विजेची गोष्ट : १: वीज काय आहे आणि ती वाहते कशी (Electricity: What it is and how does it flow?)

(~ इस  १७०० ते ~ इस १७६०)

अमावास्येच्या अतिभयंकर रात्री तशा विक्रमासाठी नित्याच्याच झालेल्या. राजाच्या आयुष्यातला रोजचा दिवस नवा.   आजच तो प्राणिशाळेत जाऊन आला होता  भयंकर प्राण्यांच्या सान्निध्यात राहून राहून माणसांना जसं त्या प्राण्यांना कसं वागवावं याचं ज्ञान होत जातं, त्या प्राण्यांना आपण सहजपणे नियंत्रणात आणू शकतो असं हळूहळू वाटू लागतं. महाकाय हत्ती, अक्राळ विक्राळ वाघ सिंह नेहमीच्या सवयीने कमी भीतीदायक वाटू लागतात, त्यांच्या पशुवृत्तीचं, हिंस्रपणाचं विस्मरण होऊ लागतं,त्यांच्या नेहमीच्या झालेल्या वावरामुळे त्यांच्या ताकदीचा आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांचा विसर होऊ लागतो आणि अचानक एके दिवशी हे श्वापद त्याला हाताळणाऱ्या माणसाचा जीव घेतं.. विक्रमाच्या प्राणिशाळेतल्या हत्तीने असाच धुडगूस घातला होता आणि माहुतालाच पायाने चिरडलं होतं.. नेहमी शांत वाटणारा हत्ती हाताबाहेर गेला की काय करू शकतो ह्याचं प्रत्यक्ष उदाहरणंच विक्रम पाहून आला होता.. थोडा चकितच होता तो.. त्यात आकाशातून एक वीज चमकली.. लक्ष लक्ष दिव्यांचा प्रकाश पडला आणि पुन्हा काळोख.. विक्रमाच्या डोळ्यासमोर अंधारीच आली.. कसा बसा तोल सावरला झालं..

“अरे विक्रमा नीट ये नीट ये. राजा तू हजारो लाखोंचा पोशिंदा कशाला जातोस रे अशा हिंस्त्र प्राण्यांच्या जवळ? तुम्हा लोकांना फार हौसच अशा आपल्या कुवतीपलीकडे असलेल्या प्राण्यांना पाळायची.. शक्तीने हजारोपट असलेल्या हत्तींच्या पाठीवर बसायची, शेकडो माणसांना एका घासात गिळेल अशा देवमाशांबरोबर समुद्रात फिरायची.. त्यांच्या पंखाच्या फटक्याने तर म्हणे तुमची जहाजे मोडतात आणि बुडतात. मग कारे करता असं? ते जाऊ दे.. आलाच आहेस तर मला सांग की असा कोणता अजस्त्र प्राणी किंवा अशी कोणती अशी अतिभयंकर शक्तिशाली गोष्ट तुम्ही माणसाळली आहे कारे फिजिक्स मध्ये? मला माहिती आहे की अशी निसर्गाने तयार केलेली शक्ती पूर्ण नियंत्रणात ठेवणे तुमच्याने शक्य नाही.. पण थोड्याफार प्रमाणात तरी तुम्ही माणसाळली आणि वापरली आणि आताही वापरताय  “
“होय वेताळा असे चार अतिशय शक्तिशाली बलाचे प्रकार बळ म्हटलं तर दाहकता कमी वाटते पण तशी कधीही नसते असे चार अतिभयंकर प्रकार जगात किंवा विश्वात आहेत.. मगाशी जी वीज लक्ख करून डोळे दिपवून गेली ती वीज electricity हा त्या शक्तिशाली बलांमधील एकाचा म्हणजेच विद्युतचुंबकीय शक्ती electromagnetic force चा प्रकार.. “
“ती वीज तुमच्या त्या शक्तीचा प्रकार? काय सांगतोस कसं शक्य आहे? तो तर दैवी चमत्कार किंवा निसर्गातील शक्ती असं आम्ही मानतो..माझ्या एका मनुष्य जन्मात अशाच एका विजेच्या लोळात सापडून माझ्या मनुष्य जन्माची सांगता झाली रे.. आणि तू सांगतोस ती वीज म्हणजे इलेक्ट्रिसिटी ? माझी उत्सुकता फार वाढवू नकोस आणि फार लांबड लावू नकोस.. सुरु कर बोलणं..  “
“अरे  विक्रमा असं मधनंच सुरु करू नकोस.. ना शेंडा ना बुडखा.. सुरुवातीपासून सांग.. ही वीज म्हणजे इलेक्ट्रिसिटी हे कसं कळलं? ही इलेक्ट्रिसिटी जाणून घेण्याचे प्रयत्न आणि प्रयोग कधी कसे सुरु झाले ते विस्ताराने सांग..   “
“हे बघ वेताळा, तसं तर जगात फार पूर्वीपासूनच लोकरीने घासलेल्या काचेच्या कांडीकडे पिसे ओढली  जातात, भरपूर वेळ कारपेट वर अनवाणी फिरल्यानंतर एखाद्या लोखंडासदृश मेटल ला हात लागला तर एक जोरात झटका किंवा करंट बसतो, सिल्कच्या म्हणजेच रेशमी धाग्यांवर थोडा वेळ घासत राहिले तर कधी स्पार्क दिसल्यासारखे वाटते, तेल लावलेल्या केसांमधून प्लास्टिक चा कंगवा फिरवला आणि तो खाली कागदाच्या कपटयांसमोर नेला तर ते कपटे कंगव्याकडे ओढले जातात असे एक ना अनेक अनुभव सर्वज्ञात होते. पण इस १७०० च्या सुमारास आयझॅक न्यूटन जेव्हा त्याच्या कट्टर प्रतिस्पर्ध्या नंतर  – रॉबर्ट हूक नंतर  – इंग्लंड च्या रॉयल सोसायटी च्या अध्यक्षपदी बसला तेव्हा त्याने आपल्या मर्जीतली माणसे मोक्याच्या पदांवर बसवायला सुरुवात केली. या रॉयल सोसायटी ची तिकीट लावून लोकांना अत्याधुनिक प्रयोग दाखवायची एक परंपरा होती. त्यामुळे या रॉयल सोसायटीच्या ब्रॅण्डिंग मध्ये त्यांच्या प्रयोगशाळेच्या प्रमुखाला महत्व होते. न्यूटन ने या पदावर फ्रान्सिस हॉक्सबी(Francis Hauksbee) याला बसवले. आपल्या वरिष्ठांना इम्प्रेस करण्याच्या सदैव प्रयत्नात असलेल्या हॉक्सबी ने एक काचेचा गॅस पंप तयार करून त्यात मर्क्युरी म्हणजेच पारा घातला. बाहेर चे हैंडल गरागरा फिरवून जशी काचेतली हवा काढली त्यावेळी जेव्हा हाताने त्या काचेच्या बल्ब वर घासले तसे त्या हाताने स्पर्श केलेल्या ठिकाणी त्या काचेत एक निराळाच प्रकाश किंवा प्रकाशाने बनलेलं हाताच्या आकाराचं डिझाईन काचेत दिसू लागलं. एक शो म्हणून तर हे त्याकाळी फारच गाजलं. “
(image source: wiki)
“अरे झाली डिझाईन दाखवून पण याचा उपयोग काही झाला का?”
“हो नक्कीच. म्हणजे त्या काळातल्या उच्चभ्रू किंवा अतिश्रीमंत ब्रिटिश लोकांच्या पार्ट्यांमध्ये हा शो दाखवला जाऊ लागला. असं म्हणतात की ते उच्च्भ्रू  लोक या हौक्सबी मशीन ने स्वतः:ला चार्ज करत आणि मग पार्टीतल्या पाहुण्यांना शॉक देत. किंवा एका काउंटने तर म्हणे असं स्वतः:ला चार्ज केले आणि मग कोनियाक ने भरलेल्या दारूच्या पेल्याच्या तोंडावर बोट नेले आणि दारूने पेट घेतला. एक पार्टीतला एंटरटेनमेंट आयटम. पण या मशीन मुळे शास्त्रज्ञ  लोकांना ही वीज हवं तेव्हा कशी तयार करायची याची कल्पना आली. स्टीफन ग्रे (Stefen Grey) या इतर वेळी सिल्क चा व्यापार करणाऱ्या शास्त्रज्ञाने सिल्क च्या ताग्यामध्ये हात फिरवला की स्पार्क येतात असे पहिले होते. एका अपघाता नंतर हा ग्रे जायबंदी झाला, धंदा बुडाला  आणि तो चार्टरहाऊस मधील  अनाथ गरिबांसाठीच्या वसतिगृहात  राहू लागला. त्यावेळी त्याने एक वेगळा प्रयोग केला. हौक्सबी चं मशीन ठेवलं. त्या मशिन च्या जवळ दोन रेशमाचे झोपाळे बांधले आणि त्यावर तो झोपला. त्याचे पाय हौक्सबी च्या मशीन ला स्पर्श करतील असे ठेवले. ज्या पुढच्या झोपाळ्याकडून त्याचे हात लटकत होते त्या हाताखाली जमिनीवर सोन्याच्या पातळ पत्र्याचे बारीक बारीक तुकडे टाकले. हौक्सबी मशीन ला पाय अलगद स्पर्श करत  होतेच. मशीन चं हॅन्डल गरागरा फिरवून पायाकडून त्याच्या अंगात वीज static electricity आली. अशावेळी सोन्याच्या तुकड्यांवरून त्याने हात फिरवला तेव्हा जमिनीवरून खेचल्यासारखे ते तुकडे हाताला येऊन चिकटू लागले व पडू लागले.”
(source: The History and Present State of Electricity. With Original Experiments. Vol.I. The Discoveries of Mr. Grey (Gray).)
“अरे मग त्याने सिद्ध काय झालं?”
“रे वेताळा या ग्रेने सांगितलं की सोनं, लोखंड इत्यादी धातूंमधून वीज पास होते. म्हणून ते विजेचे वाहक आहेत. Conductors of electricity. ज्या झोपाळ्यावर तो झोपला त्या सिल्क आदी काही पदार्थांमधून वीज वाहत नाहीत. ते विजेचे दुर्वाहक electrical insulators. असे पदार्थांचे दोन प्रकार त्याने सांगितले. त्या काळच्या शास्त्रज्ञांना हे वाटू लागले होते की वीज हे एक अदृश्य द्रव असून ते एकी कडून दुसरीकडे वाहते. म्हणजे जिथून निर्माण केले त्या हौक्सबी मशीन मधून, माणसाच्या शरीरातून सोन्याच्या पत्र्यांमध्ये जाऊन ती लुप्त होते. पण मग हे विजेचे अदृश्य लिक्विड बाटलीत बंद करून साठवून कसे ठेवावे असा प्रश्न लोकांना पडू लागला. “
“अरे  विक्रमा हे तर म्हणजे एखाद्या लिक्विडचा विचार करावा तसं चाललंय. नळातून आले, पाइपातून वाहिले आणि मग पिंपात भरून ठेवले. मग कोणी ठेवले याला पिंपात बांधून. पुन्हा कोणी ब्रिटिश की काय?”
“नाही. नाही याचं उत्तर नेदरलँड च्या लायडन (Leiden) या शहरात राहणाऱ्या पीटर व्हॉन मूशेंबरो (Pieter van Musschenbroek) या डच शास्त्रज्ञाने मिळवले किंवा त्याला ते अपघाताने मिळाले. त्याने हौक्सबी मशीन ला स्पर्श करेल अशी वायर घेऊन ती काचेच्या जार मध्ये सोडली. जार मध्ये वीजवाहक द्रव ठेवला.   जारला झाकण लावले आणि तो जार रेझीन इत्यादी सारख्या इन्सुलेटर वर ठेवला. कल्पना अशी होती की विजेचा द्रव तारेत येईल, मग तारेतून बाटलीतील द्रवात जाऊन साठेल. खाली रेझीन असल्याने ते विजेचे लिक्विड खाली जाणार नाही. पण त्याला काही यश येईना.
एके दिवशी चुकून त्याने तो जार रेझीन वर न ठेवता हातातच  ठेवला आणि एक हात झाकणावर ठेवला, अर्थातच चुकूनच झालं. आणि असा काही शॉक बसला की ज्याचं नाव ते. पण मग त्याला लक्षात आले की या जार मध्ये वीज साठली आहे. हे जार म्हणजे पहिल्या पिढीचा कपॅसिटर (capacitor) . मुशेम्बरो ज्या गावचा त्या लायडन गावावरून त्या जार ना लायडन जार (Leiden Jar) असे नाव पडले.”
“अरे जारमध्ये लोणची साठवतात ऐकलं होतं या पठ्ठ्यानं वीज साठवली म्हणजे कमाल झाली. पण काय रे विक्रमा हे झटके खाल्ले तरी वीज वाहतीय कशी हे कळत होतं का लोकांना?”
“नाही युरोपातल्या देशात तर श्रीमंत लोकांना यातून एंटरटेनमेंट कशी करता येईल, प्रेक्षकांना कसं चकित करता येईल आणि पैसे मिळवता येतील यामध्येच रस होता. इतर देशांवर सत्ता गाजवणाऱ्या, जगभरात वसाहती स्थापन करणाऱ्या युरोपियन देशांना व्यापारात अधिक रस होता. पण या लायडन जार ची कीर्ती पूर्वेला जपानपासून पश्चिमेला अमेरिकेपर्यंत पोहोचली होती. “
“अरे हो ठीके पण मग या मुशेम्बरोने विजेचा झटका का खाल्ला?”
“वेताळा,  त्याने हातात जार घेतला म्हणजे जार च्या काचेला हात लावला आणि झाकणाला दुसरा हात लावला. जेव्हा तो जार जमिनिवर आणि त्यातही रेझीन वर  ठेवला होता तेव्हा तारेतून आलेली वीज बाटली मध्ये जाऊन काचेकडे गेली. पण काच हा तर विजेचा दुर्वाहक insulator आणि रेझीनही दुर्वाहक. त्यामुळे शॉक बसला नाही.   पण जेव्हा हातात जार घेतला आणि दुसरा हात झाकणावर ठेवला तेव्हा झाकणातून वीज अंगात आली आणि दुसरीकडे काचेच्या जारकडे गेली. म्हणजे तो मुशेम्बरो हा वीजवाहक conductor बनला. हे काही क्षणात घडलं”
“अरे हो विक्रमा, पण मग हे नक्की काय होतंय हे कोणाला समजलं? इकडून तिकडे वीज जातीय, पॉजिटीव्ह positive कडून निगेटिव्ह negative कडे जातीय हे नक्की कोणाला कळलं? पुन्हा तुमचे ते वसाहतवादी युरोपियनच का?  “
“नाही, असं नाही झालं किंवा असं घडायचंच नव्हतं. साम्राज्यवादी ब्रिटिशांची सत्ता असलेल्या अमेरिकेतील एका अतिशय चतुरस्त्र, बद्धिमान, धडाडीच्या नेत्याला किंवा अतिहुशार शास्त्रज्ञाला किंवा अमेरिकेच्या संस्थापकांपैकी एकाला, चतुर तंत्रज्ञाला, दूरवरच्या ग्रहांचा वेध घेणाऱ्या खगोलतज्ज्ञाला या गोष्टीचा पत्ता लागला. ब्रिटीशांचा वसाहत वाद झुगारून, त्यांची अधिकार गाजवण्याची प्रवृत्ती झुगारून अमेरिकेला स्वतंत्र करू पाहणाऱ्या महत्वाकांक्षी नेत्याला हे कळलं “
“अरे किती लोकांची नावे सांगतोयस? इतक्या जणांच्या मंडळाने मिळून इलेक्ट्रिसिटी चा अभ्यास केला होता का ?”
“नाही मी सांगितलेली वर्णने एकाच व्यक्तीच्या अनेक पैलूंची वर्णने आहेत. त्या दूरदर्शी तत्ववेत्त्या विचारवंताचे नाव आहे बेंजामिन फ्रँकलिन (Benjamin Franklin).
त्या काळातल्या समजुतीनुसार प्रत्येक पदार्थाभोवती एक विजेचे वलय असते म्हणजे संत महंत देव यांच्या भोवती नाही का असं तेजाचं वर्तुळ दिसतं फोटोत तसं. तर या वाहकांभोवती ते विजेचं वर्तुळ फारच स्ट्रॉंग असतं आणि काहींभोवती ते फारच दुर्बळ, क्षीण असतं. तर वीज वाहते म्हणजे विजेचं हे  एक अदृश्य लिक्विड स्ट्रॉंग वर्तुळ असलेल्या पदार्थापासून कमी विजेचं वर्तुळ असलेल्या ठिकाणाकडे वाहते. फ्रँकलिन मध्ये एक accountant किंवा हिशेबनीस सुद्धा असावा. त्याला हा प्रकार अधिक पैसा असलेल्या माणसाने(+ve ) कमी पैसा असलेल्या माणसाला(-ve ) पैसा द्यावा तसा वाटला. त्याने म्हटलं होतं की विजेचा हा द्रव काही पदार्थांमध्ये अतिरिक्त असावा या अर्थी positive आणि काही पदार्थामध्ये त्या द्रवाची कमतरता असावी याअर्थी negative. याअर्थी ती जिथून निघते तिथे विजेचा प्रभार (electric charge) जास्त असावा धन (positive ) + असावा. ती जिथे जाते तिकडे तो तुलनेने  कमी असावा म्हणजेच ऋण (negative) किंवा – असावा. वीज वाहते म्हणजेच हा प्रभार धन टोकाकडून उंचीवरून निघून ऋण टोकाकडे असलेल्या दरीकडे हा प्रभार वाहतो. या फ्रँकलिन महाशयांनी असंही म्हटलं होतं की डोळे दिपवून टाकणारी वीज ही सुद्धा इलेकट्रीसिटीचा निसर्गात दिसणारा प्रकार आहे. यासाठी यांनी भर पावसात पतंग उडवून त्या विजेच्या प्रवाहाला पकडावं असा प्रयोग सुचवला होता.. साधारणपणे १७५० साली त्याने निबंध लिहून ही आकाशातली वीज म्हणज़ेच इलेक्ट्रिसिटी आहे यासंबंधी प्रयोग करावेत असे सुचवले होते.  “
“नाही पण बेन फ्रँकलिन यांनी काय प्रयोग सुचवला होता? “
“त्यांनी सुचवलं होतं की जेव्हा असा काळा ढग आकाशात येईल आणि त्यापासून वादळ सुटून गडगडाटासह पाऊस पडून वीज पडू शकेल अशी शक्यता वाटेल तेव्हा एक अतिशय उंच असा विजेचा वाहक conductor of electricity उभारावा जेणेकरून तो ढगाच्या आसपास जाऊ शकेल आणि आकाशातल्या विजेत खरंच इलेक्ट्रिसिटी असेल तर हा वाहक ती वाहून जमिनीवर आणेल. “
“मग केला का फ्रँकलिन यांनी हा प्रयोग? ?”
“नाही, तशी तर काही नोंद नाही कुठे, अमेरिकेत केलाही असेल. पण फ्रँकलिन च्या विचारांनी प्रेरित होऊन पहिल्यांदा प्रयोग करायला आणि आकाशात तळपणाऱ्या विजेला पारखायला आणि ती वीज म्हणजे electricity आहे हा प्रयोग यशस्वीपणे करायला धजावलेला पहिला शास्त्रज्ञ म्हणजे थॉमस-फ्रान्सिस डालीबार्ड (Thomas-François Dalibard) हा फ्रेंच शास्त्रज्ञ.  जॉर्ज-लुई लेकलर्क (Georges-Louis Leclerc, Comte de Buffon) या फ्रेंच शास्त्रज्ञाच्या सूचनेवरून त्याने फ्रँकलिन च्या Experiments and Observations on Electricity फ्रेंच भाषेत भाषांतर केले आणि त्याशिवाय त्याने पॅरिस जवळच्या Île-de-France याभागात  Marly-la-Ville या त्याच्या घरासमोर एक मेटल किंवा धातूचा ४० फूट लांबीचा रॉड वाईन च्या बाटल्यांमध्ये घालून उंच उभारला जेणेकरून कमी उंचीवरून जाणाऱ्या पावसाळी ढगांच्या जवळ तो येऊ शकेल. १० मे १७५२ साली असा एक ढग त्या रॉड जवळ आला आणि त्यातली वीज त्या रॉड मध्ये उतरली. बेन फ्रँकलिन यांचा दावा खरा ठरला.”
“असं वाटतंय की एखादा राक्षसच जणु काही बाटलीत बंद केला तुम्ही, पण असा बाटलीतला राक्षस म्हणजे तुम्ही माणसांनी लिहिलेल्या परीकथाच आहेत. ते जाऊदे. तू अगदीच सुरुवातीची माहिती दिलीस पण तुम्ही माणसांनीं विजेच्या वापराच्या बाबतीत खूपच प्रगती केली आहे ना? ते बल्ब काय, मोटर्स काय, बॅटऱ्या काय किती सांगू? पण तू हि कथा सांगता सांगता खूपच वेळ गेला. तुमच्या राज्यात वीज असली तरी आमच्या वेताळ लोकात आम्ही तसलं काही वापरत नाही, वेळच्या वेळी परत येतोच येतो. चल विक्रमा पुन्हा भेटू विजेबद्दल अधिक सांग तेव्हा आणि हो थोडक्यात सांगत जा पुढच्या वेळेपासून हाs हाss हाsss”
(क्रमश:)