ऊर्जा नावाचा बहुरुपी कलाकार (Law of conservation of energy)

विक्रमाच्या हेरांच्या ताफ्यात अनेक प्रकारचे हेर होते, काही राज्यात सतत फिरून बातम्या काढणारे तर काही बाहेरच्या राज्यात, शत्रूंच्या राज्यात फिरून, जीवावरचा धोका पत्करून देशनिष्ठा बाळगून देशाशी इमान राखणारे, देशाच्या सुरक्षिततेची काळजी वाहणारे, देशाच्या शत्रूंवर नजर ठेवणारे. पण या हेरांचा समान गुण काय असेल तर त्यांची वेष, भाषा, रूप, रंग, कला, वागणं सारंच पूर्ण बदलायची त्यांची क्षमता.. एका ठिकाणी साधुबैराग्याच्या वेषात जाऊन अलख निरंजन म्हणतील.. दुसरीकडे गारुडी म्हणून जाऊन जीवंत नाग पुंगीच्या तालावर नाचवतील.. एका जागी नाटकातले नट होतील.. कुठे लोहार काम करणारे कारागीर होतील.. कुठे पोपटाकडून ज्योतिष सांगणारे ज्योतिषी होतील.. कुठे सफाई कामगार होतील.. कुठे चोऱ्या माऱ्या करतील.. कुठे वकील असल्यासारखे दाखवतील.. पण हे सारं खरंच आहे असं दाखवताना आणि करताना खरंतर देशाचे स्वामिनिष्ठ असतील.. देशाचे इमानी, जागरूक पहारेदारच असतील.. विक्रमाच्या राज्यातील आणि शत्रूराष्ट्रातील हेरांची मोठी संख्या आणि त्यांच्या  प्रचंड कामगिरीच्या कथा खरेतर कुठल्याही साहसी कथांइतक्या रोमांचक पण केवळ गुप्ततेमुळे कधीही बाहेर न आलेल्या.. त्यांचाच विचार करत करत राजा विक्रम वेताळाच्या झाडाकडे चालला होता.. अमावस्येच्या अंधाऱ्या रात्रीही त्याचे हेर या घनदाट, काट्याकुट्यांनी आणि वाघ, सिंह, कोल्हे, चित्ते, मगरी, अजगरे यांनी भरलेल्या अरण्यातही त्याच्या सुरक्षिततेसाठी तैनात होतेच..

“काय विक्रमा, आज हेर खात्याची मिटिंग करून आलास वाटतं..” धप्पकन तो अक्राळ, विक्राळ, भेसूर वेताळ विक्रमाच्या पाठीवर बसला आणि नेहमीप्रमाणे विक्रमाच्या मनातील विचारांचा सूर ओळखत त्याने बोलायला सुरुवात केली ” तुमचं हेर खातं खरंच फार धाडसी, बहुगुणी आणि अनेक कला आणि कामे येणाऱ्या अतिशय स्किल्ड कार्यकर्त्यांनी भरलेलं आहे. अनेक कामगिऱ्या बिनभोभाट पार पाडण्यात तुझ्या हेरांचा हातखंडा आहे. काही तर इतके रूप बदलू आहेत, वेष बदलू आहेत की कधी कधी त्यांचा डावा हात एका रूपाचं आणि उजवा दुसऱ्या रूपाचं काम करत असतो म्हणतात. पण आहेच तुझेच स्वामिनिष्ठ लोक.. तुझ्यासाठी जीवाची बाजी लावणारे.. पण काय रे विक्रमा फिजिक्स मध्ये आहेत कारे असे रूप बदलू, रंग बदलू लोक ? काही आहे का असं तुमच्या त्या रटाळ फिजिक्स मध्ये? का नुसतंच लॉस आणि इक्वेशन्स नी भरलेलं आहे.. ”

“नाही नाही वेताळा, फिजिक्स चं सार किंवा क्रक्स म्हणजे लॉस आणि इक्वेशन्स आहेत पण म्हणून फिजिक्स म्हणजे केवळ ते लॉस नाहीत.. त्या लॉस आणि इक्वेशन्स ना जन्माला घालणाऱ्या सॉलिड्स, लिक्विड्स, गॅसेस, हिट या चार प्रकारच्या वस्तूंनी चालवलेल्या गोंधळात खरी मजा आहे.. या गोधळाला समजून घेण्यात पूर्वी कणाद, ऍरिस्टोटल, आर्कमिडीज यांनी आयुष्य खर्ची घातली.. नंतरच्या काळात गॅलिलिओ, प्लेटो, कोपर्निकस, न्यूटन, गेरिक यांसारख्या असंख्य शास्त्रज्ञांनी या फिजिक्स वर जीव ओवाळून टाकला तो उगाच नाही.. आजूबाजूला चाललेल्या प्रत्येक गोष्टीचं कारण शोधण्याचे तंत्र म्हणजे हे फिजिक्स.. एक कारण सापडलं की दुसऱ्या कारणांचा क्लू लागतो.. तो सोडवला की पुढचा क्लू.. असं शोधत शोधत, गुंते सोडवत अनेक शास्त्रज्ञांनी या फिजिक्स मध्ये भर घातली.. आणि हे मुळीच रटाळ कंटाळवाणं बोरिंग शास्त्र नाही.. माणसाच्या कल्पनाशक्तीचा, आकलनाचा, ऍनालिसिस चा परमोच्च बिंदू कुठं असेल तर तो या फिजिक्स मध्ये.. गणितं हि त्या शास्त्राची व्यक्त होण्याची भाषा.. mathematics is the language of expression of this fantastic science called physics.. यात मानवाच्या..”

“आवरा, आवरा विषयाला धरा..अरे कुठं चाललास तू विक्रमा.. मी तुला विचारलं होतं की फिजिक्स मध्ये कोणी बहुरूपी आहे का.. सरड्यासारखा रंग बदलणारा .. ”

“आहे वेताळा आहे.. पण तो बहुरूपी दिसत नाही पण असतो.. कधी सकाळी सूर्योदयात दिसतो.. नदीच्या वाहणाऱ्या पाण्यात दिसतो.. कधी झाडाच्या सळसळीत समजतो.. कधी कानावर पडणाऱ्या पक्ष्यांच्या किलबिलाटात समजतो.. कधी कोसळणाऱ्या पावसात असतो, कधी गोठवणाऱ्या थंडीत असतो तर कधी अंग भाजणाऱ्या उन्हात असतो.. उसळणाऱ्या समुद्रात असतो.. घोंगावणाऱ्या वाऱ्यात असतो आणि शांतवणाऱ्या छान, शीतल चांदण्यात असतो.. सतत एकातून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसर्यात असा सतत रूप बदलत असतो.. पाहणाऱ्याला वेगवेगळ्या घटना वाटतात.. पण कळणाऱ्याला त्याचं अस्तित्व जाणवतं.. अनेक सुंदर फुलांनी बनवलेला हार असावा.. गुलाब, मोगरा, जाई , जुई, निशिगंध यांची फुलं असावीत.. या सर्वांना एक ठेवणारा दोरा न दिसावा.. तसा हा बहुरूपी कलाकार आजूबाजूच्या सर्वच घटनांमध्ये वेगवेगळ्या रूपात असतो.. ”

“अरे विक्रमा काय हे, किती हा सस्पेन्स.. कोण तो? नाव काय त्यांचं? सांग रे पटकन.. ”

“तिचं नाव ऊर्जा, एनर्जी.. तिची अनेक रूपं.. सूर्यापासून पृथ्वीकडे निघाली की आली प्रकाशाच्या(light) च्या.. म्हणजेच लाखोंच्या, करोडोच्या, अब्जांच्या, मिलियन्स, बिलियन्स फोटॉन्स च्या रूपात… ३लाख किमी प्रतिसेकंद इतक्या वेगाने.. ८ मिनिटात सूर्यापासून पृथ्वीपर्यंत.. पृथ्वीच्या वातावरणात शिरली की झाली तिचे परिवर्तन.. झाली उष्णता.. thermal energy.. तापवलं हवेला.. झाली उष्णतेच्या (heat) रूपात.. उष्णतेच्या रूपात तापवलं जमिनीला.. तापवलं अथांग समुद्रातल्या पाण्याला..पाण्याचे अणुरेणू आधीच चंचल.. सतत वळवळ, धावपळ, गोंधळ घालणारे.. ही उष्णता किंवा हिट मिळाली की मग तर तो गोंधळ विचारूच नका.. एकमेकाला ढकलत, सरकवत (mechanical force) त्यांची पळापळ चालू होते.. इकडून तिकडे.. तिकडून इकडे.. मग त्यातले गरम होऊन झाले बाष्पात किंवा water vapor.. हि व्हेपर मग निघाली पाण्याबाहेर .. वरवर जात अशा अनेक वाफांचा झाला ढग.. असे अनेक ढग मग एकमेकाला आपटले (mechanical force) आणि त्यातून आले आवाज (sound energy).. कडाडल्या वीजा (static electricity) .. वाऱ्याने ढकलले जोरात (mechanical force).. ढगांच्या रांगा पळता पळता निघाल्या जिकडे तिकडे सैरावैरा.. काही अंतर जातात तोच अडखळल्या (mechanical force) एका डोंगराला.. झालं.. पुन्हा लागले सारे पाण्याचे थेंब पाळायला.. पुन्हा फूट.. पुन्हा गोंधळ.. पुन्हा डोंगराशी पंगा.. पुन्हा उतारावर धांगडधिंगा.. असं पाणी पळत पळत(kinetic energy) त्याचा झाला झरा.. झरे एकत्र येऊन झालं एक मोठं सरोवर.. reservoir.. उंच डोंगरावर हे पळणार पाणी येऊन एकत्र साठलं (potential energy).. पण ते थोडीच स्वस्थ बसणार? ते लागलं धडाधड पडू उंच डोंगरावरून खोल खोल दरीत पडू.. बंजी जंपिंगच म्हणा.. पण खाली पडतो तर काय जमीन नाही तर एक महाकाय, मोठ्या पात्यांचा blades चा पंखा बसवलेला.. पाणी जसजसं पडून लागलं पंख्यावर तसा लागला की तो पंखा फिरायला.. गरागरा फिरायला लागला पंखा.. (kinetic energy).. पण काय आश्चर्य? त्या पंख्याच्या फिरण्यामुळे तो पंखा ज्या आयर्न पासून लोखंडापासून बनला होता त्यात या गोल गोल फिरण्यामुळे मॅग्नेटिझम निर्माण झाला.. एक सिलींडरच्या आकाराचं अदृश्य असं मोठं मॅग्नेटीक फिल्ड तयार झालं.. कोणाला दिसलं मात्र नाही..पण त्यामुळे  त्याला जोडलेल्या तांब्याच्या तारा copper wires च्या पोटात दुखू लागलं (electromagnetic induction).. पाहतो तर काय त्या तांब्याच्या तारेतल्या लाखो, करोडो, बिलियन्स, मिलियन्स इलेक्ट्रॉन्स ना या पंख्याच्या फिरण्याची खबर लागली आणि त्यांनी हि मोठा गोंधळ घालायला सुरुवात केली.. ते ज्या प्रोटॉन्स बरोबर बसले होते त्यांना त्यांनी कधीच डिच केलं आणि चालले सारे इलेक्टॉन्स.. हजारो किलोमीटर लांबीच्या तारामध्ये मिलियन्स, बिलियन्स, ट्रिलियन्स इलेक्ट्रॉन्स जोरात फिरू लागले.. रिले रेस खेळावी तसे एका इलेक्ट्रॉन कडून दुसऱ्याला अशी ती जाऊ लागली.. तीच ती इलेकट्रीसिटी..त्या डोंगरापासून मग मात्र ती जोरात पळू लागली.. अगदी प्रकाशाच्या वेगाने.. ३ लाख किमी पर सेकंड.. मग ती घुसली एका घरात.. विदिन या millionth of second.. एक सेकंदाचे लाख भाग करावेत इतक्या वेळात ती दूरवरच्या डोंगरातून घरातल्या वायर मध्ये आली देखील.. मग तर काय तिचा धांगडधींगा विचारूच नका.. सकाळी सुरु केलेल्या हिटर मध्ये घुसली.. तिथे heat टायर झाली.. पुन्हा त्या हिट ने पाण्याला गरम केलं.. थोडी घरातल्या फोनमध्ये गेली.. फोनच्या व्हायरमध्ये जाऊन रिसीव्हरमधल्या प्लेट्स मध्ये गेली.. रिसीव्हरच्या प्लेट्स आदळून त्यातून आवाज निघू लागला.. sound through piezo electric effect.. थोडी गेली पंख्यात.. पंख्याच्या रोटर कडे गेली.. तिथे रोटर भोवती पुन्हा सिलिंडरच्या आकाराचे मॅग्नेटिक फिल्ड तयार झाले त्यामुळे पंख्याची पाती फिरू लागली.. थोडी गेली फ्रिजमध्ये.. फ्रिजच्या कॉम्प्रेसर मध्ये.. फ्रिज मधल्या वस्तूंची हिट कॉम्प्रेसर ने शोषून घेतली .. जितके appliances जितके इंस्ट्रुमेंट्स तितके उपयोग तितके एनर्जीचे फॉर्म्स.. तितकी एनर्जीची रूपे.. आणि या सगळ्यात थोडी थोडी वीज उष्णतेच्या रूपात बाहेर पडू लागली.. radiate होत राहिली.. त्यामुळे पुन्हा पृथ्वीची उष्णता वाढत राहिली.. पुन्हा पृथ्वी गरम झाली, पाणी गरम झालं.. पुन्हा ते पाणी ..             ”

“अरे पुरे पुरे विक्रमा.. पुन्हा नको सुरु करूस.. पण म्हनायचं काय या प्रकाराला? ”

“वेताळा, याला म्हणायचं ऊर्जा अक्षय्यता नियम किंवा मराठीत law ऑफ conservation of energy.. म्हणजे ऊर्जा निर्माण होत नाही किंवा नष्ट सुद्धा करता येत नाही फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात ती सतत बदलत राहते.. energy can neither be created nor destroyed but it changes from one form to another.. but total energy of the universe always remains constant.. ”

“हा ते नियम वगैरे म्हटल्यावर वाटलं जरा फिजिक्स सारखं.. नेहमीप्रमाणे डेफिनिशन सारखी.. पण ती एनर्जीची गोष्ट मात्र फार लंबवलीस बघ.. ह्यातून त्यात त्यातून कशात किती उड्या मारते हि .. पण काय रे हे electromagnetism, piezo electricity म्हणजे ऊर्जेचं प्रकाशात, आवाजात, उष्णतेत रूपांतर होणं तुम्ही माणसं जन्माला येण्याआधी पासूनच सुरु होतं ना? मग तुम्ही स्वतः:चीच नवे देऊन टाकता सगळ्याला आणि स्वतः:च शोधल्याचा शो ऑफ करता.. पण या तलावाच्या पाण्यातून वीज electricity कशी तयार होते हे कळलं नाही मला नीट.. खूपच गुंडाळलंस तू.. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजे काय हे पण नीट सांगितलं नाहीस .. पण आता वेळ झाली माझंही वेषांतर करायची.. आम्ही वेताळ लोकही रात्री प्रेतात शिरतो आणि सकाळी उडून पुन्हा आमच्या घरी, वेताळ लोकात निघून जातो.. आता माझीही वेळ झाली.. निघतो मी विक्रमा.. अरे जरा अभ्यास करून येत जा रे.. हा हा हा     ”

(क्रमश:)

मुखपृष्ठ
१२वी पर्यंतचं Physics
गोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)