पिंड अर्थात मॅटर काय आहे? (Why knowing the ‘Matter’ is Vital)

एकंदरीतच माणसांना एकाच मोजपट्टीने मोजणं तसं अवघडच आणि त्या माणसांना तसं एकाच तराजूत टाकणं हे त्या माणसांसाठीही अन्याय करण्यासारखंच. खरंतर कोणत्या माणसाला कोणत्या कामासाठी नेमलं आणि त्या माणसाने तसं काम केलं की नाही या सगळ्यात त्या निवडलेल्या माणसाचा तसा वकूब किंवा क्षमता होती की नाही आणि ती निवडणाऱ्या माणसाला नीट माहित होती की नाही हे सगळ्यात महत्वाचं. तसं बघायचं तर औषधी नाही अशी वनस्पती नाही आणि कामाला येणार नाही असा माणूस नाही असं म्हटलंच आहे. पण तशी योजना करणारा मात्र दुर्लभ. विक्रमाच्या सतत चिंतन आणि मननातही हाच विचार..प्रत्येक माणसाचा वकूब काय, विशेष काय, क्षमता काय किंवा त्या माणसात त्याला ‘जे’ हवं होतं ते त्या माणसात आहे की नाही..

“अरे काय रे विक्रमा, हे काय चाललंय तुझं जे आणि ते चं चिंतन. तुम्ही राजेलोक, तुम्हाला लोकांची परख असणं आवश्यक..हा राजा आणि प्रजा यांचा विषय जरी बाजूला ठेवला तरीही ही पारख करताना सगळ्यात पहिलं काय महत्वाचं?”

“पदार्थविज्ञानाकडे येण्याआधी वेगळ्या पद्धतीनं थोड उत्तर देतो. एखाद्याला गायक व्हायचं असेल तर सुरांची नैसर्गिक जाण आणि गाणारा गळा हवाच, तालमीतनं त्या गळ्यावर संस्कार होतील. पण मुद्यात सुरांची जाण आणि गळा नसेल तर सर्वच कष्ट व्यर्थ आहेत. एखाद्याला पैलवान व्हायचं असेल तर मुळातली अंगकाठी तशी हवी..तुकाराम महाराज म्हटले होते तसे पाहिजे जातीचे..इथे जात म्हणजे नैसर्गिक क्षमता  ..मूळ क्षमता..ती नसेल तर अपेक्षिलेली कामे व्हायची नाहीत..ते  कार्य होणे नाही..”

“माणसांचं साधारण कळतंय..गायक व्हायला तसा पिंड हवा..जे करणं अपेक्षित आहे तसा पिंड हवा..पण फिजिक्समध्ये असा पदार्थांचा पिंड काही असतो का? काय म्हणतात त्या पिंडाला?”

“वेताळा, वैशेषिकात सांगितले तसे पदार्थाचे पिंड नऊ प्रकारचे असतात. पृथ्वी(solids), आप(liquids), तेज(heat), वायू(gas) आणि आकाश (plasma) हे आपल्या ज्ञानेंद्रियांना जाणवणारे पिंड. पण हे स्वत:हून काहीच न करणारे. यांच्यावर  क्रिया करतात ती मन(mind) आणि आत्मा(soul) ही द्रव्ये. पण या दोघांना दाखवून देता  येण्यासारखे किंवा सेन्स करण्यासारखे अस्तित्व नाही. वैशेषिकात सांगितल्याप्रमाणे मन हे आत्म्याचे साधन किंवा टूल. शिवाय दिक् (space) आणि काल (time) ही दोन द्रव्ये म्हणजे केवळ उदासीन असणारी द्रव्ये.  त्यांना सुद्धा आपल्या ज्ञानेंद्रियांनी जाणता येत नाही. त्यांना आपण मोजपट्ट्या किंवा फ्रेम ओफ रेफरन्स म्हणून वापरतो, म्हणजे नेहमीच्या व्यवहारात आणि फिजिक्स मध्ये आपण गृहित धरतो ती पृथ्वी इत्यादि पाच द्रव्ये. द्रव्ये कसली पाच द्रव्यांचे प्रकार. या पाचांपैकी आकाश किंवा ध्वनि याचा विचार वेगळा. कारण तो ही तरंगाच्या (waves) रूपात दाखवता येतो, पण ध्वनिचा कण (particle) दाखवता येत नाही. म्हणजे शेवटी आपल्याला पृथ्वी, आप, तेज आणि वायू हे कणांच्या रूपात दाखवता येतात आणि ध्वनि हा तरंगाच्या रूपात दाखवता येतो. पण नेहमीच्या ढोबळ आकाराच्या वस्तूंमध्ये ही द्रव्ये मिश्रितरूपात असतात.”

“उदाहरण देरे..”

“हे बघ वेताळा आंबा हा पदार्थ घेतला तर त्याची कोय आणि साल ही स्थायू किंवा सॉलिड, त्यातला रस हा द्रव किंवा लिक्विड. शिवाय ते एक उष्ण फळ समजतात, म्हणजे तेजही आले. ही उष्णताच कच्च्या हिरव्या कैरीचे केशरी आब्यात रूपांतर करते. दुसरं उदाहरण म्हणजे मंदिरातली घंटा. वाजवली की आवाज येतो, पण तो आंब्यातून कोय काढून दाखवावी तसे कण दाखवता येत नाहीत. पण तरंग दाखवता येतात. यातील स्थायू, द्रव, वायू आणि उष्णता किंवा तेज यांचे कण दाखवता येतात. स्थायू, द्रव आणि वायू यांचे कण असतात म्हणूनच त्यांना वस्तुमान असते. पोलादाचे कण जड, पाण्याचे त्या मानाने हलके आणि हवेचे तर त्याहूनही हलके . पण काही काही लाकडे स्थायू असूनही पाण्यापेक्षा हलकी असतात. हे सगळं त्या द्रव्याचा कण कसा आहे यावर ठरतं. या कणालाच मॅटर असं पारंपारिक किंवा क्लासिकल फिजिक्स मध्ये म्हणतात.”

“पण विक्रमा या कणांची एवढी काय महती आहे रे ? हे मॅटर एवढं महत्वाचं का आहे ?”

“वेताळा हा कण असला तरच वस्तुमान असतं, वस्तुमान असलं तरच वजन असतं, म्हणजेच पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बळ आणि इतर बाह्यबळे त्यावर परिणाम करतात. कण असला तरच त्याला जडत्व असतं. केवळ एका कणामुळेच ही सारी भुते त्याला येऊन चिकटतात. विशेष म्हणजे भारतीय फिजिक्स चे आद्य प्रवर्तक यांचे नाव सुद्धा या कणावरूनच ऋषी कणाद असे पडले होते. काय हा  योगायोग! आहे की नाही हे मॅटर मजेदार?”

“पण मग विक्रमा यातला कुठला कण कुठं वापरायचा हे कस ठरवायचं?”

“हे बघ वेताळा, लोखंडासारखं वस्तूला कवच घालायचं, दगडासारखा आधार द्यायचा, हिऱ्यासारखा कठिणपणा पाहिजे, लोखंडी करवतीने दुसरी वस्तू कापायची आहे तर स्थायू किंवा सॉलिड्स चांगले. पण प्रवाहीपणा पाहिजे, कमी कष्टात पुढं न्यायचंय, डिंकासारख्या दोन वस्तू चिकटवून ठेवयाच्यात, दुसऱ्या वस्तू विरघळवायच्यात तर द्रवच पाहिजे. हवेपेक्षा हलकं व्हायचंय तर वायुरूप पाहिजे. अशाप्रकारे मानवनिर्मित पदार्थ असतील तर कोणतं काम हवंय त्यानुसार द्रव्य निवडलं जातं, कोणतं मॅटर वापरायचं हे ठरवलं जातं.”

“म्हणजे पदा्र्थाचं असणं किंवा वागणं हे या मॅटर वर अवलंबून असतं. पण हे मॅटर कोणतं आहे हे कळलं की काय होतं नेमकं? शिवाय हे मॅटर काय आहे हे कसं कळायचं? हे काहीच सांगत नाहीस. आधीच गोंधळात टाकणाऱ्या या विषयात पुन्हा हे कण (particle) आणि तरंग (wave) याविषयी सांगून  गोंधळ मात्र वाढवलास हे नक्की. ते असो, पण आता वेळ झाली, या मॅटर वाल्या हाडे, स्नायू, रक्त, मांस यांनी बनलेल्या शरीरातून पुन्हा बाहेर पडायची, येतो विक्रमा..पुन्हा भेटू..हाऽहाऽऽहाऽऽऽ”

(क्रमश:)

मूळपान: मुखपृष्ठ

याप्रकारच्या अन्य गोष्टी: १२वी पर्यंतचं Physics

गोष्टींची यादी: गोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)