदार्थ विज्ञान म्हणजे जणू काही सर्वांचा मित्रच असल्यासारखे बोलतोयस.. असेलही त्यात तसं काही.. उगीच नाही इतके भारतातले, युरोपातले आणि सर्व जगभरातले लोक या विषयासाठी आयुष्य खर्च करतात.. पण असो.. आजचा माझ्या हातातला वेळ तर खर्च झाला हा मी चाललो.. पुन्हा भेटू.. हाऽ हाऽऽ हाऽऽऽ “

वेताळ जाताक्षणी समस्त आसमंतालाच एखादी नवीन दृष्टी मिळाल्यासारखा अनुभव आला. घोडा आपल्या झापडाकडे, सारथी आपल्या लगामाकडे, सैनिक आपल्या तलवारीकडे, शेतकरी आपल्या नांगराकडे, कुंभार आपल्या मडक्याकडे, लोहार आपल्या ऐरणीकडे कितीतरी कौतुकाने पाहू लागला. या वस्तूंना जाणून घेणे म्हणजेच काही अंशी पदार्थविज्ञानाचा अभ्यास करणे हे जाणून पुन्हा त्यांची जाणून घेण्याची उत्सुकता बळावली..पदार्थविज्ञान हा एक मित्र होण्याची ही पहिली पायरीच नव्हे का?

(क्रमश:)

मूळकथा: मुखपृष्ठ

संबंधित कथा: ८वी पर्यंतचं Physics

कथांची पूर्ण यादी: गोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)