परिणामांच्या आधारे कारणे शोधणे (Cause and effect relationship in Physics)

तो प्रकार खरंच फार गंभीर होता. विक्रमासारख्या प्रजाहित दक्ष राजाच्या, न्यायी राजाच्या कोषागारातून चक्क काही हजार सुवर्ण मुद्रा चोरीला गेल्या होत्या. तीन ते चार चौक्यांचा पहारा असलेल्या कोषागारातून चोरी होणे तशी सोपी गोष्ट नव्हती. कळलीही नसती. विक्रम राजा आपल्या श्वान पथकासहीत कोषागारा समोरून जात असताना सर्व तरबेज कुत्री कोषागाराकडे पाहून भुंकू लागली, गळ्यातल्या पट्ट्याला ओढ देऊ लागली. त्यांचा तो आवेश पाहून विक्रमानेही त्यांना कोषागाराकडे जाऊ दिले आणि माग काढता काढता कोषागाराचे तोडूनही पुन्हा सांधलेले कुलूप दिसले आणि आतील सुवर्ण मुद्रांचे हंडे घासत नेल्याच्या खुणाही दिसल्या. माहितगार द्वारपालांचे पडलेले चेहरेही दिसले. एकंदर प्रकार गंभीर आहे हे पाहून तातडीने तपासाला गती देण्यात आली. हेरांचे पथक सक्रीय झाले. “कुत्र्यांनी जर गलका केला नसता तर सर्व प्रकार लक्षात यायला वेळ लागला असता.. किती लवकर वास लागतो नाही या प्राण्यांना?” विक्रम आश्चर्याने स्वतःशीच पुटपुटला.

“हो विक्रमा, हे प्राणी माणसांपेक्षा हुशार आणि तरबेज बरका!! शिवाय धन्याशी प्रामाणिक राहण्यात तर यांची बरोबरी कोणताही माणूस सात जन्मात करू शकणार नाही..म्हणजे आज पुन्हा तपास आणि कायदे आणि न्याय यांच्याच जंजाळात तुझं डोकं गुरफटलंय.. पण काय रे राजा या प्रकारच्या पद्धती तुम्ही पदार्थ विज्ञानात वापरता का कधी? तपास करणे.. ठोस पुराव्यांच्या आधारे नक्की काय घटना घडली असेल याचा मग काढणे असे काही करतात का तुमच्या पदार्थ विज्ञानात? ”

कारणे आणि परिणाम (Cause and Effect Relationship)

“वेताळा हे जरासं वैद्यकीय तपासणीसारखं आहे. समजा राजू नावाचा मुलगा सारखा शिंकतोय. त्याचं अंग दुखतंय. घसा खवखवतोय. तो चिडचिड करतोय.. खाताना जोरात खोकला येतोय.. झोपला तर खोकला येतोय.. ”

“अरे विक्रमा, मी वेताळ आहे.. डॉक्टर नाही.. हे मला का सांगतोयस? याचा पदार्थविज्ञानाशी काय संबंध?”

“नाही आहे ना संबंध.. तर राजुला हे जे काही होतंय तीआहेत त्याला झालेल्या आजाराची लक्षणे किंवा दिसणारे परिणाम.. वेगवेगळ्या आजारांची लक्षणे अगदीच वेगवेगळी असतील असे नाही.. शिवाय जेव्हा अंगात ताप आहे असं राजुला वाटतं तेव्हा डॉक्टर विचारतात की अरे राजू ताप मोजलास का ? किती ताप आहे? कारण ताप आहे असं वाटतं तेव्हा ती कणकण असेल तर थोड्या विश्रांतीनंतर बरंही वाटेल. पण ताप असेल तर मग डॉक्टर म्हणतात की सर्दी आहे का ? घसा खराब आहे का ? कारण सर्दी-ताप असेल तर वेगळा विचार करतील. सर्दी – घसा सर्व ठीक असेल आणि तरीही ताप असेल तर डॉक्टर वेगळा विचार करतील. त्यानुसार गोळ्या देतील..”

“अरे पण असं का? याचा पदार्थविज्ञानाशी संबंध काय ते सांग पटकन आता!! ”

“हो हो सांगतो. हे बघ जसे वेगवेगळ्या रोगांचे वेगवेगळे परिणाम -लक्षणे असतात आणि लक्षणे नीट ओळखली तर रोग नीट लक्षात येतो.. म्हणजे ताप विषाणू मुळे आहे की सर्दीमुळे आहे हे कळलं की डॉक्टर तशा गोळ्या देतो.. तस पदार्थ विज्ञानातही आहे.. विचार करण्याच्या, तपास करण्याच्या या प्रकाराला कारण आणि परिणाम साखळीचा माग घेणे (Cause and Effect Chain) असे म्हणतात. ”

“अरे पण पदार्थ विज्ञानात तर सर्वच निर्जीव पदार्थांबद्दल बोलता तुम्ही.. स्थायू(solid), द्रव(liquid ), वायू(gas) आणि अग्नी(fire) हे ते निर्जीव पदार्थ.. यांच्यात धडकाधडकी, हाणामारी, ओढाओढी चे खेळ चालतात त्यात आता हे कारण-परिणाम साखळ्या शोधण्याचे कसे पाहायचे? ”

“हे बघ उदाहरणच देतो. राजू, सतीश, मन्या, पिंटू आणि यश हे पाच मित्र आहेत. त्यांनीं एके दिवशी ठरवलं की कोणात किती ताकद आहे हे पाहायचं. सर्वांनी ठरवलं की क्रिकेटचा बॉल घ्यायचा आणि तो जीव खाऊन फेकायचा. ज्याचा थ्रो सर्वात लांब जाईल तो सर्वात शक्तिवान.. मग यात राजुचा थ्रो १० मी, सतीश चा ११ मी, मन्या १६ मी, पिंटू १४ मी आणि यश ९ मी असे स्कोर झाले. ”

ballThrow

“आता मला सांग वेताळा हा बॉल लांब कोणी(who) टाकला?”

“मुलांनी.. ”

“कधी(when) टाकला? तर सगळ्यांनी एकदम टाकला.. मग बॉल लांब कशामुळे गेला? ”

“सोप्पंय.. मुलांनी हातातली शक्ती लावून तो फेकला ..”

“बरोबर.. ज्या मुलांनी मन लावून लक्ष देऊन टाकला आणि ज्यांच्यात शक्तीही भरपूर होती त्यांचा बॉल सर्वात लांब गेला .. म्हणजे बोल लांब जाणे हा काय झाला ? परिणाम(effect).. पण हा परिणाम घडून कशामुळे आला ?”

“मुलांनी लावलेल्या बळामुळे(force)..”

“म्हणजेच बळ हे कारण (Force is the cause).. बॉल लांब जाणं हा परिणाम (ball throw is the effect). ”

“अरे पण यात काय नवीन सांगितलंस.. गल्लीतल्या लहानसान पोरांनाही हे माहीतच असतं ना!! ”

ball_causeNeffect

“हे बघ वेताळा या जगात स्वतःहोऊन काही हेतूने फक्त सजीवच हालचाल घडवतात..म्हणजे या खेळत मुलांनी बॉल हातात धरला.. संपूर्ण शक्ती हातात एकवटली.. म्हणजे मनाची सर्व शक्ती हातामध्ये एकवटली आणि त्या हाताने बॉल ला जोरात हिसका दिला.. या जोरदार हिसक्यामुळे तो निर्जीव बॉल लांब जाऊन पडला.. ”

“हां या फेकाफेकीत कळतंय की फेकताना लावलेले बळ हे कारण आहे आणि बॉल लांब गेला हा परिणाम आहे.. पण या फेकाफेकी सारखी काही अजून उदाहरणे दे रे .. ”

” मी आधी सांगितलं तसं स्थायू(solid), द्रव(liquid ), वायू(gas) आणि अग्नी/तेज (fire) हे ते एकमेकांवर परिणाम करणारे घटक

स्थायूवरचे परिणाम (Effects on Solids)

द्रवावरचे परिणाम (Effects on Liquids)

  • द्रवावर स्थायू (solid on liquid) – पाण्यात मीठ विरघळणे व पाणी खारट होणे
  • द्रवावर द्रव (liquid on liquid) – शुद्ध पाण्यात गढूळ पाणी मिसळणे
  • द्रवावर वायू (gas on liquid) – वाऱ्यामुळे समुद्रात वादळ तर होणे
  • द्रवावर तेज (fire on liquid) – उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होणे

वायूवरचे परिणाम (Effects on Gas)

  • वायूवर स्थायू (solid on gas) – हवेत उदबत्तीचा वास पसरणे
  • वायूवर द्रव (liquid on gas) – सकाळी दंव पडणे/ पावसाचे काळे ढग तयार होणे
  • वायूवर वायू (gas on gas) – ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डाय ऑक्साईड इत्यादींच्या मिश्रणातून हवा तयार होणे
  • वायूवर तेज (fire on gas) – सूर्याच्या उष्णतेमुळे हवा गरम होणे

तेजद्रव्यावरचे परिणाम (Effects on Fire)

  • तेज वर स्थायू (solid on fire) – वाळू टाकून आग विझवणे
  • तेज वर द्रव (liquid on fire) – आगीत तेल ओतणे व आग अजून भडकवणे
  • तेज वर वायू (gas on fire) – स्वयंपाकाच्या गॅसचा नॉब फिरवून गॅस ज्योत वाढवणे
  • तेज वर तेज (fire on fire) – दोन पणत्यांचा मिळून मोठा प्रकाश होतो

“विक्रमा अरे किती मोठी यादी दिलीस ही? ह्याच्यावर त्याचा परिणाम, त्याच्यावर  ह्याचा परिणाम!! पण हे परिणाम आणि त्याच्यामागची कारणे कळली तरी नक्की या साखळीचं करायचं काय? बर समजा ही साखळी कळली तरी त्याने फायदा काय? थोडक्यात या पदार्थविज्ञानाच्या अभ्यासाचा नेहमीच्या आयुष्यात नक्की काय फायदा होतो याबद्दल तू काहीच सांगत नाहीस? पण आता मला परत जायला पाहिजे कारण पूर्वेला आता उजाडेल काही वेळाने..येतो विक्रमा..आपल्या प्रश्नोत्तरांची साखळी मात्र संपत नाही हे खरंच..हाऽहाऽऽहाऽऽऽ ”

रात्रीचा शेवटचा प्रहर जस जसा सरत होता तस तसे सर्वांचेच डोळे पुढील दिवसाकडे लागले. हा दिवस उगवण्यामागे कारण असणारा, लक्षावधी किरणांची सृष्टीवर पाखरण करणारा तो सूर्य पूर्वेच्या डोंगरा पलिकडे विंगेत उभा होता..

(क्रमश:)

मुखपृष्ठ: मुखपृष्ठ

या प्रकारच्या इतर कथा: ८वी पर्यंतचं Physics

पूर्ण यादी: गोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)