पृथ्वीकडून चंद्राकडे उड्डाण..(What it takes to overcome Earth’s Gravitational Force)

विक्रम राजाचा आजचा दिवस एकंदरीतच थकवणारा आणि ताण तणावाचा होता. पावसाळ्याचा हंगाम, धो धो पाऊसधारा डोंगरांवरून, घरांवरून, घाटांवरून, मंदिरांवरून, गोशाळांवरून दणादण उड्या घेत नुसत्या थैमान घालत होत्या. उन्हाळ्याची काहिली सरून पावसाळ्याचा गारवा संपला याचा आनंद घेण्याचे दिवस संपले होते, सुखाचे दिवस लवकरच संपतात असे आपल्याला वाटतं तसं काहीसं.. पण आता हा पाऊस ठीक ठिकाणच्या खड्यांमध्ये घुसून घुसून भोवरे तयार करत होता, पाणीच ते… वाट मिळाली की घुसलं आणि चाललं खोल खोल.. गोल गोल गोल फिरून भोवरे तयार करत होतं.. खड्डा छोटा असला तरी ठीक.. पण रस्त्या रस्त्यांचे पुरुष दोन पुरुष खड्डे म्हणजे मरणाचे सापळेच.. नदीमधल्या खड्यांचा तर काही थांगच नाही, त्यात नदीला पूर आलेला असला तर त्यातून जीव वाचवणं महामुश्किल.. विक्रमाच्या राज्यातल्या मोठमोठ्या नद्यांना पूर आले होते.. जीवनदायिनी नद्या नरभक्षक वाघांसारख्या अक्राळ विक्राळ वाटू लागल्या होत्या, पिसाळलेल्या हत्तींसारख्या थैमान घालत होत्या .. भोवऱ्या भोवऱ्यांच्या रूपात आपले अक्राळ विक्राळ जबडे उघडून येणाऱ्या सर्व लहान मोठ्या, सजीव निर्जीव , स्थावर जंगम वस्तूंना गिळत चाललेल्या होत्या.. लोकांची शेती तर कधीच पाण्याखाली गेली होती, आता घरे, वाहने, बैल, गायी , बैलगाड्या, रथ, मेणे, पालख्या, इतकंच काय तर नदीच्या पुरात अनेक वाड्यांचे मजलेच्या मजले तुटून गेले होते, मंदिरांचे कळस, शोभिवंत महाकाय मूर्त्या जलौघात वाहत चालल्या होत्या.. प्रचंड पुराचा कालभैरव आपल्या अक्राळ विक्राळ रूपाने प्रजेचा थरकाप उडवत होता.. राज दरबारातल्या कोणालाच उसंत नव्हती की रात्रीची निवांत झोप नव्हती.. चिंतेचा भोवरा राजापासून, अष्टप्रधानांपासून सेवकांपर्यंत सर्वांनाच घेरून कुठल्या तरी अघटिताच्या चिंतेने विदीर्ण करत होता, निराश करत होता.. हतबल करत होता..

“संकटे तात्कालिकच असतात रे राजा या भोवऱ्यांसारखे, पण त्यांना भेदण्यासाठी एक तर बुडी मरून तळापर्यंत जायचं आणि तळ गाठला की सुटायचं नाहीतर मग प्रचंड शक्तीने प्रवाहाच्या विरुद्ध पोहून म्हणजेच केंद्राकडे खेचणाऱ्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच केंद्राबाहेर स्वतःला फेकायचं आणि सुटायचं हे दोनच मार्ग आहेत.. या भोवऱ्यातून सुटायचे.. माझ्या एका मनुष्य जन्मातील मरण अश्याच एका भोवऱ्यात आलं मला.. तिथं मिळालेला हा धडा ..” काळ्यामिट्ट अंधारात वेताळ येऊन विक्रमाच्या पाठीवर बसला आणि पूर्वजन्माच्या आठवणीत रमला.. वेताळ असला तरी जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यात मध्येच कुठेतरी अडकलेला अजून एक समदुःखीच तो ..

“खरं म्हणतोस वेताळा.. या भोवऱ्यांचे प्रवाह वेगाने आपल्या केंद्राकडे खेचत असतात.. जणू काही केंद्राशी कोणी महाशक्तीशाली, महाबाहू राक्षस बसलेला असून तो अदृश्य, अजस्त्र हातांनी त्या पाण्याला गरागरा गोलगोल फिरवतोय, त्यामुळे त्या पाण्याचा थेंब न थेंब, रेणुन रेणू, अणु नि अणू वेगाने त्या वर्तुळाकार मार्गावर फिरतोय, केंद्राकडे जात चाललाय, जाता जाता बरोबर येईल ते घेत चाललाय.. केंद्राकडे नेणारं बळ (centripetal force) ते हेच..घड्याळाच्या काट्यांच्या दिशेत जाणारं.. clock-wise दिशेत जाणारं.. याला भेदायचं, याच्यावर मात करायचं तर तितक्याच वेगाने किंवा त्यापेक्षाजास्त वेगाने उलट्या दिशेत पोहायला सुरुवात करायची.. हा तो केंद्राबाहेर नेणारा मार्ग.. anti clockwise direction.. मंदिराच्या प्रदक्षिणेचा मार्ग clock wise.. सैतानापासून सुटण्याचा मात्र anti clockwise.. केंद्राबाहेर पडायला लागणार बळ म्हणजे centrifugal force.. अतिशय त्रासाचा, धोक्याचा, कष्टाचा, संघर्षाचा पण शेवटी मुक्ती देणारा मार्ग.. जोखडातून मुक्त करणारा मार्ग.. ”

“काय आज आपल्या बोलण्याचा मार्ग पदार्थ विज्ञानापासून सुटून अध्यात्माकडे वळलेला दिसतोय मला.. प्रदक्षिणा, भोवरा, मुक्ती, मोक्ष हे अध्यात्मिकच वाटणारे शब्द बोलतोयस.. एक तर महाभारतातल्या भीमाशिवाय असे भोवरे वगैरे फोडून बाहेर पडलेले कोणी ऐकलेलेच नाही मी.. तू ऐकलेस?”

“हो ऐकलेना, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा भोवरा भोवरा फोडून बाहेर पडायला आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या भोवऱ्यात उतरवायला एक चांद्रयान नुकतेच भारताने पाठवले.. ISRO च्या शास्त्रज्ञांचा हा भीम पराक्रमच नाहीतर काय.. अमेरिका, रशिया, चीन यानंतर जगातला अंतरिक्ष क्षेत्रातला महाबली म्हणजे भारतच.. ”

“नाही या महाबली उपमा वगैरे ठीक आहेत पण गुरुत्वाकर्षणाचा भोवरा ही काय भानगड आहे? आणि तो कसा भेदायचा? एक माणसाने बनवलेले यान ते गुरुत्वाकर्षणाला (Earth’s Gravitational Force) भेदणार हे कसं शक्य आहे?”

“शास्त्रज्ञांच्या अचाट बुद्धिमत्तेचीच तर ही कमाल आहे. शास्त्रज्ञ कल्पना करतात, त्यानुसार गणिते मांडतात आणि ते किंवा त्याची कल्पना असलेला दुसरा कोणीतरी त्यावर प्रयोग करतो. कल्पनेपासून सिद्ध केलेल्या नियमा पर्यंत आणणारे ते शास्त्रज्ञ आणि तिथून त्याचा उपयोग कसा करता येईल ते पाहणारे तंत्रज्ञ.. ”

“विक्रमा विषय सोडू नकोस.. मुद्द्याला धरून राहा.. ”

e76fa-newton

“हो तर न्यूटन किंवा त्याच्या आधीपासूनच गुरुत्वाकर्षण माहित होतं. दोन वस्तू एकमेकाला आकर्षून घेण्याचा प्रयत्न करतात. हे आकर्षण (Force of Attraction) त्यांच्या वस्तुमानाच्या समप्रमाणात (Proportional to Masses) आणि त्यांच्यातील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तप्रमाणात (Inversely Proportional to the square of the distance) बदलते हा तो गुरुत्वाकर्षणाचा नियम माहित झाला होता. गणिती रूपात सांगायचे झाले तर F = G M1M2/R2 हा तो नियम. यात F हे त्या दोन वस्तूमधले आकर्षण, M1,M2 ही त्या दोन वस्तूंची वस्तुमाने आणि R हे त्या दोन वस्तूंमधले अंतर. ”

“अरे पण या गणिताचा रॉकेटशी आणि सॅटेलाईट सोडण्याशी काय संबंध?”

84d17-tof

“आहे आहे संबंध आहे. हे पहा न्यूटन च्या काळात तोफा असत. तोफेतून गोळा उडवला की तोफेच्या तोंडी जाळ होई पण गोळा लांब जाऊन पडे. या जाळामुळे माणूस मरुनही जाईल इतकी ती आग असे. पण न्यूटन वगैरेंच्या डोक्यात येई की तोफेतून गोळा उडवला की काही अंतरावर पुन्हा जमिनीवर पडतच असे. पण असं काय केलं की हा तोफगोळा उडेल आणि खाली न पडता पृथ्वीच्या टोकापर्यंत जाईल आणि तिथून बाहेरच निसटेल. मग असा गोळा चंद्रासारखा फिरत राहू शकेल तर त्याचा वेग काय असेल अशी अनेक गणिते शास्त्रज्ञ मांडत असत. अशा अनेक गणितातून पृथ्वीबाहेर पडण्यासाठी किती वेग लागेल तो वेगही त्यांनी शोधला होता. हाच तो मुक्तीचा वेग (Escape Velocity). ..”

“ए ए विक्रमा, आता हा वेग किती लागेल हे नको सांगूस. ते गणित नंतर कधीतरी सांग. पण मला सांग हे रॉकेट आणि उपग्रह कसे काय बाहेर जातात पृथ्वीच्या? आणि तिकडे जाऊन ते काय करतात? ”

“हे बघ वेताळा तू सर्कशीत मौत का कुवा पहिला असशील. त्यात बघ बाईक वरचे दोन तरुण आधी तिरके तिरके त्या मोठ्या गोलात जोराने चालवत जातात. असे करता करता बाईक गोल गोल मार्गावरून चालवू लागतात. गोलाचा व्यास जसा वाढतो तसा बाईकचा वेगही वाढतो. जसे जसे ते गोलात वर वर जात जातात तसा त्यांचा वेगही वाढत जातो. तसंच हे रॉकेट थोडावेळ तिरक्या मार्गावरून जातं. श्रीहरी कोटा वरून निघतं तिरकं वर वर जात जातं. पृथ्वी गोल फिरत राहते. काहीवेळाने ऑस्ट्रेलियावरूनही ते जातं आणि काहीवेळाने त्याचा एक भाग वेगळा होतो आणि एक मोटर चालू होऊन यानाला जोरात धक्का देतो आणि यान पृथ्वी भोवती अंडाकार मार्गाने फिरू लागतं. वेग जसा वाढेल तसा या अंड्याचा आकार वाढतो. ”

“पण हा भाग वेगळा होणे आणि मोटर चालू करून धक्का देणे. फिरायचा वेग वाढवणे हा काय प्रकार आहे? हा वेग वाढवायचा कशाला? आणि हा यानापासून सुटलेला भाग पुन्हा खालीच पडणार. नुकसानच सारं..”

“मी जसं सांगितलं तसं यानाचा वेग कमी झाला तर त्याच्या फिरण्याचा अंडाकृती मार्ग लहान लहान होणार आणि त्याच्याशी असलेला संपर्क तुटला तर यान पृथ्वीवर येता येताच जळून खाक होणार. म्हणून या मोटर्स त्या यानाचा वेग कमी जास्त करण्यासाठी जोडलेल्या असतात. शिवाय या अवजड, महाकाय रॉकेटला फिरवत ठेवायसाठी इंधन सुद्धा जास्त लागेल. त्यापेक्षा हे अवजड रॉकेट वेगळं झालं तर यांनाच वस्तुमान (lesser mass) कमी होईल आणि मोटर ने धक्का दिल्याने ते यान पृथ्वीपासून लांब जाईल (increase in distance)..Law of Gravitation नुसार पृथ्वीचे त्या यानावरचे बळ कमी होईल.. यासाठी हा सारा खटाटोप.. ”

“बरं बरं कळलं कळलं.. पण विक्रमा इतक्या गप्पा मारूनही ते यान फक्त पृथ्वी बाहेरच पडलं.. चंद्राच्या पत्त्या वर कसं जातं आणि चंद्रावर कसं उतरतं हे सांगितलंच नाहीस. शिवाय पृथ्वी भोवती उपग्रह फिरवणे आणि एक यान चंद्रावर पाठवणे यात काय फरक आहे आणि मुळात म्हणजे हे उपग्रह अशा अंडाकार रस्त्यावरून का फिरतात ? सूर्याभोवती सर्व ग्रह या अंडाकार रस्त्याने का फिरतात हे सांगितलंच नाहीस. आणि जगात असे उपग्रह सोडणारे इतके कमी देश का आहेत? असं काय अवघड आहे ही यानं पाठवण्यात? ही रॉकेट उडवण्यासाठी लागणारं इंधन आणि क्रायोजेनिक इंजिन असं काय विशेष असतं? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं तू दिलीच नाहीस.. नुसताच गप्पांचा पतंग उडवत बसलास झालं.. पण चल आता मी निघतो.. माझ्या वेताळ मित्र मंडळाची पिकनिक आहे तुमच्या त्या चंद्रयानाकडे.. आम्ही जाणार आहे आणि पाहणार आहे ते.. उशीर होतोय मला.. येतो मी विक्रमा हाऽहाऽऽहाऽऽऽ ”

(क्रमश:)
मुखपृष्ठ
याप्रकारच्या अन्य गोष्टी
गोष्टींची पूर्ण यादी