Exam Special: भर एक्झाम हॉल मध्ये पेपर लिहिताना डोकं ब्लॅंक होतं, उत्तरच सुचत नाही तेव्हा…!!! (Use of mind-mapping technique while trying to remember answers in exam hall)

राजा विक्रम जसा कर्तव्य निष्ठुर, न्यायप्रिय आणि प्रजाप्रिय राजा होता तसा तो प्राणीप्रिय राजा ही होता आणि त्याला ही प्राणी अतिशय आवडत असत. राजा विक्रम जेव्हा अश्वशाळेत जाई तेव्हा सारे घोडे खिंकाळू लागत, जणू काही सर्व घोड्यांना विक्रमाने आपल्याकडे यावे आणि कुरवाळावे असे वाटे. विक्रमही सर्वांच्या मानेवरून प्रेमाने हात फिरवी. तीच गोष्ट गजशाळेची. विक्रमाने गजशाळेत जाण्यासाठीची वर्दी दिली की सारे हत्ती त्यांचे सुपाएवढे कान फडकावू लागत. वर्दी आल्यावर दरबारातले प्रधान उठायला उशीर लावतील एकवेळ, पण सारे महाकाय, रुद्र दिसणारे हत्ती क्षणात त्यांच्या अंगावरील साखळदंडांची सळसळ करत उभे राहात असत, अंग झटकत असत. इतकंच काय तर जंगलातील माजलेले हत्ती, घोडे यांना काबूत आणण्यात विक्रमाचा हातखंडा होता. राजा विक्रमही जंगलात येत असताना अशाच प्राण्यांचा त्यांच्या स्वभावाचा विचार करतच येत होता. दर अमावस्येला भेटणारे एक भेसूर, रोखून पाहिल्यासारख्या डोळ्यांचे घुबड सुद्धा विक्रम आला की जणु हसत असे..

“अरे विक्रमा, घुबडांनाही सोडलं नाहीस? ते काय तुझे प्रजाजन आहेत का दरबारी चाकर? पण म्हणजे नक्की कसे काय वशीकरण करतोस रे त्यांचं? मन(mind) हे द्रव्य आहे असं समजलं तरीही हे कसं करता तुम्ही?”

“वशीकरण वगैरे काही नाहीरे वेताळा. त्या प्राण्यांना सुद्धा मनच असतात नाही का? ते जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा, त्यांना राग येईल भिती वाटेल असं काही करायचं नाही. त्यांच्या अंगावर आपण जाणार नाही, त्यांच्यावर हल्ला आपण करणार नाही असा त्यांना विश्वास द्यायचा त्यांना, शिवाय थोडा धीर द्यायचा त्यांना. एक टेक्निक आहे रे हे..माणसाने आपल्या बुद्धीने असे काही उपाय शोधून काढले आहेत त्यामुळे तो असे करू शकतो..”

“नाही आता तू माणसाच्या बुद्धीकडे पुन्हा जाऊ लागलास, तुला वाटलं असेल कितीही बोलू शकू आपण..पण मग एक सांग..राजू हा एक नेहमी खेळणारा, शाळेत जाणारा मुलगा आहे. टी.व्ही. बघतो, मोबाइल गेम खेळतो, होमवर्क सुधा करतो जमेल तेव्हा..पण..पण..पण..जेव्हा परीक्षेत पेपर लिहायला जातो..म्हणजे असं पाहा की एक्झाम हॉल मध्ये तो राजू बसलाय, क्वेश्चन पेपर हातात आला, राजूने प्रश्न वाचले आणि ..आणि..”

“अरे हे काय वेताळा, मी तुला कधी असं घाबरलेले पाहिले नाही..वेताळ घाबरला हे आश्चर्यच म्हणायचं..पुढे सांग..”

“अरे राजा, परीक्षा, पेपर, मार्क म्हटलं की भले, भले अतिरथी, महारथी घाबरतात, भुते खेते म्हणतात आम्ही भूतेच बरे..ते मनुष्य जन्माला जाणं नको, परीक्षा देणं नकोे, नापास व्हायची भिती नको..काहीही नको..तर मी वेताळ तरी काय वेगळा असणार..तर अशा भर पेपरात डोकं ब्लॅंक झालं तर काय करायचं रे? सांग, सांग, तुझ्याकडे उत्तर नसेल तर तुझी काही खैर नाही बघ..”

“सांगतो, सांगतो. आणि अगदी शास्त्रशुद्ध भाषेत सांगतो..एक माणसाच्या मेंदूची गंमत सांगतो. जेव्हा काही नवीन माहिती माणसाला मिळते..म्हणजे डोळ्यांनी तो काही पाहतो, कानाने ऐकतो, नाकाने वास घेतो, स्पर्श करतो, जिभेने चाखतो..ही सारी माहिती मेंदू मध्ये साठते..”

“मग विक्रमा, अभ्यास करताना वाचलेले, पाठ केलेले पण साठत असेल ना? का ड्रेनेजमध्ये जाते मेंदूच्या?” वेताळाने वैतागून विचारले.

“वाया जायला काय झालं? वाचलं की सहसा लक्षात राहतंच थोडं..यात दोन गोष्टी आहेत. अभ्यासाचा विषय आवडीचा नसला आणि आइ-बाबांनी हट्टाने अभ्यासाला बसवलं असेल, तरीसुद्धा लक्षात राहतं बरका! पण विषयच न आवडणे या कारणामुळे मग मनच अडून बसतं. घाबरलेला घोडा जसा पुढं सरकतच नाही, पुढं जातच नाही तसं आपलं मन अडून बसतं..”

“अरे होरे कळलं मला. तीच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने सांगतोयस. पण करायचं काय? आणि मेंदू कसे साठवतो असं काहीतरी सांगत होतास..”

“हो, तर जेव्हा मेंदूकडे माहिती येते तेव्हा तो ती चित्राच्या स्वरूपात साठवतो. ती चित्रं अशी दिसतात.. ”

“अरे चित्र कसली ओक्टोपस वाटतायत ते..किंवा असे मोठ्या डोक्याचे व पातळ पायाचे विचित्र प्राणी..शी:..किंवा थोडं बरं बोलायचं झालं तर कोळ्यांची अशी एकमेकाला जोडलेली जाळीच जणु काही..”

“आता याला कोळ्याची जाळी म्हण किंवा सुंदर गोलाकार रांगोळी म्हण, मेंदूला जेव्हा नवीन माहिती कळते तेव्हा तो अशाच रांगोळ्या काढतो हे निश्चित आहे. जशी जशी महिती मिळत जाते तसे तसे हे रांगोळ्यांचे जाळे अधिकाधिक घट्ट, दाट, गहिरे होत जाते. यांनाच न्युरॉन्स आणि सिनॅप्सचे जाळे म्हणतात..हे जाळं जसं गहिरं होतं तसं माहितीही अधिक साठली आहे हे निश्चित होतं..”

“अरे काय रे हे विक्रमा! म्हणजे अभ्यास करत असताना केलेली घोकंपट्टी ही जशीच्या तशी डोक्यात जाऊन बसत नाही म्हणतोस? सारी माहिती अशी रागोळ्यांच्या रूपात साठते. मग बिचाऱ्याचे सारे कष्टच वाया गेले म्हणायचे की..मला वाटले तुझ्याकडे काही आयडिया असेल..तू तर त्या टेन्शन मध्ये बसलेल्या, घाबरलेल्या राजूला आता जाळी विणायला लावतोयस..काय रे हे? करायचं काय त्याने ऐन वेळेला?”

“टोनी बुझान नावाच्या ब्रिटिश मानस शास्त्रज्ञाने हे ओळखलं आणि mind mapping नावाचं टेक्निक शोधून काढलं. यात विशेष काही नाही. घरी चकली पाडताना सोऱ्या जसा गोल गोल फिरवत चकली सेंटर कडून बाहेर कागदावर टाकत येतात तशी एक मध्यभागी असा ढग काढायचा आणि त्याला हवे तसे, हवे तिकडे पाय फोडायचे आणि आठवतंय तसे लिहित सुटायचे. अजिबात विचार करायचा नाही इकडचा-तिकडचा. जितकं सुचतंय तितकं लिहित जायचं त्या मुख्य सेंटर भोवती..मग आजुबाजूच्या एखाद्या पॉईंट विषयी अजून काही आठवलं तर त्या पॉईंट भोवती ढग काढायचा आणि लिहित सुटायचं..आधी काय लिहायचं, मग काय लिहायचं असा विचार नाही करायचा..मेंदूतून डाऊनलोड होतंय तोपर्यंत ते होऊ द्यायचं..त्याला अडथळे नाही आणायचे..काही वेळाने,,म्हणजे परिक्षेत २-४ मिनिटांनी हे सुचायचा स्पिड कमी होतो व सुचणं थांबतं..तो पर्यंत हा मॅप काढत राहायचं..जे डोक्यात आहे ते कागदावर येऊ द्यायचं..कोणताही विचार कारायचा नाही..”

“अरे पण भितीने काही सुचतंच नसेल तर?”

“मग अशावेळी चक्क ब्रेक घ्यायचा..उत्तर लिहायला भरपूर वेळ आहे असे समजायचं. एखादं आवडतं कार्टून छोटा भीम, पिकाचू, डोरा, किंवा काय काय असतं ते काढायचं किंवा भिती वाटत असेल तर देवाचं किंवा ज्या कशाने आधार वाटतो त्याचं जमेल तसं चित्र काढायचं..थोडं हुश्श झालं..की त्या चित्राभोवती ढग काढायचा वर सांगितला तसा आणि पेपर मधले सर्व प्रश्न पुन्हा वाचून पाहायचे. त्यातला एखादा जरा जरी ओळखीचा वाटला की त्या विषयी जे काही आठवतंय ते असे चित्र धडाधड काढत सुटायचे..एकदा का थोडं लिहिलं की भिती थोडी कमी होतेच बरका..थोडा काय म्हणतात तो कॉन्फिडन्स येतो..”

“अरे विक्रमा, तू नक्कीच नापास करणार मुलांना. उत्तर लिहायच्या ऐवजी चक्क चित्रं काढायला लावतोयस?”

“अरे वेताळा, परीक्षेची उत्तरे ज्या उत्तर पत्रिकेत किंवा answer sheet मध्ये लिहितो त्यात उजव्या बाजूला उत्तरे लिहायची आणि डाव्या बाजूला किंवा प्रत्येक पानाच्या बॅक साइडला ही चित्रं काढायची..फक्त त्या पानावर कच्चं काम किंवा rough work असं स्पष्ट लिहायचं. म्हणजे उत्तर तपासणाऱ्या टिचरना कळेल की मुलाचं हे रफ काम आहे. मग एकदा रफ काम लिहून झालं की त्यावरून त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं..पुन्हा क्वेश्चन पेपर पाहायचा. लिहिलेल्या उत्तराचा पेन्सिलने टिकमार्क करायचा मनात. पुन्हा दुसरा कुठला प्रश्न ओळखीचा वाटतोय का ते पाहायचं..परीक्षेचा, पेपराचा वेळ संपवेपर्यंत खिंड लढवायची..”

“हो म्हणजे दुसऱ्या कोणाला विचारण्यापेक्षा, कॉपी करण्यापेक्षा हा उपाय बरा आहे. शिवाय अपराधीपणाही नाही. जे येत होतं ते लिहिलं हा कॉन्फिडन्स येतो तो वेगळाच. कॉपी करण्याची सवय अशा नापास होण्याच्या भितीपोटीच लागत असवी. अशा टेक्निकने १० मधले ५-६ प्रश्न निदान अटेम्प्ट तरी करता येतील. थोडे मार्क वाढले तर बोनस मिळतो तो वेगळाच..”

“नाही सांगतोयस ते छान वाटतंय..एखादं उदाहरण दिलंसतर बरं होईल..”

“बरं, समजा पेपर मध्ये विचारलंय की ..respiratory system ची माहिती द्या…respiratory म्हणजे काहीतरी श्वास घेण्याविषयीचं असतं असं आठवतंय..तर लगेच डाव्या बाजूच्या पेपर वर # rough work असं लिहायचं आणि त्या खाली respiratory system असं लिहायचं आणि त्या भोवती ढग काढायचा..”

“अरे विक्रमा, आठवत नाही म्हणता म्हणता राजूने बरंच काही लिहिलं की रे इथे?”

“हो वेताळा, काहीच आठवत नाही असं होणं अवघडच आहे. पण वाक्येच्या वाक्ये आठवणे सुद्धा अवघड आहे. इतका मॅप काढल्यावर राजू respiratory system वर दोनचार वाक्ये सहज लिहू शकतो. ५ मधले २ मार्क-३मार्क मिळवू शकतो..असं करत करत पेपरमध्ये पासही होऊन जाइल कदाचित!!”

“बरोबर आहे विक्रमा तुझं..कॉपी करण्यापेक्षा हे बरं..पण काय रे त्या राजूला चांगले मार्क मिळवायचे असतील तर एवढंच करून उपयोगाचं नाही होना? परीक्षेआधी नीट अभ्यास केला तरीही ती माहिती साठली आहे की नाही हे कसं पाहायचं हे सुद्धा सांग..राजूला आवडत  नसलेल्या विषयातही चांगले मार्क कसे पाडता येतील हे सांगितलच नाहीस..उगीचच अभ्यास न करता पास होण्याचं सांगतोस..पण मी वेताळ आहे..माणूस नाही..त्यामुळे मला शाळा नाही..परीक्षा नाही..मार्क नाही..पास नाही नापास नाही…हा हा हा..मी सुटलो या चक्रातून..येतो मी वेताळा..हाऽहाऽऽहाऽऽऽ”

वेताळ हसत हसत गेला. पण हे mind mapping चं टेक्निक ऐकून प्रजाजन हळहळले. घोड्याचा सारथी तर मनात म्हणाला “हे टक्निक जर मला आधी कळलं असतं तर मी सारथी होण्यापेक्षा घोड्यांचा डॉक्टर झालो असतो..” ते ऐकून घोडा जोरात हसल्यासारखा खिंकाळला..माहुताला ते कळल्यामुळे त्याने घोड्याचा लगाम जोरात खेचला..घोडा राजवाड्याच्या दिशेने सुसाट निघाला..

(क्रमश:)

मुखपृष्ठ: मुखपृष्ठ
या प्रकारच्या इतर गोष्टी: ८वी पर्यंतचं Physics
गोष्टींची पूर्ण यादी: गोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)