विक्रमाच्या दरबारात त्या दिवशी अतिशय योगी, तपस्वी, वितरागी ऋषींचा आणि मान्यवर साधुजनांच्या मार्ग दर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. त्या कार्यक्रमात अनेक तपस्व्यांनी त्यांची योगसाधना, दिव्य अनुभव, योगामुळे मिळालेले दीर्घायुष्य यांबरोबरच या साधनेमुळे मिळालेल्या दिव्य दृष्टीचा उल्लेख सुद्धा वारंवार झाला. साधनेच्या मार्गामध्ये गुरूंनी लांबूनच कसा संवाद साधला, उपदेश दिला आणि योगाच्या सखोल मनोवस्थेत शिरून इतर शिष्यांना कसे अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन केले याचे दाखले जवळ जवळ सारेच मुनिजन कोणताही बडेजाव, मोठेपणा, अहंपणाचा अविर्भाव न आणता अतिशय लीनपणे देत होते. एकूण काय तर दिव्य योगाच्या साधनेमुळे सर्वच साधुजनांना एक अशी अप्रत्यक्ष शक्ती प्राप्त झाली होती. त्या शक्तीद्वारे ते दूरवरच्या साधुजनांशी आणि शिष्यगणांशी बसल्या जागेवरून संवाद साधू शकत होते. विक्रम राजा मूळचाच चौकस आणि चिकित्सक. आपल्या मनातील विविध शंका आणि प्रश्नांची उत्तरे त्याने साधूजनांशी संवाद साधून मिळवली. त्याशिवाय एका साधूंनी दिव्य साधनेतून इतरांशी कोणत्याही साधनाशिवाय,उपकरणाशिवाय, तारेशिवाय संवाद साधता येतो याचे एक प्रात्यक्षिक विक्रमाला याची देही याची डोळा दाखवून दिले. दिव्य सिद्धी दुर्लभ असली तरी अशक्य नसते हे दाखवले. विक्रमराजा या तारेशिवाय संवादाचा , प्रत्यक्ष विजेशिवाय प्राप्त होणाऱ्या तेजोवर्तुळाचा विचार करत करतच त्या अमावास्येच्या रात्रीची अंधारवाट तुडवत होता.. तारेशिवाय, उपकरणाशिवाय पाठवल्या जाणाऱ्या संदेशांविषयी विचार करत होता..
आणि धप्पकन वेताळाचे धूड त्याच्या पाठीवर पडले आणि त्याच्या विचारांची तारच तुटली..
पण वेताळाने विक्रमाच्या विचारांचा मागोवा घेत डायरेक्ट मुद्द्याचा प्रश्न केला..
“विक्रमा मान्य आहे ऋषी आणि योगिजनांना असे दिव्य शक्तीच्या साहाय्याने दूरवरच्या माणसांशी संवाद साधणे शक्य आहे पण आताच्या जगात जवळ जवळ सर्वच माणसांना तारेशिवाय संवाद साधता येतो. मोबाईल फोन, रेडिओ, टीव्ही हे सारेच या दूरवर संवाद साधण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. मोबाईल मधून एका वेळी एकाशी किंवा अनेकांशी संवाद होऊ शकतो, रेडिओ मधून एक माणूस अनेक लोकांना ऐकू येणारा संदेश देऊ शकतो, टीव्ही द्वारे एक माणूस अनेक लोकांना दिसणारा आणि ऐकू येणारा संदेश देऊ शकतो. आपली ‘मन की बात ‘ सांगू शकतो. पण मला सांग की हा संदेश किंवा हि रेडिओ लहर तयार कशी केली? म्हणजे मॅक्सवेल चे गणित सिद्ध करण्यासाठी हेन्रिक हर्ट्झ ने जेव्हा प्रयोग केले तेव्हा हि हर्ट्झ ची रेडिओ लहर तयार करण्यासाठी काय तंत्र वापरले? अगदी फार टेक्निकल जंजाळात जरी नाही घुसलो तरी त्यांनी कुठले इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक भाग वापरून हि लहर तयार केली? तेव्हा तर आतासारखे काही चिप्स, सेमीकंडक्टर्स नव्हते मग काय वापरून त्यांनी या लहरी तयार केल्या? मुळात रेडिओ लहर म्हणजे आपल्याला ऐकू येणाऱ्या रेडिओ मधली लहर का? रेडिओ लहर ऐकू येते का? मला सांग जरा या विषयी.. चल बोल पट पट.. मला खूप उत्सुकता आहे याविषयी.. आणि याद राख जर फार टेक्निकल गोष्टीत घुसलास तर माझ्या सारखा वाईट कोणी भेटणार नाही.. याद राख..”
रेडिओ लहर किंवा अदृश्य प्रकाश
“वेताळा सर्वप्रथम आधी हे लक्षात घेऊ की इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मुळे निर्माण होणाऱ्या तरंगामध्ये दोन मुख्य गट असतात. एक म्हणजे दिसणारा प्रकाश किंवा दिसणाऱ्या प्रकाशलहरी किंवा दृश्य इलेक्ट्रोमॅग्नेटिझम.. पण या लहरींशिवाय हजारो लाखो लहरी आपल्या आजूबाजूला फिरत असतात. त्यातील काही डोळ्याला दिसणाऱ्या लहरींपेक्षा मोठ्या ढांगा टाकणाऱ्या किंवा higher wavelength च्या असतात. आपल्याला दिसू शकणाऱ्या प्रकाशाचे सर्वात मोठे पाऊल म्हणजे लाल रंगाचा प्रकाश. याचाच अर्थ या अदृश्य लहरी या लाल रंगाच्या प्रकाश लहरींपेक्षा हळू असतात किंवा कमी वेगाने वळवळत असतात. उष्णते (Heat) मुळे निर्माण होणाऱ्या लहरी या गटात मोडतात. आवाजाच्या लहरी या गटात मोडतात. शिवाय प्रकाशाच्या सुद्धा अशा लहरी या गतीने वळवळत असतात पण आपल्या दृष्टीच्या क्षमता मर्यादित असल्याने तो प्रकाश आपल्याला दिसत नाही. काही प्राण्यांना तो प्रकाश दिसतो म्हणतात. यांना लालरंगापेक्षा कमी वेगाने वळवळणाऱ्या लहरी Infrared waves म्हणतात. शिवाय दुसरा लहरींचा गट हा आपल्याला दिसू शकणाऱ्या प्रकाश लहरींपेक्षा अधिक वेगाने वळवळणाऱ्या लहरींचा आहे. यांची पावले ही दृश्य प्रकाशाच्या पावलांपेक्षा छोटी असतात lower wavelength आणि म्हणूनच दिसणाऱ्या प्रकाशाच्या पावलांपेक्षा अधिक वेगाने पडत असतात. आपल्या दिसू शकणारे प्रकाशाचे सर्वात लहान पाऊल म्हणजे जांभळ्या रंगाचा प्रकाश. म्हणजे दुसऱ्या प्रकारच्या प्रकाश लहरी या जांभळ्या रंगाच्या प्रकाशापेक्षा वेगाने वळवळत असतात. त्यांना आपण ultraviolet waves असे म्हणतो..पण हर्ट्झ ने जेव्हा प्रयोगासाठी या अदृश्य पक्ष लहरी तयार केला तेव्हा त्या प्रकाशाला अदृश्य प्रकाश असे म्हटले गेले खरेतर हर्ट्झ च्या लहरी Hertzian waves असे म्हटले गेले. त्या लहरी जेव्हा काही काळानंतर संदेश ऐकण्यासाठी वापरून त्यातून संदेश ऐकण्याची तंत्रे विकसित झाली तेव्हा त्याचे रेडिओ लहरी असे नाव पडले आणि तेच रूढ झाले”
“याचा अर्थ रेडिओ लहरी म्हणजे ऐकू येणाऱ्या लहरी नाहीत? ”
“नाही.. तो एक समज आहे.किंवा खरंतर एक गैरसमजच म्हणायला हवा. पण मुळात रेडिओ लहरी म्हणजे न दिसणाऱ्या प्रकाश लहरी होत. त्या दिसणाऱ्या प्रकाश लहरींपेक्षा कमी किंवा जास्त दोन्ही वेगाने वळवळणाऱ्या असू शकतात.. आकाशातले ग्रह तारे बघण्याचे टेलिस्कोप दोन प्रकारचे असतात बघ.. एक दृश्य गोष्टी दाखवणारे, दृश्य प्रकाशाचा वापर करणारे प्रकाशीय टेलिस्कोप Optical Telescope.. दुसरे म्हणजे अदृश्य प्रकाशाचा वापर करून दूरवरचा अदृश्य प्रकाश कुठून येतोय याची माहिती देणारे रेडिओ टेलिस्कोप Radio Telescope.. अरे एवढंच काय तर या लहरी सुरक्षित पणे शरीरावर सोडून रोग आणि त्रास दायक गाठी, ट्यूमर वगैरे शोधून काढायचं रेडिओलॉजी (Radiology)नावाचं तंत्रच विकसित झालंय आणि प्रत्येक लहान मोठ्या दवाखान्यात या संबंधीची निरीक्षणे आणि रिपोर्ट्स वापरून डॉक्टर लोक रुग्णांवर कसे उपचार करावेत यासंबंधीची दिशासुद्धा ठरवतात. सांगायचा उद्देश एवढाच की रेडिओ लहरी म्हणजे अदृश्य प्रकाश लहरी..आपल्या इथल्या स्थानिक रेडिओ केंद्रावरून येणाऱ्या अदृश्य प्रकाश लहरी या मात्र दृष्य प्रकाशा पेक्षा कमी वेगाने वळवळत असतात आणि त्या रेडिओ प्रक्षेपण केंद्रावरून काही विशिष्ट अंतरापर्यंतच जातात. त्या नंतर त्या नीटशा ओळखू येत नाहीत. काही डोंगरांवर बघ दोन स्टेशने मिक्स होतात. त्याठिकाणी दोन रेडिओ केंद्रांकडून या अदृष्य लहरी पोहोचत असतात. आपल्या कडे असलेल्या रेडिओ मधून त्या लहरींबरोबर वाहून येणारे गाणे आपल्याला ऐकू येण्याची सोय असते. पण रेडिओ वरचे गाणे म्हणजे नदीच्या पाण्याबरोबर गाळ, जलपर्णी, पाने, फुले इत्यादी सर्व काही वाहून यावे तसे अदृश्य प्रकाशाबरोबर वाहून येणारी ध्वनीची लहर असते. ती आपल्याला रेडिओ च्या माध्यमातून वेगळी काढून ऐकता येते इतकेच.. रेडिओतून येणारा आवाज म्हणजे आवाजाची लहर नसून अदृश्य प्रकाशाबरोबर वाहून आणलेला आवाज हेच मला सांगायचं आहे..आपल्या आजूबाजूला कितीतरी रेडिओची चॅनल्स अदृश्य लहरी सोडत असतील, विद्युत उपकरणे असा अदृष्य प्रकाश सोडत असतील, मोबाईल टॉवर्स असा अदृश्य प्रकाश सोडत असतील.. शिवाय वेल्डिंग- ग्राइंडिंग सारख्या औद्योगिक प्रक्रिया आणि घरातील मशिन्स किती प्रकारचा अदृष्य प्रकाश सोडत असतील त्याला काही गणतीच नाही.. आपल्याला हे सहजी दिसत, जाणवत नाही हेच बरंय, शिवाय ब्रह्मांडाकडून आपल्या पर्यंत आलेल्या अशा अनेक अदृष्य लहरी आपल्या आजूबाजूला असतील.. ज्याला ते वेगळे करून ओळखता आले त्याला ते कळले.. ज्याला त्याची जाणीवच नाही त्याच्यासाठी ती एक दृष्टी आडची सृष्टी म्हटली पाहिजे.. ”
“विक्रमा ठीक आहे अदृष्य प्रकाशाची अनेक उदाहरणे दिलीस खरी पण हा अदृष्य प्रकाश तयार करण्याची सुरुवात कशी झाली?त्यासाठी वापरलेल्या सर्किट मध्ये कोणते घटक वापरले? ”
“वेताळा, हा अदृष्य प्रकाश तयार करणं या विश्वानं, सृष्टीनं, ब्रह्माण्डानं सुरुवाती पासूनच सुरु केलं होतं. किंबहुना अशा एखाद्या अशा अदृष्य प्रकाशाला जन्म देणाऱ्या स्पार्किंगनंच ब्रह्मांडालाही जन्माला घातलं असावं. जिथं जिथं सूक्ष्मतला सूक्ष्म इलेक्ट्रॉन डिस्टर्ब होऊन पुन्हा जागेवर परत येतोय अशा लहानात लहान जागेपासून नवीन जन्माला येणाऱ्या ताऱ्याच्या विराट पोकळीपर्यंत हि ऊर्जा प्रकाश आणि उष्णतेच्या स्वरूपात, काही ठिकाणी स्पार्किंगच्या रूपात दिसतेय तिथे तिथे या दृष्य प्रकाशाबरोबर, उष्णतेबरोबर कमी अधिक प्रमाणात या अदृश्य प्रकाशाचा जन्म होतोय हे समजून चाल. हंफ्रे डेव्ही याने खोली एवढ्या विजेच्या बॅटरीची दोन टोके जेव्हा दोन इलेक्ट्रोड ना जोडली, ते दोन इलेक्ट्रोड एकमेकांच्या अतिशय जवळ आणले आणि बॅटरी सुरु केली तेव्हा विजेने एका इलेक्ट्रोड कडून दुसऱ्या इलेक्ट्रोड कडे उडी मारली, आपल्या भाषेत स्पार्किंग झालं आणि त्याबरोबरच अदृष्य प्रकाशही तिथल्या वातावरणात विखुरला, दिसला मात्र नाही. मायकेल फॅरेडे सारख्या जिनिअस माणसाला जाणवला आणि त्याने या अदृश्य शक्तीला ‘अदृष्य शक्तिरेषा (Invisible Lines of force) म्हटले. सर्वच जाणकारांना हे विजेचे धक्के किंवा शॉक खायचा जणू शौकच झाला. त्यासाठी त्यांनी अशा स्पार्किंग तयार करणारी विद्युत मंडले किंवा इलेकट्रीक सर्किट्स तयार केली. या सर्किटनाच पोकळीमध्ये स्पार्किंग तयार करणारी सर्किट्स किंवा spark gap generators असेही म्हणत असत.. ”
स्पार्क तयार करणारी सर्किटस (Spark Gap Generators)
“अच्छा म्हणजे निसर्गात जे सहजपणे घडत असतं तेच कॉपी करून नेहमी प्रमाणे तुम्ही स्वतः चं एक उपकरण तयार केलं आणि त्याला स्वतः ला आवडणारं नाव दिलंत.. पण हा स्पार्क तयार करण्यात कोणते घटक किंवा कंपोनंट कामाला आले? ”
(Source: www(dot)awasa(dot)org(dot)za/articles/103-spark-transmitters)
“वेताळा, या कामी मुख्य म्हणजे वीज तात्पुरती साठवणारे विद्युत संधारक किंवा कॅपॅसिटर्स (capacitors) आणि विजेत झालेल्या बदलाबरोबर लगेच फुस्स करून फणा काढणारे आणि प्रतिक्रियेच्या रूपात उलट्या दिशेत वीज पाठवणारे विद्युत संप्रेरक (Inductors) यांची मदत झाली. कसं ते सांगतो. सुरुवातीला काही लोकांनी विजेच्या घटाला एक हा फणा काढणाऱ्या संप्रेरक किंवा Inductor चे वेटोळे जोडले . जेव्हा या सर्किटमध्ये बटन चालू करुन बॅटरीतली वीज सोडली तेव्हा हा संप्रेरक किंवा Inductor काहीच न झाल्यासारखा वेटोळे घालून बसलेल्या सापासारखा गप्प पडून होता. सरळसाध्या वाहकासारखा वीज वाहून नेत होता. या इन्डक्टर जवळच स्पर्श न करता दुसऱ्या Inductor चे वेटोळे जोडले. फरक हा होता की पहिल्या Inductor ची तार चांगलीच जाडजूड होती आणि वेटोळे कमी होते.मात्र दुसऱ्या वेटोळ्याची तार मात्र अतिशय पातळ होती आणि वेटोळे सुद्धा पहिल्या च्या मानाने खूप जास्त होते. इथे हे समजून घेतले पाहिजे की तार जाड असली की त्यातून वाहणारी विद्युत धारा जास्त असते. शिवाय तारेची लांबी कमी असली तरी सुद्धा वीज वाहायला होणारा विरोध कमी असतो. पण जशी तार पातळ करत न्यावी आणि तिची लांबी वाढवत न्यावी तसा विद्युत धारेला होणारा विरोध वाढत जातो .. ”
“होरे माहिती आहे मला.. ओहमचा नियम (Ohm’s Law ) सांगतोयस तू.. पुढे सांग.. ”
“हो तर बटन दाबताच बॅटरीला लावलेल्या जाड आणि कमी वेटोळे असलेल्या Inductor कॉईल मधून वीज वाहू लागली. तेव्हा जवळच्या पातळ आणि जास्त वेटोळे वाल्या Inductor कॉईल मध्ये हूं की चू नव्हतं. जसे बॅटरीचे बटन बंद केले तसे जोडलेल्या कोईल च्या अंगात आल्या प्रमाणे तिने फणा काढला आणि त्याच क्षणी शेजारच्या पातळ आणि जास्त वेढे असणाऱ्या कॉईल च्याही अंगात आलं. तिच्यातही उलट्या दिशेत वीज संचारली. पण फरक हा होता कि पहिल्या कोईल मध्ये विजेची धारा जास्त होती. पण पातळ कोईल मध्ये ती कमी होती. अर्थातच दुसऱ्या जास्त वेढेवाल्या कोईल मध्ये विजेचे वोल्टेज जास्त होते. हि कमाल अर्थातच अधिक वेढ्यांनी केली होती. फॅरडेचा नियमच इथे पाळला जात होता. कोणी त्या दुसऱ्या वायरला हात लावला तर क्षणिक काळापुरता जोरदार शॉक सुद्धा बसत होता. मग यात सुधारणा करून पहिल्या कॉईल ला लोखंडी स्विच लावला. जशी बॅटरी चालू केली जाई तसे कॉईल मध्ये वीज संचारे, त्यातून चुंबकत्व(magnetism) येई आणि लोखंड चिकटे. लोखंड चिकटले कि सर्किट बंद होई आणि दुसऱ्या कॉईल मध्ये वीज संचारे. पण मग वीज ऑफ झाली की लोखंडाला ओढणारे मॅग्नेटिझम संपे आणि लोखंड जागेवर येई. तसे झाले कि पुन्हा सर्किट मध्ये वीज येई, पुन्हा मॅग्नेटिझम आणि लोखंड चिकटे पुन्हा पहिली कॉईल ऑफ आणि दुसरी चालू ..असे करून त्या सर्किट मधून दुसऱ्या कॉईल मध्ये सततचे विजेचे धक्के दिले जाऊ लागले. त्याकाळी आजसारखी व्होल्टमीटर नसल्याने विजेचे धक्के खाऊनच ती किती आहे ते पडताळावे लागे. दुसऱ्या पातळ कॉईल मध्ये जास्त वोल्टेज असल्याने धक्काही जोराचा बसे.. माणसाने दुसऱ्या कॉईल ची दोन्ही टोके दोन हातात धरली तर त्याच्या शरीरातून विजेचा धक्का जाई.. अर्थातच अतिशय क्षणिक धक्का असे आणि बॅटरीचीच वीज तशी कमी असल्याने कॉईल च्या धक्क्याने जीविताला हानी पोहोचत नसे ”
“अरे विक्रमा, मी तुला काय विचारलं आणि तू कुठं चाललायस? ते आपले अदृष्य प्रकाश लहरींचे काय झाले? तू शॉक चे काय गुणवर्णन करतोयस? ”
“वेताळा त्या दुसऱ्या कॉईल मध्ये जी वीज संचारत होती ती वीज म्हणजेच या अदृष्य प्रकाश लहरी होत. या सर्किट मध्ये सुधारणा होत गेल्या आणि लोकांनी मग दुसऱ्या पातळ आणि जास्त वेढेवाल्या कॉईल ची दोन टोके अतिशय जवळ आणली. पण थोडीशी गॅप ठेवली. जेव्हा पहिल्या कॉईलमधली वीज बंद केली जाई तेव्हा दुसऱ्या कॉईल मध्ये ती संचारे आणि तेव्हा त्या कॉईल च्या एका टोकाकडून निघून त्या गॅप पर्यंत येई नि गॅप च्या एका बाजू कडून दुसरी कडे ती वीज चक्क उडी मारे. ह्यालाच तर स्पार्क म्हणतात. त्यानंतरच्या इलेक्ट्रिशियन लोकांनी तर अशी सतत स्पार्क टाकणारी सर्किटस तयार करण्याचा धडाकाच लावला आणि त्याचाही बिजनेस सुरु केला..शॉक देऊन मायग्रेन बरा करणार, जीर्ण रोग ठीक करणार, मूल होत नसेल तर अपत्य प्राप्ती करून देणार.. काय वाटेल ते दावे केले जाऊ लागले आणि आशा असल्याने म्हणा किंवा रोगव्याधींना कंटाळल्याने म्हणा किंवा छोटासा शॉक खाण्याच्या हौसेने म्हणा लोक अशा फसव्या जाहिरातींना बळी पडू लागले.. मग काय या स्पार्क च्या किंवा शॉक च्या साहाय्याने रोग बरे करण्याचे बिजनेस अनेक तत्कालीन हुशार मंडळींनी युरोपात काढले आणि भरपूर पैसा कमावला. ”
सतत अदृष्य प्रकाश टाकणारे सर्किट – Tank Circuit
“हो रे तुम्हा माणसांना कायमच काहीतरी नवीन आणि धक्कादायक असे हवेच असते नाही का? मग चतुर लोक या तुमच्या हौशी स्वभावाचा आणि आशांचा गैरफायदा घेणारच.. असो काय झालं या spark gap generator चं पुढं ते सांग.. ”
(Source: en(dot)wikipedia(dot)org/wiki/Spark-gap_transmitter)
“वेताळा या सर्किट्स मधून स्पार्क्स मिळू लागले खरे पण ते सतत मिळत नसत शिवाय सेकंदाला किंवा मिनिटाला किती वेळा स्पार्क मिळाले पाहिजेत ते म्हणजेच लहरींची वारंवारता किंवा frequency सहजपणे नियंत्रित करता येत नव्हती .. त्याच विचारात किंवा प्रयत्नात देशोदेशीचे तंत्रज्ञ गुंतून गेले..मग यात काही जणांनी पहिल्या सर्किट मध्ये बॅटरी आणि संप्रेरक(Inductor) कॉईल सोबतच एक विद्युत संग्राहक(Capacitor) ठेवला. थोडक्यात पहिल्या सर्किट मध्ये बॅटरी आणि स्विच यांच्या मध्ये कॉईल ठेवली. आणि कॉईल चे टोक कपॅसिटरला जोडले . दुसरी कॉईल आणि तिच्या बरोबरच्या वायर मध्ये गॅप ठेवलीच होती ठिणग्यांसाठी. या गॅप ची लांबी म्हणजेच तिथे स्पार्क च्या रूपात तयार होणाऱ्या अदृष्य प्रकाश तरंगांच्या पावलांची लांबी किंवा wavelength of electromagnetic wave. गॅप मोठी तर तरंग मोठा.. साधा हिशोब.. पहिल्या सर्किट मध्ये बॅटरीने वीज सोडली की कॉईल वाहकासारखी वागे पण संग्राहक किंवा कपॅसिटर मात्र वीज साठवायला सुरुवात करे.. त्याच्या क्षमते पर्यंत वीज साठवतंच राही.. मॅग्नेटिक बटनामुळे जशी वीज पहिल्या सर्किट मध्ये खंडित होई तसे पहिली कॉईल जागी होई आणि दुसऱ्या कॉईल लाही इलेक्ट्रोमेग्नेटिझमने जागे करे.. ते झाले की दुसऱ्या कॉईल च्या गॅप मध्ये स्पार्क पडे.. इकडे बटन बंद झाले, वीज खंडित झाली की कपॅसिटर आपण साठवलेली वीज सर्किट मध्ये सोडे पण उलट्या दिशेत.. त्यामुळे मग कॉईल मध्ये उलट्या दिशेत प्रवाह वाही आणि तो कमी कमी होत जाई.. जो पर्यंत तो प्रवाह कमी कमी होत जाई तोपर्यंत पहिली कॉईल दुसऱ्या कॉईलमध्ये जणू रिमोट ने वीज पाठवतच राही आणि ती तयार झाली की कमी जास्त स्पार्क पडत राही.. बटनमधला मॅग्नेटिझम गेल्याने ते जागेवर येई आणि पहिल्या सर्किट मध्ये पुन्हा बॅटरी सुरु होई व पुन्हा कपॅसिटर ला चार्जिंग करायला वीज मिळे. पहिल्या कॉईलला सुरुवातीच्या दिशेत वीज पुरवठा सुरु होई.. या बदलामुळे पुन्हा पहिली कॉईल दुसऱ्या कॉईल ला रिमोट ने जणू वीज देई आणि पुन्हा उलट्या दिशेत प्रवाह वाही.. उलट्या दिशेत स्पार्क पडे.. अश्या प्रकारे या सर्किट मध्ये सतत स्पार्क काढण्याची सोय झाली आणि तसेच पहिल्या सर्किट मधल्या स्थिर विजेपासून (Direct Current ) दुसऱ्या सर्किट मध्ये बदलती वीज (Alternating Current) मिळवण्याची सोय सुद्धा आपसूकच झाली. या प्रकारच्या सर्किट्स ना टॅंक सर्किट्स(Tank Circuits) सुद्धा म्हटले जाते.”
हर्ट्झ चे सर्किट, त्याच्या अदृष्य प्रकाश लहरी आणि पुरावे
“ठीक आहे रे विक्रमा कळलं.. पण या रेडिओ लहरींच्या पुराणात मला एकदा आता सांगूनच टाक की जेव्हा हर्टझने त्याच्या प्रयोगासाठी अदृष्य प्रकाश तयार केला होता ते सर्किट कसं होतं.. आणि त्याने तो अदृष्य प्रकाश कसा काय ओळखला होता? ”
(Source: en(dot)wikipedia(dot)org/wiki/Spark-gap_transmitter)
“वेताळा, १८८७ साली जेव्हा ६-७ वर्षांच्या अथक मेहनतीने, चिकाटीने, अनेक वेळा महिनोन्महिने निराशेत घालवत जेव्हा हर्ट्झ ने यश मिळवलं तेव्हा त्याने त्या सर्किट मध्ये अजून सुधारणा केल्या होत्या. पहिल्या सर्किट मधल्या बॅटरी कडून वीज घेऊन ती वीज एका कपॅसिटर ला आणि त्यानंतर रुमकॉफ कॉईल(Ruhmkorff Coil ) ला दिली होती . या रुमकॉफ कॉईल मध्येच बॅटरीच्या बाजूला एक कमी वेटोळ्यांची आणि जाड कॉईल(primary coil) आणि दुसऱ्या स्पार्क गॅप च्या बाजूला कमी जाडीची आणि जास्त वेटोळे असलेली कॉईल (secondary coil) होती. शिवाय यात आधी प्रमाणे बॅटरीचे सर्किट बंद पाडण्यासाठी वापरलेली लोखंडाची पट्टी होतीच. मॅग्नेटिझम संचारला की ती डावीकडचे सर्किट बंद पाडे. त्याने दुसऱ्या बाजूला मोठ्या वोल्टेज ची निर्मिती होई आणि वारंवार सर्किट बंद चालू झाल्याने दुसऱ्या बाजूला मोठ्या वोल्टेज ची बदलणारी वीज (Alternating Current) निर्माण होई. तीच वीज जेव्हा गॅप मधून जाई तेव्हा उडी मारे. स्पार्क होई. असे अदृष्य प्रकाशाचे सतत स्पार्किंग होई. पण ते कळणार कसे हा प्रश्नच होता. याच विषयावर हर्ट्झ ने मोठ्या कष्टाने संशोधन करत मग हि कॉईल दोन मोठ्या कॉपर रॉड्स च्या दरम्यान वायर जोडून त्याला जोडली आणि या दोन कॉपर रॉड्स च्या दरम्यान हि स्पार्क पडणारी गॅप ठेवली. शिवाय या गॅप मध्ये निर्माण होणाऱ्या लहरी आजूबाबाजूला विखरून जाऊ नयेत म्हणून या स्पार्क गॅप च्या अलीकडे एक मुडपलेल्या पत्र्याची भिंत घातली. तशीच भिंत दुसऱ्या बाजूला घालून समोरच्या बाजूनेही लहरी निसटून जाऊ नयेत याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूला दोन पत्र्यांना आपटून आपटून मग या लहरी पुन्हा उलट्या येऊन एकमेकांना आदळू लागल्या आणि या आदळण्यातून अतिशय वेगाने वळवळणाऱ्या पण फार लांब ना जाणाऱ्या मिश्र लहरी(standing waves or stationary wave ) तयार झाल्या. या मिश्र लहरीं मध्ये काही ठिकाणी सर्व लहरी एकत्र येऊन, गळ्यात गळे घालून(positive or constructive resonance) त्यात लहरी मोठ्या होत जाऊन प्रखर होत उंच उंच होत आणि काही ठिकाणी याच लहरी एकमेकांशी काटाकाटी, शह – काटशह करून एकमेकींच्या पायात पाय घालून (negative or destructive resonance) त्यातून त्या लहान होत जाऊन निस्तेज होऊन काही ठिकाणी जणू नष्ट होत . हर्टझने मग एक रिंग च्या आकाराची धातूची पट्टी घेतली आणि त्यातही बारीक गॅप ठेवली. त्या पत्र्याच्या बंदिस्त जागेत तो लहरींच्या संपर्कात त्याची रिंग घेऊन फिरे. पण या लहरी दिसाव्यात म्हणून तो तिथे गडद अंधार करे. अंधारातच तो तासनतास त्याची रिंग घेऊन शोधत बसे. मग फिरता फिरता खासकरून मिश्र लहरींमधला सर्वोच्च बिंदू जिथे असे तिथे हर्ट्झच्या रिंग मध्ये सर्वात मोठा स्पार्क दिसे. लहरी मोठया असत तिथे त्या प्रमाणात स्पार्क दिसे. लहरी जिथे एकमेकिंना संपवत तिथे स्पार्क दिसत नसे. असे फिरून फिरून लहरींचा मागोवा घेत हर्टझने या लहरींची मोजमापे घेतली. मोजमापे काय त्याने लहरींचा नकाशाच काढला. यातूनच लहरींचा वेग मोजला आणि तो साधारण पणे प्रकाशाच्या वेगाइतकाच आला. म्हणूनच मग प्रकाश – चुंबकत्व- वीज हे सर्व एकच आहे हे सुद्धा या प्रयोगानेच सिद्ध झालं.. ”
“बापरे बाप.. या महामानवाने इतक्या अंधारात बसून केवळ लॉर्ड केल्विन गुरूंच्या म्हणण्याखातर हा अवघड विषय हातात घेतला..अनेक वर्षे निराश होऊनही फॅरेडे – मॅक्सवेल या आपल्या गुरुतुल्य दैवतांचे म्हणणे खरे व्हायला हवे, सिद्ध करायला हवे या जिद्दीपोटी खपला आणि या लहरींचा अंधारात माग काढून एक अतिशय विश्वव्यापी तत्व, प्रयोग आणि गणितासह जगाच्या हातात ठेवले.. याच तत्वावर विसाव्या शतकातल्या सर्व फिजिक्सची आणि त्यावर आधारित तंत्रज्ञानाची मुहूर्तमेढ रोवली गेली.. पण काय रे विक्रमा तो हर्ट्झ होता म्हणून इतक्या अंधारात बसून तिथे तयार होणारा अदृष्य प्रकाश तो प्रयोगाने सिद्ध करू शकला. पण पुढच्या जगाला मात्र ते तंत्रज्ञान कोणीतरी शोधून आयतेच दिले ना? अदृष्य प्रकाश पाठवणाऱ्या प्रक्षेपकाने (Transmitter) त्या लहरी पाठवल्यावर त्या दुसऱ्या बाजूला ग्राहकाकडे(Receiver) व्यवस्थित समजून घेऊन त्याबरोबर येणारा आवाज पहिल्या प्रथम कोणी शोधला? त्यात मग सुधारणा करून समुद्रासारख्या दमट हवामानातही ते चालतील याची खबरदारी कोणी घेतली? या कामात भारताच्या सुपुत्राचा मोठा सहभाग होता.. पण तो कोण हे तू शोधून ये अभ्यास करून.. आता मला हे शरीर टाकून देऊन अदृश्य प्रकाशाच्या रूपात पाताळलोकी परत जायला हवे.. येतो मी विक्रमा.. हाs हाss हाsss”
(क्रमश: )