फिजिक्सवाले इतके प्रयोग नक्की का करतात रे भौ? (Importance of Experiments in Physics)

विक्रमाच्या नवीन राजवाड्याचं काम सुरु झालं एकदाचं. पण जसं काम सुरु झालं तसं कल्पनेतला महाल आणि वास्तवातलं बांधकाम यात मेळ घालणं अवघड होऊ लागलं. विक्रमाला हव्या असलेल्या गोष्टी, महालाच्या खोल्यांची हवी असलेली रचना, त्याच्या राज्यातले बांधकामाचे नियम, हे सर्व लक्षात घेत अपेक्षित वेळ आणि खर्चात काम करणं अवघडच होऊ लागलं. विक्रम राजा तसा अनुभवीच. कागदावरच्या चित्रासारखा देखावा खऱ्यात उभं करणं हे खरंच किती अवघड काम आहे हे तो ओळखून होता. अशी कामे केलेल्या, प्रचंड अनुभव असलेल्या कारागिरांची नेमणूक त्याने मुद्दामच केली होती. कल्पना वास्तवात आणण्याच्या खटाटोपात जे कसब, शहाणपण अंगी येतं ते अतिशयच मौल्यवान धडे देऊन जातं, अनेक युक्त्या देऊन जातं. म्हणूनच तर असा प्रयोगातला अनुभव लाखमोलाचा असतो. विक्रम अशा अनुभवी कारागीरांनी केलेल्या करामती आठवतच वेताळाला भेटण्यासाठी चालला होता.

“काय विक्रमा, अरे एवढे महाल बांधलेस, बांधकामाचे नियमही तूच तयार केलेस. पण अजूनही कारागीरांच्या अनुभवालाच पसंती देतोस? ते असो. पण मला सांग पदार्थ विज्ञानात अशा अनुभवाची गरज पडते का? का पदार्थ हे नियमानुसार गपचुप चालत राहतात.. ”

“अरे वेताळा, मी म्हटलं होतं तसे नियम (rules and laws) हे अनेक निरीक्षणातून बनले. वेगवेगळ्या निरीक्षणाच्या (observations) वेळी परिस्थिती कशी होती हे पण महत्वाचे असते. ही परिस्थिती, हे बाहेरचे घटक(external factors) निरीक्षणाच्या वेळी परिणाम करू शकतात. किंबहुना करतातच. मूळच्या प्रयोग करणाऱ्याने ते परिणाम कसे टाळले होते याची माहिती लिहिलेली असेलच असे नाही. एवढं असलं तरीही ते टाळणं किंवा त्यांचे परिणाम कमीतकमी होतील असं पाहणं अतिशय महत्वाचं असतं.. नाहीतर निष्कर्ष (Inferences) काहीच्या काही निघतील.”

“उदाहरण दे रे तू नेहमीच देतोस तस.. बॉल फेकायचं उदाहरणच घे..”

“बर.. चिंटू आणि मन्या हे दोन दोस्त, अगदी बेश्ट फ्रेडन्स.. दिवाळीच्या सुट्टीत एकदा ते गावाकडच्या टेकडीवर गेले.. छोटीशीच टेकडी आणि त्याच्या एका बाजूला एक गुडघ्याइतक्या पाण्याचा तलाव.. टेकडीवरून उडी मारली की लगेच तलावात.. अशा खूप उड्या मारल्यावर दोघे दोस्त दमले आणि काय करायचं म्हणत पुन्हा टेकाडावर गेले आणि तिथून तलावात दगडं टाकत बसले.. तेव्हा राजू मन्याला म्हणाला.. ”

“काय भूक बिक लागली असेल.. पदार्थ विज्ञानाचं सांग रे ट्रिप बद्दल काय सांगत बसलायस?”

“राजुने वर्गात शिकलं होतं की दोन वेगवेगळ्या वस्तुमानाच्या (mass) वस्तू वरून खाली टाकल्या तर त्या एकदमच खाली पडतात.. त्यांच्या वजनामुळे काहीही फरक पडत नाही.. राजुला एक मोठा दगड मिळाला होता आणि एक कोंबडीचे पीसही होते.. इतक्यात काय झाले जोराचा वारा वाहू लागला.. राजुने तो दगड आणि पीस खाली टाकले.. दगड लगेच खाली पडला पण पीस मात्र वाऱ्याबरोबर वाहात वाहत लांब जाऊन बऱ्याच वेळाने खाली आले..”

“अरेच्चा.. तो नियम चुकीचा ठरला की आता? अस कसं झालं?”

“इथंच तर खरी गंमत आहे पदार्थविज्ञानाची.. मूळ नियम वाचला तर असं लक्षात येतं की कोणतेही बाहयबल काम करत नसताना किंवा त्यांचा फारसा परिणाम होत नसताना वेगवेगळ्या वस्तुमानाच्या वस्तू उंचावरून खाली टाकल्या तरीही त्या एकत्रच खाली येतील. पण या जगात, आजूबाजूच्या व्यवहारात हे अशक्यच आहे. माणसं निर्वातात किंवा व्हॅक्युममध्ये राहात नाहीत. त्यांच्या आजुबाजुची हवा, पाणी, दव, ऊन, थंडी यातलं काहींना काही परिणाम करत असतंच त्या माणसांवर.. मग त्या माणसांच्या प्रयोगांवरही ते  परिणाम करणारच. राजू आणि मन्या ज्या टेकडावर बसले होते तेथे वारा वाहू लागला.. त्यांनी टाकलेल्या दगडावर आणि कोंबडीच्या पिसावर वाऱ्याने परिणाम केलाच, फक्त कोंबडीचे पीस त्या वाऱ्याने जास्त वेळ तरंगत ठेवले.”

“पण म्हणजे या ठिकाणी नियम चुकीचा ठरलाच नाही. पण तुला काय वाटतं की व्हॅक्युम मध्ये हे दोन्ही एकदमच पडेल?”

(Video Source: YouTube)

“हो निश्चितच.. एक व्हॅक्युम ची मोठी विहीर शास्त्रज्ञांनी तयार केली आणि पुन्हा हा प्रयोग केला..नियमानुसार एक जड गोळा आणि कोंबडीचे पीस एकदमच खाली पडले.. ”

“म्हणजे विक्रमा तुला असं म्हणायचंय की विज्ञानातलं तत्व किंवा नियम माहिती असणं जितकं महत्वाचं आहे तितकंच त्या प्रयोगाच्या साठी लागणारी परिस्थिती तयार करणंही आवश्यक आहे..”

“प्रश्नच नाही वेताळा. पदार्थविज्ञानातले तत्व पुस्तकात वाचणे सोपे असते पण तो प्रयोग खऱ्यात आणणे तितकेच आव्हानात्मक असते, किंवा त्यातच खरी मजा असते. म्हणजे बघ माणसाला कळलं की जंगलात आग लावणारा अग्नी आपल्याला थंडीपासून वाचवू लागतो, पण तो चुलीत किंवा शेगडीत राहील तोपर्यंतच ठीक. नाहीतर आपणच लावलेल्या आगीत आपणच जळून जायचो. ह्यातच माणसाच कौशल्य पणाला लागतं. माणसाच्या ह्या धडपडीतूनच तो अशी तंत्रं किंवा टेक्निक्स तयार करत गेला. ह्यालाच आपण तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजी म्हणायला लागलो. मूळचं तत्व किंवा नियम आपल्या उपयोगात आणायच्या धडपडीतूनच ही तंत्रं विकसित होत गेली .. ”

“पुरेपूर वापर करतोस, एकही संधी सोडत नाहीस माणसाची स्तुती करायची. पण कायरे? माणूस हे सर्व पाहात होता, परिस्थितीशी झगडत होता तर त्याच्या मदतीला कोण धावून आलं शेवटी? त्याची बुद्धी हे माहीतच आहे तू सांगणार मला.. इतर माणसांशी तर तो भांडलाच असणार. त्याच्या आजूबाजूच्या वातावरणातलं कोण आलं त्याला सोडवायला? आग, थंडी, पावसापासून वाचवायला? माहिती आहे का काही याची? पण किती वेळ घेतोस रे तू आणि मुख्य सांगतच नाहीस..हे गप्पांचं तंत्र तुला चांगलंच जमतं.. पण आता उशीर झाला.. मला जायलाच हवंय.. येतो मी विक्रमा.. हा हा हा ”

विज्ञानातून तंत्रज्ञान कसं आलं याची कहाणी मजेशीर होती. पण सर्वांना उत्सुकता लागली होती की माणसाच्या मदतीला कोण धावून आलं हे जाणून घ्यायची. बाजूचा निळाशार डोंगर, खळखळ वाहणारी नदी, शेकोटीतली आग, वाहणारा वारा आणि वनातले चित्र विचित्र आवाज यांच्याकडे उत्तरं होती..पण ते उत्तर विक्रमाने देण्याची ते वाट पाहत होते.. तुम्हाला कळलं का उत्तर?

(क्रमश:)

यासारख्या आणखी गोष्टी : ८वी पर्यंतचं Physics

कथांची पूर्ण यादी : गोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)

मूळ पान : मुखपृष्ठ