विक्रमाच्या राज्यात दीपावलीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला होता. काय ती रोषणाई काय तो थाट वर्णावा महाराजा .. किती कौतुके करावी त्याची! रात्री केलेली रोषणाई आणि दारूकाम तर आकाशातल्या तारे तारकांना फिके पाडेल असे.. काही अग्निबाण सरळ सरळ आकाशात उंच जातायत.. थेट एका रेषेत आकाशाला गवसणी घालायला निघाल्यासारखे.. एका दिशेत .. तर भुईचक्रे गोलगोल फिरत फिरत सर्वत्र फिरत हलणाऱ्या रांगोळ्या घातल्यात कि काय असे वाटावे.. आगीचे छोटे छोटे ठिपके फेर धरून सर्वत्र फिरताना दिसले तेव्हा काही क्षणांसाठी तर प्रकाशाची फुलेच जणू फुलली आहेत कि काय, अग्निफुलांचा ताटवाच कोणी अंथरलाय कि काय असं वाटावं इतकं विलोभनीय दृश्य विक्रमाच्या महालातून दिसलं होतं आणि नगरातील प्रत्येक प्रजाजनाच्या मनात ठसलं देखील होतं. एकच आग ..अग्नि, तेज तत्व.. सरळ जात राहिली तर वेगळी आणि गोल -गोल वेटोळे मारत गेली तर वेगळी भासते ..पण असते अग्नीच.. तेज तत्वच.. पण फटाक्यांच्या रोषणाईत प्रत्येकाचं वेगळं रूप.. वेगळं सौंदर्य..जसं दरबारातल्या विविधरंगी, विविध ढंगी स्वभावांच्या माणसांचे, राज्याच्या कारभारात वेगवेगळे स्थान, तितकेच महत्वाचे.. तत्वनिष्ठ, करारी लोकांनी न्याय व्यवस्था सांभाळावी, हिशोबांवर करडी नजर ठेवावी, गुन्हेगारांना शासन करावं, लढाया मारण्यात मर्दुमकी गाजवावी तर आतल्या गाठीच्या, कावेबाज, धूर्त, वरकरणी चंचल, अस्थिर वाटणाऱ्या मंडळींनी बोलण्यात शत्रूला गुंतवावं, मुत्सद्देगिरी करावी, हेरगिरी करावी, कुणालाही थांग न लागू देता देशहित साधावं.. तेही प्रजाजनच, तितकेच राष्ट्रप्रेमी.. पण प्रत्येकाचे काम वेगळे राष्ट्राच्या हिताची गणिते मांडण्यात प्रत्येकाचे स्थान वेगळे.. बुद्धिबळाची नानारंगी, नानाचालीची प्यादी, हत्ती, घोडे, उंट आणि वजीरही शेवटी राजासाठीच प्राण देतात नाहीका? विक्रमाच्या मनात त्या अमावास्येच्या रात्रीही त्याच्या आवडीचा असा मनन -चिंतनाचा खेळ चालू होता.. एकेक दरबऱ्याला, सेवकाला, खबऱ्याला आणि माहितीतल्या एकेक प्रजाजनाला आपल्या मनात त्या चिंतनातून तो नेहमीप्रमाणेच पारखून पाहत होता..या चिंतनाच्या प्रवाहात चालत असता रस्त्यातल्या ओहोळात कधी पाय पडला आणि महाराजांच्या खडावा कधी भिजल्या हे त्यांनाही कळलं नाही .. पण वेताळाला कळलं ..
“काय महाराज तुमचे अंतरंग आणि विचार कळणं आम्हा वेताळांनाही दुरापास्त, निव्वळ अशक्य.. एकवेळ मुंग्या मेरुपर्वत गिळतील, सुतावर स्वार होऊन स्वर्ग गाठता येईल पण दिवाळीतील फटाके, दरबारातले मानकरी यांच्यात संबंध लावणं केवळ तुम्हालाच जमू शकतं.. पण असे विचार करता करता इकडची वाट का धरलीस? खलबते कर इथे या अरण्यात का आलास? एकाच ऊर्जेची विविध रूपे असतात, ऊर्जा वेगवेगळ्या रूपात असते, कधी साठलेली, कधी पळणारी , कधी प्रकाश, कधी वीज, कधी आवाज, कधी अग्नी हे सगळंच मला माहिती आहे मग आज काय नवीन सांगणार? विजेच्याही तीन गोष्टी सांगून झाल्या म्हणजे कशी जाणवली, कशी जाते ते कळलं, कशी साठवायची कळलं मग आता काय सांगशील? की या विजेचीही प्रकार असतात? काय ते पटकन सांग..नाहीतर तुझ्या डोळ्यासमोरील वीज क्षणार्धात नाहीशी होईल हे समजून चाल””माझ्या मनातलं ओळखलं नाहीस तर तू वेताळ कसला, माझ्या मनातील सरळ, वेडीवाकडी विचारचक्रे ओळखण्यात तुझ्यासारखा एक्स्पर्ट कोणीच नाही.. आणि हो विजेचेही दोन प्रकार, दोन स्वभाव असतातच बरका.. सतत एकाच दिशेत जाणारी, स्थिर स्वभावाची, एकबाणी अशी वीज किंवा स्थिरविद्युत Direct Current किंवा DC आणि सतत बदलणारी, उलट सुलट कोलांट्या मारणारी, क्षणाक्षणाला कमी जास्त होणारी, क्षणाक्षणाला पालटणारी अशी बदलती, गोष्टीतील दोन डोक्यांच्या सापासारखी बदलती, सळसळती गतिमान वीज Alternating Current.. पण हे दोन्ही प्रकार तितकेच कामाचे, उपयोगाचे आणि नेहमीच्या वापरातले.. मानवाच्या बुद्धीची कमाल म्ह…”
“नाही थांब थांब विक्रमा मला आता तू मानवी बुद्धीच्या माहितीची कथा सांगणार, किंवा या DC आणि AC विजेमधले पुस्तकी फरक आणि उपयोग सांगणार ते नको सांगूस.. कारण सर्वांनाच माहिती आहेत अगदी आमच्या वेताळ लोकातल्या पोट्ट्या पट्ट्यांनाही माहिती आहेत हो.. पण हा सगळा प्रपंच मांडला कशासाठी.. वोल्टाच्या त्या बॅटरीवर का सगळं जग चाललं नाही? काही सविस्तर सांगशील? ही AC विजेची वेटोळे मारणारी, दुतोंडी विजेची नखरेल, चंचल नागीण का सर्वांच्या घराघरात खेळवली ते सांगशील? ”
“हो हो वेताळा सांगतो सांगतो.. काळाच्या संदर्भात बोलायचं झालं तर भारतात १८१८ साली पुण्यात शनिवार वाड्यावर ब्रिटिश युनियन जॅक फडकला. १८५७ साली पहिले स्वातंत्र्य युद्ध झाले आणि त्यानंतर ९० वर्षांनी १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. हे जेव्हा भारतात घडत होतं त्याच्याच समांतर युरोपात १८०० साली वोल्टाने सिद्ध केले कि प्राण्यांमध्ये असली कोणतीही वेगळी वीज नसते आणि पहिली इलेकट्रीक बॅटरी तयार केली. १८०२ च्या सुमारास सर हंफ्रे डेव्ही यांनी एक मोठ्ठी बॅटरी तयार केली आणि त्या बॅटरी ची दोन टोके जवळ आणली तेव्हा त्या दोघांमध्ये स्पार्कींग झालं आणि डोळे दीपवेल असा मोठ्ठा प्रकाश पडला. झालं डेव्ही सारख्या तज्ज्ञांनी असा बॅटरी ला कारबनाईझ्ड इलेकट्रोड जोडून त्यांच्यामध्ये असं स्पार्किंग उडवून प्रकाश निर्माण करायला सुरुवात केली. यांच्यात सुधारणा करून असे तापून प्रकाश देणारे दिवे incandescent lamp तयार केले जाऊ लागले. या डेव्हीच्या हाताखाली मदतनीस -कम -विद्यार्थी म्हणून अतिशय कष्टाने आणि जिद्दीने शिकलेल्या मायकेल फॅरेडे याने १८३१-१८३२ दरम्यान केलेल्या प्रयोगांमध्ये सिद्ध केले की तांब्याच्या तारेत विजेचा प्रवाह वाहिला कि थोड्या काळासाठी शेजारच्या लोखंडाच्या तारेत चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. वीज (electricity)-चुंबकीय क्षेत्र (magnetism ) – प्रकाश (light) हि तिन्ही एकाच ऊर्जेची विविध रूपे आहेत हे फॅरेडेलाच पहिल्यांदा जाणवले. त्याने विद्युत -चुंबकीय परिणामाचा नियम Faraday Law Of Electromagnetic Induction सुद्धा सांगितला.”
“अरे विक्रमा सांगितलयस तू हे आधी..”

(Source: Smithsonian mag dot com)
“हो तर या नंतरच्या काळात हे विद्युत घट, तापणारे दिवे Incandescent Light यांवर युरोपात खूपच प्रयोग सुरु झाले. ब्रिटनमधल्या घराघरातले गॅस चे दिवे जाऊन हे बॅटरीवर पेटवले गेलेले दिवे दिसू लागले. साधारण याच काळात अमेरिकेत दोन भिन्न स्वभावाचे पण हे दिवे बनवण्यात स्पर्धा केलेले आणि एकंदरीत या विजेच्या उत्पादनात देखील परस्परांशी स्पर्धा केलेले दोन अतिशय हुशार तंत्रज्ञ घडले. त्यांची नावे थॉमस अल्वा एडिसन(Thomas Alva Edison ) आणि जॉर्ज वेस्टिंगहाउस (दुसरा)(George Westinghouse Jr ). तर १८४६ मध्ये जन्मलेला वेस्टिंगहाउस आणि १८४७ मध्ये जन्मलेला एडिसन. वेस्टिंगहाउस सैन्यात गेला, इंजिनीयर झाला, अतिशय शिस्तीचा, चांगलाच शिकलेला, मनमिळाऊ तर एडिसन याच्या अगदी उलट तसा कमी लौकिक शिक्षण घेतलेला पण प्रयोगशील, धडपड्या, विक्षिप्त. १८६५ च्या सुमारास अमेरिकेतले गृहयुद्ध (American Civil War) संपले आणि वेस्टिंगहाउस सैन्यातून बाहेर पडून इंजिनिअर होऊन कामाला लागला. अमेरिकेतल्या रेल्वे गाड्यांमध्ये होणारे अपघात टाळण्यासाठी आणि गार्ड लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्याने ब्रेक सिस्टीम तयार केली आणि हि चांगलीच विकली जाऊ लागली. पण यामुळे वेस्टिंगहाउस चा संशोधक म्हणून मीडियामध्ये फारसा गवगवा झाला नाही. पण त्याने १८६७ साली पिट्झबर्ग मध्ये वेस्टिंगहाउस एअर ब्रेक कंपनी काढली. चांगलाच धंदा मिळत असल्याने आणि तो मुळातच कामगार स्नेही असल्याने या कंपनीतील कामगारांना रहाण्याची उत्तम सोय केली. त्याने बाकीचे कंपनीमालक कामगारांच्या पिळवणुकीत रमले असताना या कंपन्यांमध्ये ऍम्ब्युलन्स आणि निवासी डॉक्टर अशा सुविधा दिल्या. कामगारांना साडेपाच दिवसांचा आठवडा (five and half day working week ) सुरु केले. कामगारांच्या निवासी सोसयट्या उत्तम पद्धतीच्या बांधल्या आणि एकंदरीतच कामगार कल्याणाची काळजी घेतली. एकंदरीतच दिलदार, राजा माणूस आणि त्यातही राष्ट्रप्रेमी. याच दरम्यान एडिसन ने फोनोग्राफ तयार केला आणि लोक अक्षरश: वेडे झाले. एडिसनला मेन्लोपार्क चा जादूगार (wizard of Menlo Park) असे बिरुद मिळाले आणि लोकांच्या गळ्यातला तो ताईत झाला. त्याने न्यू जर्सी मध्ये प्रयोगशाळा काढली. मुळातच एक चांगला व्यावसायिक सुद्धा असलेला एडिसन आता युरोपियन लोकांनी केलेली संशोधने वापरून त्यातून या बॅटरीवर लागणारे दिवे लावण्यात एक मोठा उद्योजक म्हणून नावारूपाला आला. या बॅटरीतून निघणाऱ्या वीजेलाच स्थिर विद्युत Direct Current DC असेही म्हणतात. या DC वीजेवर लावलेला अमेरिकेतला पहिला दिवा म्हणजे जे पी मॉर्गन (J. P. Morgan) यांच्या घरातला. या दिव्यांमुळे अमेरिकेत सुद्धा गॅस वर जळणारे दिवे जाऊन या बॅटरीवर लागलेले दिवे दिसू लागले, सुरुवात अर्थातच न्यूयॉर्क पासूनच झाली. एडिसन ने मग मॉर्गन सारखा धनाड्य माणसाच्या साथीने DC विजेवर प्रयोग सुरु केले आणि पत्रकारांमध्येही तो फेमस असल्याने एडिसन ने सांगावे आणि पत्रकारांनी ते छापावे असे समीकरण झाले. DC विजेवर चालणारे दिवे, बटणे, सॉकेट्स, अमुक तमुक आणि इलेक्ट्रिक मोटर्स (DC Motors) हे सर्व बनवण्याचा एडिसन चा धंदा तेजीत चालू लागला. याच DC वर न्यूयॉर्क मधल्या पर्ल स्ट्रीट येथे एडिसन ने पहिला DC विद्युत निर्मिती प्रकल्प (DC Power Plant) अतिशय खर्चाने-अर्थातच मॉर्गन वगैरे बँकर मित्रांच्या सहकार्याने – टाकला आणि त्या वर आजुबाजुच्या केवळ एक मैल अंतरावरच्या घरांना तो वीज पुरवू शकला.. ”
“विक्रमा आज इतिहासाचा तास आहे का फिजिक्स चा हेच कळत नाहीय पण छान वाटतंय.. पण एवढा खर्च करून केवळ मैलावरच्या घरांनाच वीज मिळाली? इतकी कंजुषी? हा एडिसन तर एवढा हुशार ना मग या गोष्टीवर त्याला उत्तर मिळू नये म्हणजे कमाल झाली. का तेव्हा हि AC प्रकारची वीज सापडलीच नव्हती? काय झालं काय एवढ्या हुशार एडिसन ला ? इतकी हजाराहून जास्त पेटंट्स मिळवली ना पठ्ठयाने? इथेच का अडला?”
“एकेक पाहू. एडिसन हुशार वगैरे मान्य. पण त्याच्याकडे काम करायला त्याने अनेक हुशार माणसेही ठेवलेली होती. त्यांनी काम केले तरी स्वामित्व हक्क एडिसन इलेकट्रीक चे आणि पर्यायाने एडिसन चे होत. तीच दुसऱ्याचे श्रेय घेण्याची परंपरा आजतागायत अनेक देशात, काळात, ऑफिसात, विद्यापीठात, संशोधन क्षेत्रात कायम आहे. याविरुद्ध वेस्टिंगहाउस. त्याच्याही स्वतः:च्या नावावर सहाशेच्यावर पेटंट्स आहेत. पण तो सहकाऱ्यांना श्रेय देणे, त्यांची मते ऐकून प्रसंगी आपली चूक मान्य करून दुसऱ्याला प्रोत्साहन देणे, त्याच्या नावावर त्याला पेटंट्स घेऊ देणे, त्यात गुंतवणूक करून कंपनी काढून देणे आणि पर्यायाने अधिक रोजगार संधी निर्माण करणे यात विश्वास ठेवणारा होता. भारतीय संदर्भात बोलायचं झाल्यास जे आर डी टाटा(JRD Tata) वगैरेंसारखा दूरदृष्टीचा आणि जनहित दक्ष उद्योगमहर्षी होता तो. प्रत्येकाचे मानवी स्वभाव असो. एडिसन च्या युरोपातील ग्राहकांचे नादुरुस्त लॅम्प, मोटर्स वगैरे दुरुस्त करण्यासाठीच त्याच्या कंपनीत रुजू झालेल्या एका सर्बियन इंजिनिअर ने त्याला त्याची AC मोटर्स ची संकल्पना सांगितली पण होती, डिझाईन दाखवले होते. त्या सर्बियन इंजिनियर ला युरोपातील त्याचे काम आणि हुशारी पाहून युरोपतील बॉस ने तू अतिशय हुशार आहेस तर तू अमेरिकेत जा आणि आमचा मुख्य इंजिनियर हो. असे ते पत्र घेऊन तो विलक्षण हुशार माणूस अमेरिकेत आला होता. पण कसचं काय? एडिसन ने ते पद दिले नाही त्याला. खिशात पैसे नसल्याने त्याने एडिसन ची नोकरी स्वीकारली. चीफ इंजिनियर सोडा साधा इलेकट्रीशियन झाला. पैशाची चणचण दुसरं काय. AC मोटर चे डिझाईन दाखवल्यावर एडिसन ने ते धुडकावून लावले आणि त्यापेक्षा तू माझी DC मोटर्स ची जुनी सारी डिझाइन्स सुधारून दे. तुला ५०,००० हो पन्नास हजार डॉलर्स देईन असे एडिसन त्याला म्हणाला होता म्हणतात. आपले AC मोटर चे डिझाईन साफ धुडकावले गेले म्हणून दु:खी झाला तरी एक आव्हान म्हणून त्या सर्बियन इंजिनियर ने एडिसन चे आव्हान स्वीकारले आणि दिवस रात्र मेहनत करून तो सुधारित डिझाइन्स दाखवायला गेला एडिसन ला. एडिसन ने ती ठीक आहेत म्हणल्यावर या इंजिनियर ने त्याला कबूल केलेले ५०,००० हजार डॉलर मागितले. तर एडिसन त्याला छद्मीपणे म्हणाला म्हणे की तुला साधा अमेरिकन विनोदही कळत नाही कारे? तुझा पगार १० डॉलर ने वाढवीन. चल आता जा कामाला. ”

(Source: Commons dot wikimedia dot org)
“हा काय माज? काय हा आगाऊपणा? हुशार माणसांना पिळून काढण्याची प्रथा जुनीच दिसते. पण काय रे एडिसन तर एवढा हुशार त्याला आपल्या DC विजेचे दोष माहित नव्हते? त्याने का या हुशार माणसाची अशी चेष्टा केली? त्याला AC विजेची माहिती नव्हती? आणि कोण रे हा सर्बियन इंजिनियर? काय झालं पुढे त्याचं? बिचारा गावी गेला असेल परत किंवा चाकरी करत बसला असेल निमूटपणे..अपमान सहन करत..होना?”
“नाही तसं काही झालं नाही. तो सर्बियन इंजिनियर सुद्धा काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता. त्या हुशार, कल्पक, अज्ञाताला गवसणी घालण्याची असामान्य प्रतिभा असणार्या सर्बियन इजिनियर चं नाव निकोला टेस्ला(Nicola Tesla). एडिसनला टक्कर देऊ धजणार्या वेस्टिंगहाऊसला हा अपमानित किमयागार जाऊन मिळाला आणि वेस्टिंगहाऊस ने पूर्ण विश्वास टाकल्याने या टेस्लाने इतिहास घडवला आणि AC विजेने बाजी मारली. पण तो इतिहास अजून घडायचा होता. टेस्ला आपल्या प्रारब्धातले अपमान भोगून घेत होता असे म्हण हवं तर. असो भविष्य माहित असते तर एडिसन तरी असा का वागला असता म्हणा. तर तेही असो. पण एडिसन ने एकदंरीतच DC वापरण्यासाठी लागणारी सर्व उपकरणे तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले होते,उपकरणे तयार केली होती, ती वारंवार खराब होत असल्यामुळे त्यांच्या मेंटेनन्स चेही चांगले पैसे मिळत होते. मग कशाला अशी हातची लक्ष्मी सोडून तुलनेने अपरिचित असलेल्या AC विजेकडे लक्ष द्यायचे असे काही त्याच्या मनाने घेतले असेल. DC ची कमतरता त्याला माहित असेलही कदाचित. कुठल्यातरी परदेशातून आलेल्या, कफल्लक सर्बियन इंजिनियर ला का भाव द्यायचा असा विचारही आला असेल.. पण त्याने स्वतः:चा हेका सोडला नाही आणि इथेच तो हरला. काळाचे बदलणारे वारे त्याला कळले नाहीत. विशेष म्हणजे त्यावेळी अमेरिकेत उद्योगांची भरभराट होत होती. वाफेच्या इंजिन ऐवजी विजेने काम झाले तर पाहिजे होते. वीज केवळ काही श्रीमंतांच्या घरी दिवे लावायला नाही तर सर्व शहरे, गावे इकडे हवी होती आणि ती स्वस्त हवी होती. एडिसनला ते शक्य नव्हते DC च्या हेक्यामुळे. हि सर्व परिस्थिती वेस्टिंगहाउस ला माहित होती. फ्रेंच तंत्रज्ञ गौलार्ड आणि ब्रिटिश असलेल्या गिब्स (Gaulard and Gibbs) यांनी त्या काळात AC मधील विद्युत दाब वरून खाली आणण्याचे तंत्रही विकसित केले होते. म्हणजेच पहिले ट्रान्सफॉर्मर्स(Electrical Transformers) विकसित केले होते. वेस्टिंगहाउस ने त्या ट्रान्सफॉर्मर्स चे हक्क किंवा पेटंट्स विकत घेतले होते आणि त्यांच्यावर संशोधन आणि दुरुस्ती करून वेस्टिंग हाऊस ने १८८६ साली वेस्टिंगहाउस ट्रान्सफॉर्मर्स कंपनी काढली.. ”
“पण हे असं का केलं वेस्टिंगहाउस ने? कशाला नसता खर्च? ”
“वेताळा त्या काळात AC विजेचा वापर कुठल्यातरी पद्धतीने करावा लागेल हे जाणवलेला उद्योजक म्हणजे वेस्टिंग हाऊस. एकतर कुठल्यातरी एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात वीज तयार करून ती दूर दूर पर्यंत घेऊन जावी लागेल असे चित्र त्याच्या डोळ्यासमोर होते. म्हणजे धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठवून ते छोट्या छोट्या चॅनल ने सगळीकडे पसरवणे किंवा वेस्टिंगहाउस च्या आधीच्या गॅस इंडस्ट्रीमध्ये काम करण्याच्या अनुभवातून त्याच्या डोळ्यासमोर चित्र स्पष्ट होते. जिथे गॅस तयार करण्याचा प्लॅन्ट आहे तिथे त्याच्यावरचे प्रेशर किंवा दाब वाढवायचा आणि तो वाढलेल्या दाबाने लांबवर पाठवायचा. जिथे तो गॅस घरात वापरायचाय तिथे दाब कमी करायचा आणि घरात घ्यायचा. हे गॅस चा दाब कमी करणं गॅस व्हॉल्व ने साध्य होतं तेच विजेच्या बाबतीत ट्रान्सफॉर्मर्स ने साध्य होतं ”
“गॅस मध्ये कळलं..विजेत कसं साध्य होतं?”
“गॅस च्या बाबतीत जो दाब किंवा प्रेशर ते विजेच्या बाबतीत वोल्टेज किंवा विद्युतदाब.. विद्युतशक्ती हि विजेचा दाब आणि विजेचा प्रवाह यांच्या गुणाकारातून मिळते(Electric Power = Voltage x Current). पण अडचण अशी आहे की विजेच्या तारेत अधिक विजेचा प्रवाह सोडला तर त्या तारेच्या विद्युतरोधा मुळे तार गरम होते, विद्युतशक्ती वाया जाते.. म्हणून लांब अंतरावर वीज पाठवायची तर वोल्टेज वाढवायचे आणि विद्युतधारा कमी करायची म्हणजे विजेची गळती कमी होईल हे स्पष्ट होतं.. आणि यात ट्रान्सफॉर्मर कामाला येतील हे वेस्टिंग हाऊस ला कळलं होतं म्हणूनच त्याने आधीच त्यात पैसे गुंतवून कंपनी टाकली होती. शिवाय आपल्या भव्य राजप्रासादाला लाजवेल अशा घराच्या आवारात AC वीज तयार करणारा पॉवर प्लॅन्ट सुद्धा तयार केला होता.”
“विक्रमा ते ठीक आहे पण हि AC वीज अशी काय वेगळी असते रे बॅटरीतून तयार होणाऱ्या विजेपेक्षा? ”
“वेताळा, AC वीज किंवा Alternating Current हि सतत पलट्या मारणारी वीज असते. बॅटरीतून निघणारी वीज ही धन(+) इलेकट्रोड कडून निघते आणि ऋण(-) इलेकट्रोड कडे सरळ जाते आणि यात कधीच काही फरक पडत नाही. बॅटरी चांगली असे पर्यंत वीज हि एका दिशेत, एका बाण्याने जात राहते. त्यात बदल होणे नाही. हि DC वीज. पण AC विजेमध्ये एका क्षणाला जे धन(+) टोक असते ते दुसऱ्या टोकाला ऋण(-) टोक होते. पुन्हा पुढच्या क्षणाला अदलाबदल, त्या पुढच्या क्षणाला पुन्हा उलट असा हा प्रकार होत राहतो त्यामुळे एकाच टोकाला अदलाबदलीने निगेटिव्ह आणि पॉजिटीव्ह प्रभार मिळत राहतो. या अदलाबदली करण्याच्या स्वभावामुळेच या विजेला alternating current म्हटले जाते.. ”
“फारच काहीतरी वेगळा प्रकार दिसतोय हा अदलाबदलीचा, पण हि अदलाबदल दिवसात, तासात किती वेळा होते ? आणि आपल्याला ती कळत का नाही?”
“वेताळा हि अदलाबदल तिथे AC वीज तयार करणाऱ्या जनित्रावर किंवा AC Generator वर अवलंबून असते. भारतात हा बदलाबदलीचा दर सेकंदाला ५० वेळा असा आहे किंवा ५० हर्ट्झ इतका आहे. म्हणजे सेकंदाला ५० वेळा विजेचे एक टोक धन(+) नंतर ऋण(-) नंतर धन (+ ) असे होणार आणि त्याउलट दुसरे टोक ऋण (-) नंतर धन (+) नंतर ऋण(-) असे दर सेकंदाला पन्नास वेळा होणार म्हणजे आपल्या घरात लाईट चालू असेल तर त्या सर्किट मध्ये वीज पन्नास वेळा उलट – सुलट -उलट -सुलट -उलट -सुलट अशी वाहणार.. विजेचा वाहण्याचा वेग किती तर दर सेकंदाला ३,००,००० किमी..म्हणजे दर सेकंदाला ३ लाख किमी जाणारी हि वीज त्या सेकंदात ५० वेळा दिशा बदलणार.. कोणाला कप्पाळ कळणार आहे.. १.३ सेकंदात चंद्रावरून प्रकाश पृथ्वीवर पोहोचतो.. आपल्या घरात ती वीज किती आणि कशी फिरत असेल याची कल्पना करणेही अशक्य आहे.. म्हणूनच आपल्याला हि दिशा बदलणारी वीज, कशी आणि कधीकधी दिशा बदलत राहते हे आपल्या डोळ्यांना, जाणिवांना कळतही नाही.. पण वीज वाहून नेणाऱ्या तांब्याच्या – लोखंडाच्या वायर्सना कळते आणि जाणवते.. ”
“नाही म्हणजे विक्रमा आज तू फार म्हणजे फारच टाईमपास केलास.. अगदी शेवटी शेवटी AC विजेपर्यंत आलास.. पण एडिसन ने अपमानित केलेल्या, कुचेष्टा केलेल्या त्या अतिहुशार इंजिनियर ने नक्की काय केलं नंतर? वेस्टिंगहाउस ची AC वीज वापरायची हौस भागली का? त्याने धंद्यात लावलेला पैसा योग्य ठिकाणी लागला की नुकसानीत गेला? सेकंदाला पन्नास वेळा झप -झप दिशा बदलणाऱ्या AC विजेचा नक्की काय फायदा झाला.. DC विजेने साध्य होणार नव्हतं ते अशा AC विजेने नक्की का साध्य झालं? आपणा भॊवती नक्की हि AC वीज नक्की कोणाच्या कर्तबगारीने आणि चतुराईने वापरली जाऊ लागली ते सांग..कोणाच्या चतुराईने ती हजारो किलोमीटर वर जाऊन अपेक्षित काम करू लागली ते सांग.. काहीच सांगितलं नाहीस झालं.. पार्श्वभूमी किंवा background तयार करण्यातच आजची रात्र वाया घालवलीस पण माझ्या प्रश्नांची उत्तरे घेतल्याशिवाय मी तुला सोडणार नाहीये.. मला उत्तर हवंsssय. मी दर अमावास्येला येणार म्हणजे येणाsssर.. तुमच्या AC विजेसारखा मी दिशा बदलणार नाही आणि वेळही बदलणार नाही.. जादा खुश मत होना.. हाs हाss हाsss.. ”
(क्रमश:)
- विजेची गोष्ट ३: वीज वाहू लागली, वोल्टा आणि गॅल्वानी (DC Electric Current and First Battery)
- विजेची गोष्ट २: शॉक देणारे मासे, कॅव्हेंडिश, विजेचा प्रभार(electric charge ) आणि विजेची तीव्रता (electric potential difference )
- विजेची गोष्ट : १: वीज काय आहे आणि ती वाहते कशी (Electricity: What it is and how does it flow?)
- Electromagnetism चा बहुमुखी वैश्वानल : बरसणारे इलेक्ट्रॉन्स, वेटोळे घालणारे चुंबकत्व, उधळणारे फोटॉन्स आणि फॅरेडेची अफाट बुद्धिमत्ता
- Four fundamental forces बहुरूपी, बहुढंगी, बहुत लोकांसी चालवणाऱ्या बलांची चतुरंग सेना
- गोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)
- मुखपृष्ठ