तारिख आणि तिथी: किती Time ‘पास’ झाला?

विक्रम हा एक न्यायी, प्रजाजनहित दक्ष राजा होताच पण जनतेच्या समस्या जाणून घेणारा, त्यांच्याशी वारंवार संवाद साधणारा राजा होता. एकदा का एखाद्या प्रजाजनाची समस्या कळली की तिचे समाधान होई पर्यंत दर वेळी संबंधित विभागाला, अधिकाऱ्यांना तो त्याविषयीच्या कृतीविषयी विचारे, पाठपुरावा घेत असे. मग हा पाठपुरावा दर दिवसाला, दर आठवड्याला, दर महिन्याला असा चालूच राही. अगदी कारवाई पूर्ण होण्याच्या दिवशी तर दर तासाला तो पाठपुरावा करी. ही त्याची खासियतच म्हणाना! एका प्रजाजनाच्या जमिनीचा तगादाही त्याने अनेक दिवस लावून धरला होता. न्यायदानाच्या प्रक्रीयेला विलंब लागत होता. तारखेवर तारिख पडत होती तरीही समाधान झाले नव्हते, न्याय मिळाला नव्हता. समस्या कशी सोडवावी याचा खल करतच तो त्या अमावस्येच्या रात्रीही चालला होता..अगदी नेहेमीसारखाच..

“काय रे विक्रमा ही तुमची न्यायदानाची प्रक्रीया..विषय जितका जीर्ण, जितके अधिक लोक सहभागी तेवढी प्रक्रीया जास्त वेळ चालणार. कधी कधी तर पक्षकारांच्या पिढ्या मरून ते आत्मे वेताळलोकात आले तरी जमिनीवर त्यांचे वंशज कोर्टात जातातच आहेत. तारखा घेतातच आहेत, उंबरठे झिजवतच आहेत. कायरे असं सारं? वकीलांचं समजू शकतो रे, की तारखे प्रमाणे त्यांना दर को्र्ट तारखेला त्यांची फिज मिळणार..पण सामान्य माणसांच्या आयुष्यात हे काळ, तिथी, तारिख, वार, महिना, आठवडा, वर्ष, युग हे कालवाचक शब्द नक्की कशासाठी आले रे? मुळात काळ आणि वेळ पाहायची गरज माणसाला नक्की का पडते? प्राण्यांना तर नाही लागत घड्याळ कळायला..जगतातच ना ते?”

“बरोबर आहे वेताळा..खरंतर वेळ ही केवळ संदर्भच देते..प्रशस्तपादभाष्यामध्ये तसेच वैशेषिकात काळ हे एक द्रव्यच धरले गेले आहे. पण काल हा स्वत: करत काहीच नाही. आपल्या सावलीसारखा तो सतत चालू राहतो एवढंच..ही माणसाच्या बुद्धीची गरज समज किंवा काहीही..त्याला त्याच्या आयुष्यातल्या घटनांना काही संदर्भ देण्याची गरज भासते..मी लहानपणी कसा होतो, तरुणपणी कसा झालो, म्हातारपणी कसा झालो अगदी एवढंच नाही तर माझे आइवडिल, आजोबा पणजोबा जेव्हा होते तेव्हा कसं होतं, आताची परिस्थिती कशी आहे, मुलानातवंडांच्या वेळी कशी असेल..असं भूत, वर्तमान, भविष्य या विषयी त्याच्या विचार करण्यापोटी त्याने काळाची सोय करून ठेवली..भूतकाळाविषयी एक कुतुहल, वर्तमानाची काळजी आणि भविष्याविषयीची आशा यापोटीच काळ माणसाच्या आयुष्यात येतो, जातो. पण खरंतर काळाचे असे तुकडे आपण आपल्या सोयीसाठी करतो. सूर्य जसा अवकाशात आपल्या मर्जीने फिरतच राहतो तो निदान आपल्याला उन-सावलीतरी देतो. पण काळ तसलं दिसण्या सारखं, जाणवण्यासारखं, सेन्स ओर्गन्सना कळण्यासारखं काहीच देत नाही. पण या सेन्स ओर्गन्सना म्हणजेच डोळे, कान,नाक,त्वचा आणि जीभ यांना जे आजूबाजूच्या वातावरणातील स्थायू, द्रव, वायू, तेज आणि आकाश यांविषयी जे कळतं त्याला एक संदर्भ देण्याचं काम हा काळ करतो..”

“एखादं उदाहरण दे रे..”

“हे बघ. राजू नावाच्या मुलाचा वाढदिवस आहे. सकाळी सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा त्याच्या हट्टापायी त्याने आइने केलेला केक कापला. सकाळी पूर्ण केक होता. त्यातला एक तुकडा त्याने खाल्ला. समजा त्या वर्तुाळाकार केकचे त्याने आठ सारखे भाग केले. १/८ त्याने सकाळी खाल्ला, एक भाग डब्यात नेला. एक भाग राजूचा भाऊ गजू याने नेला. हे झालं सकाळी. शिवाय एक भाग राजूने स्कूलबस मधून घरी येताना खाण्यासाठी नेला होता. तो त्याने बसमधून परत येताना खाल्ला. मग दुपारी घरी आल्यावर त्याने आल्या आल्या खाल्ला. मग तो जेवून झोपला. संध्याकाळी त्याने दूध पिताना खाल्ला. असं करत करत रात्रीच्या जेवणात त्याने तो संपवला. आता मला सांग वेताळा, तो केक कोणी खाल्ला राजूने आणि गजूनेच ना! कर्ता राजू, गजू हेच होते. खाण्याचं काम केकवर होत होतं. क्रीया खाण्याची होती. यात काळ काय करत होता? काहीच नाही..सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र हे केवळ संदर्भ देण्यापुरते असतात. पण सारं काम राजूच करत होता..”

“पण मग विक्रमा हा संदर्भ हवाच कशाला?”

Source: Public Domain, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=1958157

 

“मला काय वाटतं माहिती का..तू डॉल्फिन मासा पाहिला असशील. दर थोड्या थोड्या वेळाने तो पाण्याच्या पृष्ठभागाकडे येतो, हवा घेतो पुन्हा आत बुडी मारतो. तशीच माणसांना सवय असते. आपली बुद्धी म्हणजे पर्यायाने आत्मा या काळाला येऊन चिकटतो, म्हणजे काही घटना घडली की तेव्हा बुद्धी काळाच्या संदर्भात ती घटना लक्षात ठेवते. समजा बाळाचा जन्म, घरातल्या कोणाचा तरी मृत्यू अशी जी घटना त्या माणसाला महत्वाची वाटते तेव्हा आत्मा काळाशी येऊन चिकटतो. पुन्हा काही वेळाने तो आत्मा ती घटना आठवतो आणि म्हणतो की जन्म होऊन एक दिवस झाला, आठवडा झाला, महिना झाला, सहा महिने झाले, वर्ष झालं वगैरे..मग एक आठवड्यात बाळाच्या वागण्यात काय फरक पडला, एक महिन्यात ते लोळून दुसरीकडे जाऊ लागलं, बडबड करू लागलं, तीन महिन्यात रांगू लागलं..असे सारे बदल त्या काळाच्या संदर्भातच झाले.. पण बदल बाळाच्या वागण्यात, आकारात, हालचालीत झाले..काळाची केवळ एक निर्गुण निराकार अनंत पट्टी आपण आपल्या सोयीने युगे, संवत्सरे, वर्षे, महिने, आठवडे, दिवस, प्रहर, तास, मिनिट, सेकंद अशी सोयीने तोडली आणि संदर्भासाठी वापरली..अर्थात काळाची पट्टी निर्गुण, निराकार असल्याने ती तोडली काय , जोडली काय ते आपले समाधान..आपल्या कल्पना, आपल्या सोयी..”

“विक्रमा तू हे जे काही कालाविषयी बोलतोयस त्याला काही आधार आहे का?”

“प्रशस्तपादभाष्य ग्रंथामध्ये काळ हे वेगळे द्रव्य का  समजावे? त्याचे गुणधर्म काय याविषयीचा धडाच आहे..”

“पण मग विक्रमा ही कॅलेंडर्स जी आहेत..शालिवाहन राजाने शालिवाहन शक सुरु केले, विक्रमादित्याने विक्रम संवत्सर सुरु केले, पोप ग्रेगरी ने काहीतरी सुरु केले ती कॅलेंडर्स कशासाठी आहेत?”

“आपल्या घरातल्या लाडक्या बाळाच्या जन्मापासून आपण त्याचा पहिला, दुसरा तिसरा असे वाढदिवस साजरे करतो म्हणजेच त्याच्या जन्माच्या संदर्भात काळ मोजतो..तसेच राजांनी काळ सुरु केला की प्रजाजनांची सर्वांना समान अशी काळ मोजण्याची सोय होते..मग त्यांना त्या संदर्भात एकवाक्यता ठेवणे शक्य होतं..कारण या काळाच्या संदर्भात आपण अनेक गोष्टी मोजतो. उदाहरणार्थ वर्षाचा जमाखर्च, करवसुली, धनधान्याची मोजमापे करण्यासाठी सर्वाना एकसमान अशी संदर्भाची पट्टी होते. नाहीतर एकाचे वर्ष सुरु झाले तेव्हा दुसर्याचे संपले, तिसऱ्याचे अर्धेच झाले असं झालं तर सारे हिशेबकरणेच गोंधळाचे होईल..”

“अच्छा, म्हणजे ही कॅलेंडर्स ही केवळ मोजण्याची सोय आहे तर..म्हणजे ते तिथी, पंचांग हे काहीच कामाचे नाहीत तर..केवळ धार्मिक कल्पनाच..काय?”

“आता ते काय हे तू ठरव. पण मला सांग, पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे राजे होऊन गेले, कुठे शालिवाहन, कुठे रोमन-ग्रीक, कुठे अरब, कुठे चेंगीझ..त्यांच्या त्यांच्या राज्यातल्यांना ठीक होतं..पण यांच्या राज्यातलं दुसऱ्यांना माहित नाही..अशी अनेक कॅलेंडर्स आजही जगात वापरली जातात..पण ग्रेगोरियन कॅलेंडर सगळ्यांनी सर्वसाधारणपणे मान्य केलंय.पण असं बघ चंद्र आणि सूर्य जगात सगळीकडेच दिसतात, चंद्रोदय,सूर्योदय सर्वांनाच माहित असतो. तसेच नक्षत्रे सर्वांनाच माहित असतात. त्यांची भले नावे वेगवेगळी असतील. तर यांच्या म्हणजे चंद्रोदयापासून चंद्राच्या अस्तापर्यंत ते चांद्र तिथी, सूर्योदयापासून सूर्यास्ता पर्यंत दिवस, एखाद्या नक्षत्राच्या उदयापासून अस्ता पर्यंत त्या नक्षत्राचा नक्षत्रदिन असे काळ मोजण्याचे हे प्रकार आहेत. उलट या तिथी सर्वांना सहज कळण्यासारख्या असतात..त्यासाठी राजे, धर्म, कोण कधी जन्माला आले, गेले काही काही कळण्याची गरजच नाही..सारा खेळ ग्रह ताऱ्यांचा..त्यांच्या जागा किंवा त्यांच्या संदर्भात पृथ्वीच्या जागा सतत बदलत असतात..त्याच्या आधारावर आजच्या तिथीपासून मागे कितीक हजार वर्षे जाऊ शकतो..पुढेही कितीतरी हजार वर्षे जाऊ शकतो..या तिथीच खरोखर खगोलशास्त्रावर आधारलेल्या आहेत..दिवस खगोलशास्त्रावर आधारलेले आहेत..म्हणजेच पृथ्वीच्या फिरण्यावर आधारलेले आहेत..”

“मला सांगच आता..एक दिवस उगवतो आणि मावळतो ते कसं मोजतो आपण?”

“एक मजेदार उदाहरण देतो..आपल्या बागेत बघ अशी गोल गोल फिरणारी खेळणी असतात..त्या वर्तुळाकार मार्गावर चार बदके किंवा इतर कुठल्याही प्राणी पक्षांची मॉडेल्स लावलेली असतात. त्यांच्यावर लहान मुलांना बसवतात आणि पुढे ते खेळणं चक्रकार मार्गावर ढकलतात..राजूला त्याची आइ घेऊन गेली आहे..राजूला त्या वर्तुळाकार मार्गावर फिरणाऱ्या खेळण्यावर तिने बसवले आणि राजूला ज्या बदकाच्या खेळण्यावर तिने बसवले त्या बदकाला तिने ढकललं..ते बदक पूर्ण वर्तुळमार्गावर फिरलं आणि पुन्हा राजू त्याची आइ तिथे होती तिथे आला..तसंच पृथ्वी हे असं स्वत:भोवती गोल फिरणारं खेळणं आहे, आपण सर्व पृथ्वीवासी त्याच्यावर राजू सारखे बसलेले आहोत, आपण पडू नये म्हणून पृथ्वीनेही ग्रॅविटेशन फोर्स ने आपल्याला घट्ट पकडून ठेवलेलं आहे..अशी पृथ्वी स्वत:भोवती फिरतीय..त्यावर एके ठिकाणी आपण बसलेलो आहोत..बाहेर अनेक ग्रह, तारे, नक्षत्रे दिसत आहेत..समजा फिरायला सुरवात झाली तेव्हा समोर चंद्र होता..पूर्ण फिरून झालं आणि पुन्हा चंद्र दिसला तर झाला चांद्रदिन..सूर्य समोर असताना फिरायला सुरवात झाली असं समजलं आणि पुन्हा सूर्य समोर आला तर तो झाला आपला नेहमीचा दिवस..तसंच फिरायला सुरुवात झाली तेव्हा एखादं नक्षत्र किंवा stellar constellation समोर होतं आणि फिरून पुन्हा ते नक्षत्र दिसलं..तर तो झाला त्या नक्षत्राच्या संदर्भातला दिवस किंवा नक्षत्र दिन..”

“अरे असा असतो होय हा हिशोब! मला वाटलं काय असतं काय माहित ते राशी, नक्षत्र, तिथीचं गणित..उगीच काहीतरी खूळ असेल झालं..पण हे तर लॉजिकल वाटतंय..म्हणजे तुम्ही जे म्हणता तसं सायंटिफिक की काय ते वाटतंय..पण तू जे सांगतोयस ते कुठल्या पुस्तकात आहे का?”

“मी जे वर्णन सांगितलं ना ते खेळण्याचं त्याच प्रकारचं उदाहरण सूर्य सिद्धांत या पुस्तकामध्ये आहे..दिवस मोजण्याचे नऊ प्रकार दिले आहेत..आठवड्याचे सात दिवस कसे मोजतात वगैरे सगळी गणितं आहेत..वैशेषिकात काळ हे द्रव्य म्हटलं गेलंय..प्रशस्तपादभाष्यामध्येही त्याच्या गुणांचं वर्णन करणारा एक धडा आहे..”

“नाही ठीक आहे..हे चंद्राची तिथी, सूर्याचा दिवस, नक्षत्रदिवस, शिवाय वेगवेगळी कॅलेंडर्स यांचा हवा तसा, हवा तिथे आधार घेऊन तुम्ही माणसं स्वत:ची कामे करून घेता..स्वत:च्या उपयोगाची गणिते मांडता. हे ग्रहतारे फिरतायत त्यांना तुमचे उद्योग माहितच नाहीत…तुम्ही तर म्हणता की त्यांना ग्रॅविटेशन किंवा गुरुत्वबळ फिरवतंय..पण मग या बळामुळे एक छोटा ग्रह मोठ्या ग्रहावर जाऊन पडत का नाही? असा फिरत का राहतो? याची काही उत्तरे तू मला दिलेली नाहीस..सांगरे मला एकदा विक्रमादित्या..पण आता आम्हा वेताळांचा दिवस संपला..तुम्हा माणसांचा दिवस सुरु होईल..येतो मी विक्रमा..पुन्हा भेटू..हाऽहाऽऽहाऽऽऽ”

(क्रमश:)

मूळकथा : मुखपृष्ठ
या प्रकारच्या इतर गोष्टी: ८वी पर्यंतचं Physics
गोष्टींची पूर्ण यादी: गोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)