पृथ्वी, अग्नी, जल, वायु आणि आकाश: आपले बेष्ट फ्रेंड्स (Five Super Elements that help us live..)

काही काही गोष्टी इतक्या नेहमीच्या, वापरातल्या, ओळखीच्या असतात की आपल्याला त्यांची दखलच घ्यावीशी वाटत नाही. जसं रोजचं सूर्याचं उगवणं, दिवस-रात्र एका मागोमाग येत राहणं भले ते दिवस कितीही गडबडीचे असोत, श्वासांचं चालू राहणं भले रोजच्या घाईच्या जीवनात ते कितीही घाईघाईने घेतलेले असोत, पाण्याचं खळखळणं भले ते चालू राहिलेल्या नळाचं असो, वाऱ्याच वाहणं भले तो बसच्या उघड्या खिडकीतून येणारा असो, आजुबाजुच्या पक्षांचा आवाज भले ते कावळे असोत, अग्नीच्या निळ्या पिवळ्या ज्योती भले त्या घरगुती गॅस च्या असोत.. ह्या आणि अशा हजारो गोष्टी रोज घडत असतात आजूबाजूला.. पण सवयीने त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं.. विक्रम अशा दृष्टीसमोर असूनही दुर्लक्षित गोष्टींविषयी विचार करत चालला होता.. अर्थात अमावस्येची रात्र आणि त्याच्या पायाखालची वाटही त्याला अशाच ओळखीच्या झाल्या होत्या.. वाटेवरचे खड्डेही तो सवयीने चुकवत होता..

“खरंच रे विक्रमा, सवयीचा गुलाम आहेस झालं.. अरे रस्त्यातले खड्डे तुझ्या सेवकांनी बुजवले तरी अधीसारख्याच उड्या मारत येतोस.. एकदा कशाची सवय पडली की माणूस दुर्लक्षच करतो रे तिकडे.. गृहीतच धरून चालतो.. पण काय रे विक्रमा पदार्थ विज्ञानात आहेत का रे अशा सवयीच्या आणि त्यामुळे दुर्लक्ष झालेल्या गोष्टी? ”

“आहेतच ना वेताळा, माणूस हा मुळातच एक अतिशय स्वार्थी प्राणी..आपलं काम साधणारा..भले त्यासाठी दुसऱ्याचा जीव गेला तरीही याला फरक नाही..”

“वा वा..मस्त वाटतंय ऐकून..शेवटी खरी परिस्थिती तुला कळली तर..हा पुढे बोल..”

“आजुबाजूच्या दिसेल त्या गोष्टीचा मला काय उपयोग होईल याचाच तो विचार आधी करतो..सुरुवातीच्या काळातल्या माणसाला लक्षात आलं की आपल्याला थंडी, वारा, पाऊस यांपासून वाचण्यासाठी निवारा ( Shelter) पाहिजे, वेळच्यावेळी खायला(Food) पाहिजे आणि घराबाहेर पडलं की अंगावर काहीतरी कपडे(Clothing) पाहिजेत..”

“अरे आता माणसाची जन्मकथा सांगणार काय? मुद्दा काय?”

“सांगतो, सांगतो. या माणसाला सृष्टीतल्या ऊन, पाऊस, वारा, थंडी पासून बचाव करेल अशी काहीच नैसर्गिक सोय नाही..कुत्री मांजरी भिजली की अंग झटकतात तशी सोय नाही, मेंढ्यांच्या अंगावर लोकर उगवते तशी सोय नाही, सरडा रंग बदलतो तशी सोय नाही, भक्ष मारायला वाघ-सिंहांना नख्या असतात, संरक्षणासाठी बैलांना, गेंड्यांना शिगं असतात असलं काही म्हणजे काही माणसाला निसर्गानं दिलं नाही.. पण आपल्याकडे काय नाही हे सांगणारी बुद्धी त्याला निसर्गाने दिली. पाऊस आला की मग त्याने आडोसा शोधायला सुरुवात केली. डोंगरांमध्ये मग तो गुहा शोधायला लागला. पण त्या तरी कुठे मिळायला..मिळाल्या तरी त्यात वाघ – सिंह आहेतच बसलेले.. मग पठ्ठ्याने काय करावं? त्याने आपल्या बुद्धीचा वापर केला आणि सृष्टीला आवाहन केलं..मग सृष्टीने दणकट असे स्थायुरूप वा पृथ्वीरूप दिले. पाण्यापासून, वाचावं म्हणून दणकट, पक्के असे स्थायुरूप दगड दिले. गुहेत त्याने आडोसा पहिलाच होता. मग दगडांपासून भिंती आणि वर आजूबाजूच्या पानांपासून छत बनवलं. छोटे मोठे दगड एकत्र ठेवायला मातीचा वापर सुरु केला. अशा प्रकारे त्याला आडोसा घ्यायला या स्थायुरूपाने खूप मदत केली.. पण यावर त्याचे काही भागेना!”

“म्हणजे?”

“एकदा का उनपावसापासून वाचला की मग त्याला वाटले की छप्पर तर आहे.. पण कमालीचं थंड..पावसात भिजलं तर ही थंडी जीवावरच बेतायची. त्यात याच्या अंगावर थंडीपासून वाचायला काही नाही.. मग स्वतः:ला गरम ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले.. दोन दगडांच्या घासण्यातून अचानक सृष्टीने त्याला तेज म्हणजेच उष्णतेची भेट दिली आणि माणसाची सोय झाली.. मग स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी पाण्याने मदत केली.. आता समस्या आली खाण्याची .. ”

“कसं काय? तो इतर प्राण्यासारखाच प्राणी मारून खात होता ना ?”

“हो.. पण चित्त्याच्या वेगासमोर, वाघसिंहाच्या पंजा व नख्यांसमोर, मगरींच्या दातासमोर या माणसाचा काय निभाव लागणार? मग पुन्हा बुद्धी आणि निसर्गाला प्रार्थना.. मग त्यांने वेगवेगळी शस्त्रे शोधली लहान मोठ्या आकाराच्या स्थायुंचा वापर करून.. मग त्या काठ्या असोत, तासलेले बाण असोत..तासायलाही दगडच कामी आले. तो मारलेलं सावज आधी कच्चेच खायचा.. पुढे अग्नी आणि पाणी किंवा आपद्रव्य यांचा उपयोग करून अन्न शिजवू लागला.. याच दरम्यान हवेचं किंवा वायुद्रव्याचं त्याला महत्व कळू लागलं असावं.. उनपावसापासून सुरक्षित राहायला घरं बांधायला लागला पण जीव गुदमरू नये म्हणून खिडक्याही ठेवू लागला.. म्हणजे पाहा स्थायू(solids), द्रव(liquid), वायू(gas) आणि अग्नी किंवा तेज(heat) हे सृष्टीतले घटक त्याच्या मदतीला धावले आणि माणसानेही बुद्धीचा उपयोग करून ते वापरले.. ”

“पृथ्वी(solids), आप(liquids), तेज(heat), वायू(gases) यांचं कळलं..आकाश द्रव्य राहीलच की!! या पाचांचा मिळून गट होतो ना?”

“हो.. ऋषी कणादांनी आणि नंतर प्रशस्तपाद ऋषींनी सांगितलेलं वैशेषिकातलं पाचवं द्रव्य म्हणजे आकाश म्हणजे माणसाच्या भोवतालच्या आवाजांची दुनिया.. waves.. मग तो ढगांचा गडगडाट असो, मोरांची केका असो, मांजराचं म्यांव असो, बेडकाचे डराव असो.. हे माणसाच्या आजूबाजूचं ध्वनीचं विश्व् म्हणजेच आकाश.. या आकाशाचा मुख्य गुण म्हणजे तरंग.. सजीवांच्या सुरांचे आणि निर्जीवांच्या ध्वनींचे.. ”

“पण या आवाजांचा माणसाला काय उपयोग झाला ? नुसताच गोंगाट नाही का?”

“या आवाजांचा त्याच्या जगण्यासाठी खूप उपयोग झाला. मग ते इतर माणसांशी दोस्ती किंवा भांडण असुदे. इतर प्राण्याशी मैत्री करणं असुदे.. जंगलातल्या प्राण्याच्या आवाजावरून धोक्याचे संदेश ओळखणं असुदे.. शीळ वाजवून कुत्रे, मांजरी यांच्याशी मैत्री करणं असुदे या सगळ्यात हे आकाश तत्वच कामाला आलं.. शिवाय निसर्गातल्या विविध निर्जीव वस्तूंच्या आवाजावरून तो त्यांच्या विषयी अंदाज बांधू लागला.. त्यांना ओळखू लागला.. पोकळ असलं की मोठा आवाज.. भरीव असलं की कमी आवाज.. उथळ पाणी असेल तर खळखळ जास्त.. खोल असेल तस शांत.. असे खालच्या पट्टी पासून ते वरच्या पट्टीपर्यंतचे सात सूर त्याला या निसर्गातल्या आकाश तत्वानेच शिकवले..”

” या पाच तत्वांना भारतीय ऋषींनी म्हणूनच अतिशय मान दिला. पण विक्रमा ही पाचच का धरतात? खरेतर स्थायू म्हणजेच सोलिड्स अनेक आहेत..डोंगर, दगडी, लोखंड, सोनं, प्लास्टिक तसेच लिक्विड्स पण अनेक आहेत पाणी, विविध तेलं, तीच गत गॅसेसची म्हणजेच हवा, त्यात ओक्सिजन, नायट्रोजन, हवेतलं बाष्प..मग ही पाचच का धरली जातात? ”

bestFriends_fiveelements

“वेताळा, शाळेत जशा मुलांच्या तुकड्या किंवा divisions असतात तशा या द्रव्यांच्या पाच तुकड्या आहेत, पाच गट आहेत..पृथ्वी म्हणजे स्थायूंचा (solids), आप म्हणजे द्रवांचा(liquids), तेज म्हणजे अग्नि(heat or fire), वायू म्हणजे गॅसेस(gas) आणि आकाश हा आवाजांचा (waves), ध्वनिंचा गट..या पाचही गटांमध्ये अनेक द्रव्ये आहेत. गटांतील वेगवेगळ्या वस्तू आपण वेगवेगळ्या कामांसाठी वापरतो म्हणूनच ते माणसांचे मित्र आहेत. वेळेला अडचणीला मदतीला येतो तोच खरा मित्र तसेच हे आपले मित्र..”

“कसले डोंबल्याचे मित्र आलेत विक्रमा..माणसाने तर काही मैत्री नाही पाळलेली..स्थायुरुप डोंगर मित्र म्हणावे तर ते पोखरलेले आहेत..soil pollution..द्रवरूप पाणी वाहून नेणाऱ्या नद्या प्रदूषित आहेत..water pollution..वायुरूप हवा वेगवेगळ्या घातक वायूंनी भरत चालली आहे..air pollution..तेज मित्र म्हणावे तर जंगलाला, शेताला लावलेल्या आगी विनाश करत चालल्या आहेत, इधनं जाळून पृथ्वीवरची उष्णता वाढत चालली आहे..excessive fire or heat..ध्वनि किंवा आकाश मित्र म्हणावं तर गोंगाट वाढत चालला आहे..sound pollution..हे सर्व माणसानेच त्या मित्रांचा आदर न ठेवल्याने, गैरवापर केल्याने घडत आहे..पण विक्रमा मला तू या पाच गटांबद्दल हे सांगितलं नाहीस की या द्रव्यांचा आवाका माणूस लक्षात कसा घेतो? त्यांची मोजमापे कशी करतो? त्यासाठी कोणते द्रव्य वापरतो..अर्धवटच माहिती देतोस झालं..पण आता वेळ झाली परत जाण्याची..पुन्हा भेटू विक्रमा..हाऽहाऽऽहाऽऽऽ”..

वेताळ गेला..पण सर्व प्रजाजनांना मात्र आपण दुर्लक्षित केलेल्या या पाच मित्रांची जाणीव प्रकर्षाने झाली..केवळ माणसाला जगण्यासाठी कामाला येणाऱ्या पण तरीही माणसानेच पुन्हा निर्जीव म्हणून हिणवलेल्या या द्रव्यांच्या महाखजिन्याची सर्वांनाच पुन्हा आठवण आली..यांच्याशिवाय या पृथ्वीवर जगणं अशक्य आहे हे ही कळलं..पण तरीही यातलं खरंच काही कळून माणूस कितपत सुधारेल याची खात्री कोणालाच देता येत नव्हती..आधीच अमावस्येची असलेली रात्र या चिंतेने अधिकच गडद झाली..

(क्रमश:)

मूळ गोष्ट: मुखपृष्ठ
या प्रकारच्या इतर गोष्टी: ८वी पर्यंतचं Physics
गोष्टींची पूर्ण यादी: गोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)