नवद्रव्यांमधले दुसरे द्रव्य: मी आपपरमद्रव्य (I, The Liquid Super-substance)

विक्रमाच्या शेजारच्या राज्यात आक्रितच घडले होते. झालं काय कि विक्रमाच्या शेजारच्या राज्याला लागूनच समुद्र किनारा होता. समुद्रातल्या म्हणजे समुद्राच्या तळाशी दूर कोठेतरी महासागरामध्ये जोरदार हालचाल झाली. साधीसुधी हालचाल नाही तर एका बाजूचा समुद्रतळ दुसऱ्या बाजूच्या समुद्रतळावर अक्षरश: कुरघोडी करून गेला आणि त्याने असा काही गहजब झाला कि समुद्राच्या पोटातलं पाणीच डचमळलं आणि महाकाय-अतिमहाकाय-अतिप्रचंड लाटांच्या लाटाच किनाऱ्या कडे जणू एक अतीप्रचंड राक्षसी मासा रागाने चाल करून यावा तश्या येऊ लागल्या. त्या राक्षसाच्या जबड्या मध्ये येणारी प्रत्येक होडी, जहाज, नारळा-पोफळीचे झाड, महाकाय दगड, मंदिराची शिखरे, इमारती, गाड्या, रथ, प्राणी सर्व सर्व गिळंकृत झाल्या सारखी गायब झाली. सर्व किनारपट्टीवरच नाही तर शेतांमध्ये , वाड्यांमध्ये, वस्त्यांमध्ये सर्वत्रच विनाशाची भेसूर कहाणी जिथून तिथून सर्व लोकांच्या रडण्यातून, विलापातून, आक्रोशातून दूरवर पसरत गेली. विक्रम राजाने त्याच्या प्रजाहित दक्ष, सर्व जन हितैषी धोरणाला जागून शेजारी राजाला सर्वतोपरी मदत वेगवेगळ्या प्रकारे पोहोचवलीच पण त्याच्यातला पदार्थ विज्ञान किंवा फिजिक्स जाणणारा विचारवंत या सुनामीच्या रूपात अवतरलेल्या जलद्रव्याच्या विराट रूपाविषयी विचार करून त्या जलद्रव्याच्या विविध गुणांविषयीच्या चिंतनात तो रममाण झाला होता.

“काय रे विक्रमा, कमाल झाली बाबा तुझ्या पुढे. अक्राळविक्राळ सुनामीने अनेक गावा – वस्त्यांमध्ये धुमाकूळ घातला. शेती -घरे -दारे – बागा – बने उध्वस्त झाली आणि तू त्या प्रजाजनांच्या हिताची चिंता करण्या ऐवजी आलेल्या सुनामीच्या, त्यातल्या जलद्रव्याच्या गुणांच्या चिंतनात मग्न झालास. कमाल आहे रे तुझी. आणि या जलद्रव्याच्या – आप द्रव्याच्या चिंतनाने असा काय लाभ होणार आहे, सुनामीने होणारे नुकसान कसे भरून निघणार आहे? आणि हे आप द्रव्य म्हणतोस ते असते तरी काय? पाणी वाहते, पडते हे सगळ्यांना माहित आहे.. या विषयात अजून काय विचार करण्या सारखे आहे? ”

“वेताळा, मागील एके वेळी आपण स्थायूच्या विराट पुरुषाला आवाहन केले होते, मनोभावे स्वरूप प्रगट करून, त्याची माहिती देऊन कृतार्थ करण्याची प्रार्थना केली होती,  तेव्हा तो स्थायू पुरुष प्रगट झाला होता हे तुला आठवत असेलच. त्याच प्रमाणे आपण आता विराट अशा सकळ मानव सृष्टीला अंतर्बाह्य व्यापून उरलेल्या, सर्व सृष्टीला शीतलता, प्रवाहीपणा आणि सर्व समावेशकता आणि अखंड कार्यरत राहण्याची प्रेरणा देणाऱ्या महाजल द्रव्याला, महा आप द्रव्याला आवाहन करूया.. त्या आपरूप परमपुरुषाला आवाहन करतो कि हे आपपुरुषा, सकळ सृष्टीला पोटाच्या पोरासारखा सांभाळणाऱ्या मातेचे प्रेम देणाऱ्या परमपुरुषा आम्ही तुला भेटण्या साठी, तुझे रूप जाणून घेण्यासाठी आतुरलेले आहोत..उत्सुक आहोत.. तू तात्पुरता कसा असतोस आणि चिरकालासाठी कसा असतोस? कुठे राहतोस? कसा दिसतोस? तुझे पंचेंद्रियांना जाणवणारे गुण कोणते, तुला जाणणारे सजीवांचे इंद्रिय कोणते.. कृपया प्रगट होऊन आम्हाला स्वरूप दर्शन, तुझे विश्वाच्या चराचरात असलेले दर्शन घडव..आम्हाला पावन कर.. “..

विक्रमासारख्या तापसी राजाचे आवाहन सकळ सृष्टी विहारी आप पुरुषाला कळले आणि तो त्वरितच विक्रमाच्या भेटीला आला..सर्व विहारी, सर्व संचारीच तो.. यत्र-तत्र-सर्वत्र सतत विहार करणे हाच त्याचा स्थायीभाव..विक्रमाच्या आवाहनानंतर काही क्षणातच एक अपूर्व दृश्य त्या रात्री सर्व चराचराला पाहायला मिळालं.

आपल्या आजूबाजूची आपद्रव्याची  रूपे
अमावास्येच्या काळोख्या आकाशाच्या कृष्णपटावर दूर आकाशात एक रंगीबेरंगी महाकाय असा गोलाकार प्रकाश गोलक अवतीर्ण झाला आणि त्या पाठोपाठ खळखळ, झरझर, निर्मळ प्रवाहांचे, सागराच्या लाटांचे, स्थिर तळ्याचे, शरीरात अखंड प्रवाहित असणाऱ्या अन्नरसाचे, अवरक्त रंगाच्या रक्ताचे प्रवाह त्यात दिसू लागले, त्यांचे सरसर-झसझस-रसरस आवाजांच्या, अतिसूक्ष्म कीटकांपासून अतिविशाल पर्वतापर्यंतच्या विविध जलाकारांचे हलते प्रदर्शनच, विराट हलता बोलता चालता देखावाच समोर अवतीर्ण झाला. कीटक-पक्षी-प्राणी-मनुष्य इत्यादींच्या शरीरातील पाण्याच्या, जलरूप अंशांच्या या दर्शनाने सारी स्थिर सृष्टी अवाक झाली आणि त्या विराट जलरूपाला विनम्र वंदन करती झाली.. ओढे, नाले, नद्या, सरोवरे, झरे, समुद्र इथून ते अथांग महासागरांचा तो विशाल पट पाहून केवळ आणि केवळ शरणागत भावच उमटले.. मग काय पावसाच्या एका थेंबापासून- त्याच्या डोंगरावरील उडीपासून ते त्याच्या अतिविशाल नदीच्या स्वरूपात समुद्र समाधीपर्यंत साराच जीवनपट सादर झाला.. मग शरीरात अन्नसेवनापासून सुरु होणाऱ्या प्रवासापासून तो पचनादी प्रक्रियेतून ते मलमूत्रादी उत्सर्जनातील जलरूपाचा प्रवास दिसला.. मग शरीरातील पियुषिका किंवा पिट्युटरी, थायरॉईड इत्यादी ग्रंथींनी त्यांची कार्यपद्धती सादर केली ..मग कफ-पित्त- वात यांमधील पित्तरुपात असणाऱ्या जलद्रव्याने स्वतःचे गुण उलगडून दाखवले.. मग पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाणी, सरबते, मद्ये इत्यादींपासून औषधाला वापरली जाणारी आयुर्वेदातील चाटणे, काढे, रसौशधी सामोऱ्या आल्या आणि त्यांनी ऍलोपॅथी मधील लिक्विड्स च्या स्वरूपात, सलाईन स्वरूपात आणि मुख्य म्हणजे विविध रोगांतील वॅक्सीन्स च्या स्वरूपात वापरण्यात येणाऱ्या आपरूप द्रव्यप्रकारांबरोबर जुगलबंदी नृत्य सादर केले .. इथून ते शरीराबाहेर पडून महासागराच्या खोलात, जमिनीच्या पोटात..अतिशय खोल खडकातून बाहेर येऊन सर्व जगाला कार्यरत ठेवणाऱ्या पेट्रोल, डिझेल, केरोसीन इत्यादी इंधनांनी त्यांचा दृक-श्राव्य देखावा सादर केला आणि सरतेशेवटी या सर्व आप प्रकारांच्या विविध रंगी, विविध ढंगी आकारातून एक महाकाय जलपुरुष समोर अवतीर्ण झाला आणि मोठ्या प्रेमाने, शांत, संयमी पण मायेच्या ओलाव्याने परिपूर्ण भरलेल्या सुंदर ओघवत्या स्वरात विक्रमाला म्हणाला..

“बाळ विक्रमा, कसा आहेस तू  बेटा? आज कशी काय माझी आठवण काढलीस बरं.. तुझ्या, तुम्हा सर्वांच्याच अवतीभोवती सर्व गरजांना पूर्ण करण्यात माझी सर्वच आपरूपे तुमच्या मदतीला सदैव धावत, प्रवाहित होत असतातच.. मग आज कशी आठवण केलीस? सर्व ठीक चाललं आहे ना बाळ? ”

“सकळ सृष्टीचं पालन पोषण करणाऱ्या, दुःखनिवारण करणाऱ्या हे परम जल पुरूष तुला त्रिवार नमन.. माझ्या सारख्या य:कश्चित पामराच्या हाकेला प्रतिसाद देत तू इथे आलास याबद्दल मला खूप भरून येतंय..कंठ दाटून येतोय..पण आईला का कोणी असं कोरड्या उपचारांनी, बोलांनी बोलतं.. पण तुझे खरंच खूप आभार.. आम्हा माणसांच्या नित्याच्याच सान्निध्यात असणाऱ्या तुझ्या सारख्या जवळ असून, क्षणोक्षणी मदत करूनही अतिपरिचयाने दुर्लक्ष होणाऱ्या तुझ्यासारख्या विराट परम तत्वाची आधी क्षमा मागतो.. आणि म्हणूनच तुझी पुन्हा नव्याने ओळख करून घ्यावी, स्वरूपाविषयी जाणावे, लक्षणे ओळखावी, ओळखीची खूण सर्व सृष्टीच्या मनात रुजवावी म्हणूनच या अशा अमावास्येच्या रात्री तुला तुझी सर्व कामे सोडून बोलावलं.. हेतू हाच कि तुझ्या या ओळखीने प्रजाजनांनी, भूतलावरील मनुष्य जनांनी तुझे यथोचित भान आणि  मान सन्मान राखावे आणि कोणताही अतिरेक करून तुला क्रुद्ध करून मानवजातीने स्वतः:चेच नुकसान करून घेऊ नये .. ”

“तुझा उद्देश तुझ्या लौकिकालाच साजेसा असा आहे, उदात्त आहे.. बोल बाळा काय माहिती हवी आहे तुला..”

“हे आप परम पुरुषा, आणखी एक नम्र विनंती.. तुझे हे विराट, जगद्व्यापी, सर्व संचारी रूप पाहून, तुझे तेज पाहून खरेच सारी सृष्टी चकित झाली आहे आणि काहीशी भयभीत सुद्धा झाली आहे तेव्हा हे परमपुरुषा, हे अतिविराट रूप सोडून तू काहीसे आम्हाला आश्वस्त करणारे, आमची भीतीने मती कुंठित करणार नाही असे रूप धारण कर, तू म्हणजे साक्षात प्रेम, मृदुता, शीतलता..तेव्हा तसे काहीसे रूप धारण कर हि तुझ्या चरणी प्रार्थना.. ”

(source: www(dot)diviantart(dot)com)

“असं म्हणतोस! तथास्तु..  ” असे म्हणत ते महाविराट रूप जणू काळोखात विलीन झाले आणि तिथे तितकेच दिव्य, सुंदर असे मत्स्यरूप प्रकट झाले, मत्स्यपुरुष जणू.. तर हे भव्य मत्स्य पुरुषरूप सामोरे येऊन अतिशय शांत स्वरात म्हणाले.. “आता तर ठीक आहे ना? विचार आता.. ”

द्रव कोणाला म्हणावे?
“हे आप पुरुषा, मला सांग आम्ही आप रूप द्रव्य कोणाला म्हणायचं? आप म्हणजे लिक्विड्स च्या गटात एखाद्या द्रव्याची गणना कशी करायची?””छान प्रश्न आणि याचे सोपे उत्तर म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात आणि हवेच्या दाबात, जे पदार्थ लिक्विड फॉर्म मध्ये असतील त्यांना लिक्विड किंवा आप म्हणायचे. पृथ्वीच्या बऱ्याचशा भागात पाणी हे द्रव स्वरूपात असते. पण मंगोलिया आणि रशियातल्या काही प्रदेशात ते वर्षातला बराचसा काळ बर्फ स्वरूपात असते, म्हणजे सॉलिड रूपात असते, त्यामुळे याभागातल्या लोकांना पाणी हे बर्फ या सॉलिड स्वरूपात दिसते.”

द्रवांचे साधारण गुणधर्म 
“पण हे आपपुरूषा, तुझे काही गुणधर्म सांग. वैशेषिकात तुझे संदर्भ आले आहेत पण तू स्वतः त्याबाबत सांगावेस अशी तुला विनंती आहे “”जरूर जरूर विक्रमा. माझे गुण म्हणजे रंग, चव, तापमान, प्रवाहीपणा, चिकटपणा, मोजणी करता येणे, मोजण्याचे एकक असणे, वेगळे असणे, जोडलेले असणे , दूर जाणे , जवळ जाणे ,गुरुत्वबळ माझ्यावर काम करते आणि मी दुसऱ्या पदार्थांवर बळ लावू शकतो. हे गुणधर्म वैशेषिक दर्शनातही सांगितले आहेत. केवळ माझेच म्हणजे लिक्विड्स चेच विशेष गुण म्हणजे आम्ही नैसर्गिक रित्या अतिशय सहजपणे वाहतो आणि आमच्यामध्ये कमी जास्त चिकटपणा असतो. पाण्यात तो कमी असेल पण मधात, डिंकात तो जास्त असतो. त्याला तुम्ही viscosity असेही म्हणता. पाण्यासारख्यांचा रंग नितळ पांढरा असतो, नैसर्गिक रित्या ते गार असते आणि त्याची चव गोड असते. पण इतर द्रवांना वेगळे रंग, तापमान,  आणि चवी असू शकतात.”

द्रव वाहतात म्हणजे काय?
“पण हे आप पुरुषा, तुम्ही जेव्हा वाहता, म्हणजे पाणी वाहते आहे ते वाहणे आम्ही कसे समजून घ्यायचे? काय डोळ्यासमोर आणायचे?””सुंदर प्रश्न विक्रमा, साधु, साधु. हे बघ विक्रमा, तुमच्या शयन गृहांमधे तुम्ही कापसांच्या, पिसांच्या गाद्या वापरता, तर अशा मोठमोठ्या गाद्या त्याही कापसा ऐवजी पाण्याने बनलेल्या मोठ मोठ्या गाद्या एकमेकांवर टाकलेल्या आहेत अशी कल्पना कर. अशा पाण्याच्या लाखो करोडो अब्जावधी थेंबांनी बनलेल्या,  एकावर एक टाकलेल्या आणि सतत पुढे पुढे सटकत जाणाऱ्या गाद्यांचे हजारो थर पुढे पुढे सटकत चालले आहेत अशी जेव्हा कल्पना करशील तर तुला पाण्यासारख्या द्रवांची आणि त्या द्रवांच्या वाहण्याची कल्पना करू शकशील. या गाद्या त्यांच्या वरच्या आणि खालच्या पाण्याच्या गाद्यांना सहजपणे पुढे मागे जाऊ देत असतील तर तो प्रवाह हा अतिशय सहज, वेगवान प्रवाह असेल. पण या गाद्या त्यांच्या खालच्या आणि वरच्या गाद्यांना सहजपणे पुढे मागे जाऊ देत नसतील, त्यांना वाहण्यात अटकाव करत असतील तर त्या प्रवाहाला चिकटपणा (viscosity) येईल. सहजपणे वाहणारे(fluent liquids) प्रवाह म्हणजे पाणी, पेट्रोल इत्यादींचे प्रवाह. पण मध, विविध घट्ट चिकट आयुर्वेदिक चाटणे हि चिकट द्रवांची(viscous liquids) ची उदाहरणे आहेत. मधाच्या प्रवाहातील मधाच्या थेंबांच्या गाद्या इतक्या सहजपणे स्वतः पुढे वाहत नाहीत. शिवाय त्यांच्या वरच्या आणि खालच्या गाद्यांना हि वाहायला, पुढे जायला विरोध करतात. यांच्यावर गुरुत्व बल काम करते त्यामुळे जास्त उंचीकडून कमी उंचीकडे हे द्रव वाहत राहतात. ”

द्रवाची रूपे आणि अस्तित्व कुठे कुठे असते? 
“आभारी आहे आपपुरुषा, पण मला कृपया सांग कि तू चिरकाल किंवा अधिक काळ कोणत्या रूपात असतोस  आणि क्षणिक रूपे कोणती? “”विक्रमा, माझे सुक्ष्मरूप चिरकाल टिकणारे आहे, पण जसा आकार वाढत जातो तसा मी त्या रूपात कमी काळ टिकतो. माझे तीन प्रकार म्हणजे जलचर प्राण्यांच्या शरीराचे बाह्यकवच, इंद्रिये आणि वस्तू. जलयुक्त बाह्कवच असलेली शरीरे ही मातेच्या गर्भातून जन्माला आलेली नसतात आणि ती पाण्यातच असतात. सोप्या शब्दांत बहुतेक जलचर हे सस्तन प्राण्यांच्या वर्गात मोडत नाहीत. परंतु तरीही या जलचर प्राण्यांचे  शरीर हे स्थायू व जलरेणूंच्या मिश्रणातून बनलेले असल्याने त्याद्वारे त्यांना आनंद व दु:ख यांचा अनुभव घेता येतो.”

आपरूप ओळखायचे इंद्रिय आणि आधुनिक काळातले मुख्य गुण  
“पण मला सांगा कि आपरूप ओळखायचे खास असे कोणते इंद्रिय आहे? आपरूप आजूबाजूला कोणकोणत्या स्वरूपात असते याचे तू चित्रच रंगवलेस पण या द्रवांचे आधुनिक भौतिक शास्त्रात माहित असलेले गुण  कोण कोणते आहेत? ”

“विक्रमा, माणसांच्या आणि अनेक माणसांना द्रव किंवा आप द्रव्याची जाणीव हि त्यांच्या आप द्रव्याचा अंश मोठ्या प्रमाणात असणाऱ्या, अतिशय ओलसर, लवचिक अशा जिभेने होते. त्या जिभेद्वारेच आप द्रव्याची जाणीव करून घेता येते, चवीचे ज्ञान घेता येते आणि अन्नरसांचा मनमुराद आस्वाद घेता येतो. वैशेषिक दर्शनात म्हटल्या प्रमाणे द्रव हे आजूबाजूच्या स्थायू, द्रव, वायू द्रव्यांवर बलाचा प्रयोग करू शकतात. उदाहरणार्थ पाणी त्याबरोबरचा कचरा वगैरे वाहून नेते. नद्यांचे पूर, सुनामीच्या प्रकोपात मार्गातील सर्व वस्तू, सजीव, गाड्या सगळे सगळेच वाहून नेऊ शकतात. ज्या पत्थरांना ते नेऊ शकत नाहीत त्यांना फोडून फोडून घळी, भोवरे, रांजण खळगे तयार करून पुढे जातात हाही बालप्रयोगांचाच प्रकार आहे. जेव्हा  हे द्रव पदार्थ एखादया भांड्यात साठवले जातात तेव्हा त्या भांड्यांच्या पृष्ठभागावर जोर देत राहतात, त्यालाच दाब किंवा दबाव(pressure) असे म्हणतात. एक एकक क्षेत्रफळाच्या पृष्ठभागावर तिथे ठेवलेले पाणी, तेल, मध जे काही असेल ते लिक्विड किती बल प्रयुक्त करते त्यालाच त्या लिक्विड चा त्या पृष्ठभागावरील दाब असे म्हणतात. तो पास्कल मध्ये मोजतात. शिवाय द्रव पदार्थांच्या वरच्या स्तराचाही एक गुण असतो. द्रवरूप पदार्थांच्या पृष्ठभागावरचे पाण्याचे रेणू हे जणू एखादा इलॅस्टिक कपडा ताणून बसवल्यावर जसा त्या इलॅस्टिक कपड्याच्या रेणूंमध्ये ताण राहील त्याप्रमाणे सर्वात वरच्या थरात अतिशय ताणाखाली बसवलेले असतात. पाण्याच्या साठ्याच्या पृष्ठभागावरील स्तर हा पाण्याच्या अशा ताणलेल्या इलॅस्टिक कापडासारखा असतो, त्यातील रेणू अतिशय ताणाखाली असतात. यालाच पृष्ठभागीय ताण (surface tension) असे म्हणतात. त्यामुळेच या पृष्ठभागावर जराजरी छेडले तर त्यावर तरंग उठून ते सर्वच पृष्ठभागावर झपाट्याने पसरतात..माझ्या विषयी आधुनिक काळात अजूनही अनेक शोध लागलेले आहेत.. पण मी आताच सांगितलेले दोन गुण हे माझे आधुनिक काळातील महत्वाचे दोन गुण म्हणता येतील.. पण हे विक्रमा आता रात्रीचा शेवटचा प्रहर संपत चालला आहे.. विविध ठिकाणच्या जलाशयांना, जलौघांना आता आकाशाकडे बाष्परूपात पाण्याची खेप पाठवायला सुरुवात करावी लागेल, संपूर्ण आसमंतात बाष्पाची नाजूक चादर पसरवण्याची त्यांची लगबग आता लवकरच सुरु होईल..त्यांच्या सृष्टीतील या नित्यकामाशिवाय पहाटेचा मुलायमपणा, हळुवारपणाच नष्ट होईल.. तेव्हा आता मला त्यांना जाऊ द्यावं लागेल तसेच साऱ्यांनाच असे फार काळ एका जागी थांबता येणार नाही.. नाहीतर सृष्टीतील सारी मायाच वाटेल म्हणाना.. घरातील करती स्त्री अचानक सुट्टीवर गेली  किंवा एकाच ठिकाणी बसून राहिली तर घराची जशी रयाच जाते तसे काहीसे होईल तेव्हा आता तू मला रजा दे.. मला जायला हवं.. ”

“हे आप पुरुषा, तू तुझ्या सर्व सृष्टीतील सर्व रूपांना घेऊन येथे प्रकटलास आणि इतके परम दुर्लभ ज्ञान आणि त्याही पेक्षा दुर्लभ असे दर्शन दिलेस, एखाद्या आईने मुलाचा हट्ट पुरावा, त्याच्या बाल प्रश्नांना प्रेमाने उत्तरे द्यावीत त्याप्रमाणे तू आमच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिलीस याबद्दल तुझे आभार..असाच आमच्यावर कृपादृष्टी ठेव.. तुझे पांग आम्ही नाही फेडू शकत पण तुझ्या बद्दल कायमच कृतज्ञता भाव आमच्या मनात राहील..”

विक्रमाचे हे शब्द हवेत विरतात ना विरतात तोवरच तो दिव्य मत्स्यपुरुष  अंतर्धान पावला  होता.. सर्व आप रूपे सृष्टीतील आपापल्या जागी पुन्हा रुजू झाली होती..सातासमुद्रातल्या अब्जावधी जलबिंदून्नी वाऱ्यावर स्वार होऊन हवेत सुखद गारवा आणायला सुरुवात केली होती.. लक्षावधी कळ्या, अब्जावधी पानांवर आणि अगणित गवताच्या पात्यांवर पोहोचून पहाट स्वप्नांची माधुरी सर्व चराचरांवर पसरली होती.. वेताळ अर्थातच स्वस्थानी गेला होता आणि विक्रमाची प्रजाही घराघरांमध्ये निद्रादेवीची आराधना करण्यात मग्न झाली होती..

(क्रमश: )

============================================================