नवद्रव्यांमधले पहिले द्रव्य : मी पृथ्वीपरमद्रव्य (I , The Solid Super-substance)

दगड, धोंडे, पानं, झाडं, माती या सर्वांना निसर्ग या मोठ्या शब्दात आपण टाकून मोकळे होतो खरं पण यात या स्थायूंचं अस्तित्वच लोपून जातं.. प्रत्येक स्थिर राहणाऱ्या डोंगरात, घळीत, घरात, मंदिरात, किल्ल्यात, मोठ्या वटवृक्षात, समुद्र किनार्याच्या खडकांमध्ये या अनेकविध आकाराच्या स्थायूं नीच स्थिरता, आधार, भक्कम पणा दिला .. धबधबे झेलले स्थायूंनीच, तोफगोळे व तोफांचा मारा स्थायूंचाच, झोपाळे स्थायूंचेच, ऊन -वारा -पावसापासून निवारा स्थायूंचाच, भेदक कडे, सुळके ही त्यांचेच.. हिमनग सुद्धा त्यांचेच.. हिरे , माणके, कोळसे, हाडे सर्व ठिकाणी हा स्थायूच भरून राहिलाय.. दोन रानरेडे चवताळून एकमेकाला टक्कर देतात तेव्हा धडकतात ते त्यांच्या डोक्यावरचे टणक स्थायूच.. पकडलेल्या शिकारीचे पोट फाडायला सिंहांना मदत करतात ते धारदार सुळ्यांचे व नख्यांचे स्थायूच .. जंगली श्वापदांचा अंदाज घेत म्यानातील तलवारीच्या रत्नजडित मुठीवर हात ठेवत विक्रम या स्थायूंच्या विश्वात रमला होता..
“अरे अरे विक्रमा, हे काय स्थायू स्थायू चाललंय? असं वाटतंय की भगवान श्रीकृष्णाने जसे विश्वरूप दर्शन देऊन प्रत्येक ठिकाणी मी कसा भरून राहिलोय हे सांगितलं तसं काही स्थायूंचं सांगतोस की काय? ”
“हो वेताळा, आधी कणाद त्यानंतर प्रशस्तपद यांच्या ग्रंथामध्ये केवळ स्थायूच नाही तर सर्वच म्हणजे स्थायू , द्रव, वायू , तेज, आकाश, काळ, दिक, आत्मा व मन यासर्वांनाच विशेष द्रव्ये म्हटले आहे….एका अर्थी ही नवद्रव्ये संपूर्ण विश्वालाच घडवतात.. सुप्त राहतात.. पण तरीही सर्वत्र भरून राहतात.. वेगवेगळी कळत नाहीत.. आपण सामान्य माणसं या प्रत्येक द्रव्याचे विश्वरूप दर्शन अनुभवाने घेऊच शकतो.. या द्रव्यांचे विराट रूप पाहूच शकतो ”
“कसं ?”
“थांब मी पृथ्वी किंवा स्थायू परम द्रव्याला आवाहन करतो.. हे परमद्रव्या मला तुझं दर्शन दे..तुझं विराट रूप मला दाखव.. मी तुझा आजन्म ऋणी राहीन..”

bheema.jpg

(copyright/source: religion.wikia.com)

असं म्हणता क्षणी आजूबाजूच्या सर्व स्थिर – चर, सजीव -निर्जीव, सूक्ष्म-महाकाय यांनी भरलेल्या सृष्टीतील सर्व लहान थोर, सूक्ष्म -अतिसूक्ष्म स्थायू कण वेगाने एकत्र आले आणि एक अतिशय महाकाय, रंगीबेरंगी विराट पुरुष समोरा आला.. अतिशय दणकट, विशालकाय, कणखर, राकट असा तो अतिविशाल पुरुष पाहून साऱ्यांचेच डोळे दीपले.. सर्वांनाच आपण महापराक्रमी भीमाचाच अवतार पाहतोय की काय असा भास झाला.. हजारो काळ्यामेघांच्या गडगडाटाला फिका पाडील अशा घनगंभीर आवाजात तो राजा विक्रमाला म्हणाला “राजा विक्रमा, आज कशी काय आठवण काढलीस? बोल हा मी पृथ्वीपुरुष किंवा स्थायुपुरुष तुझ्यासमोर उभा आहे.. ”
त्याचं ते`अतिविराट, अतिभव्य रूप कोणाच्याच नजरेत सामावत नव्हतं.. डोळे अक्षरश: दिपून गेले होते.. सगळेच स्तिमित झाले होते.. तेव्हा विक्रम म्हणाला “हे स्थायूपुरुषा तू अतिभव्यच आहेस.. तुझं हे अतिविराट रूप लक्षात घ्यायला आम्ही कमीच पडतो.. तेव्हा तूच आम्हाला तुझ्या विषयी सांग .. ”
“विक्रमा तू पाहतच आहेस तसा मी तीन मुख्य प्रकारात वसतो: सर्व सजीव वनस्पती तसेच प्राणिमात्रांची शरीरे, त्यांची इंद्रिये व त्यांना जाणवणाऱ्या वस्तू.
यातील शरीरे ही दोन प्रकारची असतात: मातेच्या गर्भातून जन्माला येणारी व तशी न येणारी. म्हणजेच जरायुज किंवा गर्भातून जन्मणारे आणि अण्डज किंवा अंड्यातून जन्माला येणारे. माणूस, गायी आणि इतर चार पायांचे प्राणी हे जरायुज किंवा सस्तन वर्गात मोडणारे आहेत. पक्षी व सरपटणारे प्राणी हे अंडी घालणारे किंवा अंडज आहेत.
इंद्रियांत मी मुख्यतः वासाची जाणीव करून देणाऱ्या गंधेंद्रियात आहे. ते सर्वच प्राण्यांमध्ये असते. ते मुख्यतः स्थायूद्रव्याच्या अणूंचे बनलेले असून त्या अणूंवर जल तसेच इतर द्रव्यांचा काहीही परिणाम होत नाही.

f2c84-noseandsubstance
तिसऱ्या म्हणजे तुम्हाला माहित असलेल्या नेहमीच्या वापरातील वस्तूंचे रेणू हे दोन, तीन तसेच त्याहीपेक्षा अधिक अणूंच्या एकत्र येण्यातून बनलेले असतात आणि ते तीन प्रकारचे असतात – माती, दगड व पाने-फुले. त्यातील पहिल्या प्रकारचे स्थायू म्हणजेच माती ही पृथ्वीच्या विविध प्रदेशांमधील सर्वात वरच्या थरांमध्ये मिळते.

 

ae3bc-colorful_gems_design_vector_5352012b252812529

दुसऱ्या प्रकारच्या स्थायूंमध्ये म्हणजेच पाषाणांमध्ये खनिजे, विविध रत्ने, हिरे, माणके व अन्य मोडतात. तिसऱ्या प्रकारच्या स्थायूंमध्ये गवत, औषधी वनस्पती, झाडे – त्यांची फुले व फळे, वेली, फुलांविनाच फळे येणाऱ्या वनस्पती व अन्य तत्सम प्रकार मोडतात.”
हे परमपुरुषा तुझी ही लहान थोर रूपे आम्ही आमच्या आजूबाजूला पाहतच असतो. पण ती रूपे, त्या वस्तू कायम टिकत नाहीत ती मोडतात, तुटतात, छिन्न विछिन्न होतात. मग तेव्हा तू कुठे जातोस?
विक्रमा, ‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळी राहती ‘ हे तू ऐकलंच असशील, तसंच माझंही आहे. अणुरूपात मी अनंतकाळापर्यंत राहतो , पण नेहमीच्या बघण्या-वापरण्यातील वस्तूंचे अस्तित्व हे तात्कालिक असते. तात्कालिक अस्तित्व असणाऱ्या वस्तूमध्ये माझ्या सूक्ष्म घटकांची एक विशिष्ट रचना होते व त्यांना नेहमीचा आकार येतो. ती रचना मोडली म्हणजेच भॊतिक बदल झाला की मी सूक्ष्म रूपात जातो. पण पाकज म्हणजे रासायनिक बदल झाला तर मी तुम्हाला लक्षात न येणारे रूप घेतो. पण माझे अणुरूपातले विशेष अस्तित्व किंवा ओळख कायम राहते.”
“मग हे स्थायुपुरुषा आम्ही तुला ओळखायचं कसं? तुझी लक्षणे कोणती?”
“चांगला प्रश्न. आम्ही अनेक रंगांमध्ये असतो, पांढरा, काळा, नारंगी, पोपटी. आम्हाला वेगवेगळ्या चवी असतात गोड, कडू, तिखट, आंबट, तिखट, खारट. आम्हाला छान व नकोसा असे दोन प्रकारचे वास असतात. आम्ही धड ना गरम असतो ना थंड, आमचं तापमान तेज द्रव्याच्या परिणामाने बदलतं. शिवाय आम्हाला संख्येने मोजता येते एक, दोन, तीन..आमची लांबी-रुंदी-उंची मोजता येते.”
“पण हे स्थायुपुरुषा तू म्हणतोस ते गुण इतरांनाही असतील जसे रंग वगैरे आप द्रव्याला असेल, वायूंना एक-दोन-तीन असे मोजता येईल..मग तुझा वेगळेपणा काय..पदार्थविज्ञाना नुसार तुझ्यात काही वेगळेपणा आहे का?”
“वा! वा!! आवडला प्रश्न मला..एक तर स्थायू पदार्थांना वास असतोच असतो..मग तो स्थायू मोठा असो किंवा अगदी सूक्ष्म धुळीएवढा असो..तुम्ही जेव्हा उदबत्ती लावता तेव्हा स्थायूचेच अतिशय लहान कण हवेत तरंगतात व दूरवर सुगंध पोहोचवतात..तशीच गोष्ट दुर्गंधाची..यालाच तुमच्या नवीन संदर्भात तुम्ही Brownian Motion म्हणता. असो. पण पदार्थविज्ञानाच्या दृष्टीने मला समजून घ्यायचं असेल तर हे माझं रूप पाहा..”

tortoise.jpg

असं म्हणताक्षणीच एक अतिभव्य कासवच येऊन उभं राहिलं..सारे पुन्हा आश्चर्यचकित झाले..
“कासव?” सगळ्यांनीच धक्क्याने, अविश्वासाने, निराशेने म्हटले. राजा म्हणाला “तुझा आवडता प्राणी, तुझं रूप कासवासारखं का झालं.. असं काय आहे या संथ प्राण्यात ?”

“अरे विक्रमा कासव हा संथ आहे, शक्तिवान आहे, तो आपणहून उगीच जास्त फिरत नाही..माझंही तसंच आहे..स्थायूंना म्हणजेच आम्हाला हालवण्यासाठी बळंच लावावं लागतं..आम्हाला हालवणारं बळ नाहिसं झालं की आम्हीपण निवांत बसून राहतो कासवासारखे आत पाय घेऊन. यालाच नैमित्तिक प्रवाहीपणा म्हणजे काही कारणानेच किंवा बाह्यबळामुळेच (External Force) हालचाल करणं असं म्हणू शकतोस. यालाच जडत्व(Inertia) असंही म्हणतात.”

“अरेच्चा म्हणजे तुला धक्का दिला की तु हालणार म्हणजे विस्थापन (Displacement)आलं, मग वेग मोजणं (Speed)आलं, मग त्वरण (Acceleration)आलं, मग संवेग(Momentum) आला, मग तुला धक्का मारणारं बळ किती हे मोजणं (Force)आलं आणि या हालचालीला विरोध करणारं घर्षण(Friction) आलं व खाली खेचणारं गुरुत्वाकर्षण आलं..आऱ्याऱ्या आता मला कळलं सारं..”वेताळ म्हणाला.

“वेताळा गतीची समीकरणं (Equations of motion) विसरलास वाटतं! मग हे स्थायुपुरुषा तुम्हीही वाहता व पाणीही वाहतं..मग दगडधोंड्यांच्या व पाण्याच्या वाहण्यात काय फरक?” संभाषणाचा धागा पुढं नेत विक्रम म्हणाला.

“बरोबर आहे..पण पाण्याला केवळ थोडा उतार मिळाला व जागा मिळाली की ते वाहू लागतं. पण आम्हाला वर्गात झोपलेल्या विद्यार्थ्याप्रमाणे जागं करावं लागतं, सतत हालवावं लागतं..कारण आम्हाला घर्षणबळ सुद्धा स्थिर बसवायचा प्रयत्न करतं..या सगळ्यावर मात करण्यासाठी आम्हाला धक्का देऊन हालवणारं बळ सतत पाठीशी असावं लागतं..नाहीतर आम्ही पुन्हा बसतो एकाजागी..निवांत..निश्चल..”
“मग हे स्थायुपुरुषा, दगडधोंडेही उंचावरून पडतात, धबधबाही पडतो..मग गुरुत्वबळ(gravity) दोघांवरही काम करतं?”
“अगदी बरोबर विक्रमा..गुरुत्वबळ स्थायु व द्रव या दोन प्रकारच्या द्रव्यांवरच प्रभाव दाखवतं..बाकी द्रव्यांवर म्हणजे वायू, तेज, आकाश, दिक्, काल, मन यांच्यावर गुरुत्वाची मात्रा चालत नाही..पण हे राजन आता उत्तररात्र संपून नवीन दिवस येण्याची चाहूल लागते आहे..सहस्र किरणांनी जगाला तेज देणारा सूर्य येतोय..त्याच्या संपर्काने बर्फ इत्यादि अनेक स्थायूरूपे द्रवांमध्ये रूपांतरित व्हायला उत्सुक झाली आहेत..सृष्टिचक्र अविरत चालू राहण्यासाठी आता मला सृष्टीत विलीन व्हायला हवे येतो मी..”
असे म्हणून स्थायूपुरुष लुप्त झाला..पण अनेकविध आकारांमधले त्याचे अस्तित्त्व आता सर्वांनाच जास्त तीव्रपणे जाणवू लागले. वेताळानेही विक्रमाचा निरोप घेतला व म्हणाला”विक्रमा, स्थायुपरुष दर्शन झाले हे चांगलेच..पण आता बाकी द्रव्यांच्या पुरुषांनाही बोलावण्याची जबाबदारी तुझीच बरंका..येतो मी विक्रमा हाऽहाऽऽहाऽऽऽ”
(क्रमश:)

आधार: प्रकरण ४ भाग १: पृथ्वी (Discussion on characteristics, properties and classification of solids)

मूळ कथा: मुखपृष्ठ

Advertisements

प्रशस्तपाद ऋषी – भारताचे विज्ञानेश्वर आणि त्यांचा पदार्थधर्मसंग्रह – भारताची पदार्थविज्ञानेश्वरी (Prashastpad Rishi- 2nd century thought leader of Indian Scientific Tradition of Vaisheshika)

हा लेख  लिहिताना पहिल्याप्रथमच सांगू इच्छितो किंवा प्रांजळपणे कबूली देऊ इच्छितो की हा लेख वैशेषिक सूत्रांची अधिक माहिती असणाऱ्या कुणी तज्ञाने लिहिला असता तर तो अधिक अर्थवाही आणि या विषयाला अधिक न्याय देणारा ठरला असता. मी अशा कोण्या माणसाने लिहिला आहे का याचा सर्वत्र (अंतरजालावर मुख्यत:) शोध घेतला. बऱ्याच ठिकाणी प्रशस्तपाद ऋषींबद्दल कौतुकोद्गार आहेत, ते ४ थ्या शतकात होऊन गेले, त्यांनी ऋषी कणादांनी प्रस्थापित केलेल्या ‘वैशेषिक परंपरा’ नावाच्या वैज्ञानिक घराण्यात आपल्या प्रशस्तपादभाष्य किंवा पदार्थधर्मसंग्रह नावाच्या ग्रंथाने एक मैलाचा दगड प्रस्थापित केला. मुळात समजावयाला अतिशय क्लिष्ट असणाऱ्या वैशेषिक सूत्रांवर निव्वळ भाष्यच केले नाही तर स्वत:चा विचार मांडला.

१२ व्या शतकात ज्ञानेश्वरांनी ज्याप्रमाणे गीतेतील दुर्बोध जीवनप्रमेये आपल्या रसाळ भाषेतून जनमानसात प्रवाही केली. त्या पद्धतीनेच ऋषी प्रशस्तपादांनी वैशेशिकातील विज्ञानप्रमेये आपल्या स्वत:च्या मताला व सद्सद्विवेक बुद्धीला प्रामाणिक राहून आणि तरीही सुरुवातीलाच ऋषी कणादांचं गुरुत्व आणि महत्व मान्य करुन प्रतिपादित केली आहेत. अधिक ऐतिहासिक माहिती देण्याचा मोह टाळून त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय किंबहुना भारतीय विज्ञानविश्वाला ललामभूत ठरु शकणाऱ्या त्यांच्या ग्रंथाची म्हणजेच पदार्थधर्मसंग्रह या पुस्तकाची ओळख करुन घेणं हे याठिकाणी क्रमप्राप्त ठरतं.

मुळात इथे सांगू इच्छितो की प्रशस्तपादांच्या आधी व नंतरही वैशेषिक सूत्रांवर अनेक भाष्ये लिहिली गेली. रावणभाष्य आणि भारद्वाजावृत्ती आता मिळतही नाही. ऋषी प्रशस्तपादांनंतरही चंद्र यांनी अंदाजे ६४८ मध्ये दशपदार्थसंग्रह हे भाष्य लिहिले आणि त्याचे केवळ चिनी भाषांतरच अस्तित्वात आहे! त्यानंतर श्रीधर यांची न्यायकंदली (इस ९९१), उदय यांची किरणावली (१०वे शतक), श्रीवत्स यांची(ही) लीलावती (११ वे शतक). शिवादित्य यांची सप्तपदार्थी ही सुद्धा श्रीवत्सांच्याच काळातली असली तरीही त्यांनी न्याय आणि वैशेषिक यांचा संयोग करून ‘न्यायवैशेषिक’ या स्वरूपात भाष्य केले. शंकर मिश्र यांचे वैशेषिकावरील उपस्कर हे भाष्यही अतिशय मोलाचे आहे. वारकरी परंपरेत ज्या प्रमाणे म्हणतात त्याला अनुसरून वैशेषिक परंपरेसाठी

कणादे रचिला पाया ‌| प्रशस्तपाद झालासे कळस |

असे आपण निश्चितपणे म्हणू शकतो. श्रीवत्स यांच्या ११ व्या शतकातील ग्रंथानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. थेट १९ व्या शतकाच्या प्रारंभी काही संस्कृत विद्वानांनी हा विषय पुन्हा मनावर घेतला आणि मूळ वैशेषिक सूत्रांची व प्रशस्तपादाच्या भाष्याची इंग्रजीमध्ये भाषांतरे केली. काशीचे महामहोपाध्याय पंडित गंगानाथ झा यांनी प्रशस्ततपादभाष्याचे इंग्रजी व हिंदी मध्ये भाषांतर केले. साल १९१६. (काशीच्या या पंडितांनी अशा अनेक ग्रंथांची हिंदी व इंग्रजीमध्ये भाषांतरे केली. त्यांचे याक्षेत्रातील योगदान मोठे आहे. याच पंडितांच्या नावाने अलाहाबाद मध्ये ‘गंगानाथ झा संशोधन संस्था’ आजही कार्यरत आहे.)

त्या भाषांतरित पुस्तकाचे मुखपृष्ठ हे असे होते.

या पुस्तकाची छापील प्रत कुठेही उपलब्ध नाही. पण ह्याची PDF तुम्हाला https://archive.org/details/prashastapadabhashya  या दुव्यावर पाहाता येईल. तेथून PDF तुम्हाला download सुद्धा करता येईल. मात्र ह्या पुस्तकाचे हिंदी भाषांतर तुम्हाला खालील दुव्यावर विकतही घेता येऊ शकेल. http://www.exoticindiaart.com/book/details/prashastapada-bhashyam-NZC143/ . त्यानंतर यावरील आधुनिक भाष्य (इस १९७५) डॉ. डोंगरे या शास्त्रज्ञांनी व डॉ. नेने या संस्कृतमधील तसेच वैशेषिक विद्वानांनी संयुक्तपणे केलं. त्यावर आधारित अनेक ग्रंथ व शोधनिबंध लिहिले.

सांगायचा मुद्दा एवढाच की भारतीय वैज्ञानिक परंपरा यावर पुन्हा काही किंतु परंतु निर्माण झाल्यास खुशाल हे पुस्तक बघावे. निदान प्राथमिक व आपल्याला कळणारं भौतिकशास्त्र आपण जरुर ताडून पाहू शकतो. इतकं घडाभर तेल झाल्यावर आता मूळ पुस्तकाची अनुक्रमणिका पाहू. मुद्दामच इंग्रजीमधली अनुक्रमणिका देतोय, म्हणजे कळायला सोपं जाईल.

सूज्ञांना या अनुक्रमणिकेचे नीट अवलोकन केल्यावर निश्चितच लक्षात येईल की हा धर्मशास्त्राचा typical ग्रंथ नसून तो  पदार्थधर्मशास्त्रावरचा ग्रंथ आहे. पहिल्याच धडयाचा दुसरा मुद्दा Purpose of Science असा आहे. वाचन करायला सुरुवात केल्यावर हळूहळू या वैचारिकतेचा अंदाज येत जाईल. अगदीच गोंधळून जायचं नसेल तर केवळ Text असा लिहिलेला मचकूर वाचत जावा. बाकीचा बराचसा तर्कवाद आणि दिलेली सूत्रे तर्कावर घासून काढलेली आहेत. इच्छुकांनी व त्यातही तर्कवाद्यांनी तसेच rational thinkers किंवा स्वत:ला बुद्धिवादी म्हणवणाऱ्यांनी तर पूर्ण पुस्तकच वाचून काढायला हवे.

बरीचशी प्रश्नोत्तरे व ज्याला काथ्याकूट म्हटलं जातं तसा प्रत्येक सूत्राचा सामान्य भाषेत पंचनामा केलेला आहे. कुठेही हे लिहिलेलं आहे ते खरंच माना असा आग्रह नाही (असा आग्रह किंवा सक्ती भारतीय विचारपरंपरेत कधीच नव्हती असं दिसतं. चार्वाकाने वेदाला मानलं नाही तरीही त्याला तुरुंगात टाकलेलं किंवा सुळावर चढवलेलं किंवा मारुन टाकलेलं मी तरी वाचलेलं नाही. ती आपली पद्धत नाही, ती दुसऱ्या कोणाची तरी पद्धत आहे. असो.) थोडक्यात वैचारिक स्वातंत्र्य(freedom of expression) भारतीय परंपरेत होतं. ते युरोपातून आपण आयात केलेलं नाही. तर तेही असो.

दुसरा सांगायचा मुद्दा असा की यातील पृथ्वी (Earth), जल (Water), अग्नि (Fire/Energy), वायू ( Air) या विशेष द्रव्यांचा solid , liquid, energy, gas असा घ्यावा. या शिवाय आकाश(plasma), काल(time), दिक्(space), आत्मा(soul) व मन(mind) या द्रव्यांना महाभूते म्हटलेले असून निर्मितीची प्रक्रीयाही दिलेली आहे. या नऊ गोष्टींना हे तत्वज्ञान ‘द्रव्ये’ असे संबोधते. पदार्थ याचा अर्थ आपण घेतो तसा इंद्रियांना जाणवणारी वस्तू असा नसून ज्या कोणत्याही गोष्टीला आपण नावाने संबोधू शकतो(यात देवही आला..)अशा सर्वांनाच पदार्थ म्हटलेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर चहा हा पदार्थ घेतला(चहा घेतला असा नाही) तर तो जलरुप(Water) आहे, त्याने व्यापलेली जागा अमुक(space) आहे, तो कधी बनला(time) वगैरे. ही सारी द्रव्ये झाली.

वैशेषिकानुसार सुरुवातीलाच पदार्थांच्या व्यक्तिमत्त्वाचे दोन भाग मानले आहेत – एक ज्ञानेंद्रीयांना जाणवणारा(as perceived by sensory organs) आणि दुसरा बुद्धीला जाणवणारा(as understood by the intellect). ज्ञानेंद्रियांना जाणवणाऱ्या भागात  द्रव्य(substance), गुण(quality), कर्म(activity) हे येतात. म्हणजे तो पदार्थ कशाचा बनलाय? त्याचे गुण काय? त्याची हालचाल कशी होते? यांची उत्तरे शोधणे.

बुद्धीला पटणाऱ्या म्हणजेच विश्लेषणानंतर कळणाऱ्या भागात सामान्य(set), विशेष(individuality) आणि समवाय(inheritance) हे येतात. म्हणजे तो पदार्थ कुठल्या गटात समाविष्ट होतो? त्याचा सर्वात लहान कण किंवा एकक काय? त्याची उत्पत्ती कशापासून झाली? यांची उत्तरे शोधणे.

ही झाली विश्लेषणाची केवळ पहिली पायरी. यानंतर हे पुस्तक खाली दिलेल्या पदार्थाच्या सर्व अंगांना स्पर्श करते.

त्यानंतरच्या धड्यांमध्ये या द्रव्यांचे गुणधर्म, त्यांमध्ये असलेली साम्यस्थळे, भेदस्थळे तपशीलाने दिलेली आहेत. नंतरच्या धड्यात त्यांच्यात बलामुळे होणाऱ्या हालचाली(actions) दिलेल्या आहेत. त्यानंतरच्या धड्यांमध्ये सामान्य(sets or classification), विशेष(Individuality किंवा त्या पदार्थाचा मूलाणू) व समवाय(inheritance) यांची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. मुळात वैशेषिक या शब्दातील ‘विशेष’ याचा अर्थच त्या पदार्थाचा सर्वात लहान व विभागला न जाऊ शकणारा भाग असा आहे. बुद्धिवाद्यांनी हे ही अवश्य मुळातून वाचावं.

वरील चहाचंच उदाहरण पुढं न्यायचं झाल्यास, उकळताना त्यात उष्णतेमुळे कोणती हालचाल झाली(action) किंवा ओतताना कशी हालचाल झाली, शब्द हा आकाशाचा(plasma) गुण असल्याने चहा होताना आवाज कसा झाला? शिवाय चहा हा उष्णपेय या पेयांच्या classification मध्ये मोडतो. Iced Tea पेक्षा Hot Tea वेगळा कसा तर तिथे तेज (heat) मुळे स्पर्श (temperature) बदलतो. शिवाय चहाचा लहानात लहान भाग(विशेष किंवा individuality) कसा असतो? त्याचे मोजमाप कसे किती असते? तर ते त्रासरेणू किंवा colloidal particle असते. शिवाय चहा हा दूध, पाणी, चहापत्ती, साखर व गॅस यांच्या एकत्र प्रयोगातून होतो. शिवाय कोण्या माणसाला चहा पिल्याशिवाय जमतच नाही म्हणजेच तिथे त्याचं मन आलं. म्हणजेच चहाच्या उगमाशी (inheritance) वर दिलेले पदार्थ निगडित आहेत. वगैरे गोष्टींचा कूट आपण कपातला चहा थंड होईपर्यंत करु शकतो (युरोपातील शास्त्रज्ञांचे ही असे चहाचे अड्डे असंत असं म्हणतात..चहा किंवा दुसरे काय त्या पदार्थांविषयी या ठिकाणी न बोललेलंच बरं..)

सारांश स्वरूपात बोलायचं तर चहा या पदार्थाचे व्यक्तिमत्व वैशेषिकाच्या भाषेत खालीलप्रमाणे दाखवू शकतो.

 

पदार्थ
गरम चहा
द्रव्य(substance)
जल (liquid)
गुण(qualities)
रूप (color): तपकिरी
रस(taste): गोड
गंध(smell): चहासारखा, थोडा आल्याचा व तुळशीचा वास सुद्धा लागला होता.
स्पर्श(temperature): उष्ण
संख्या (quantity): १ कप
परिमाण (unit of measurement): कप
पृथकत्व(individuality): तुळस घातली होती
संयोग (conjunction): कपात ओतला
विभाग (disjunction): पातेल्यातून बाहेर काढला
गुरुत्व (heaviness or weight): १० ग्रॅम
द्रवत्व (fluidity): पातळ होता. ओतायला सोपा गेला
स्नेह (viscosity): चिकटपणा अजिबात नव्हता
धर्म (merit):  उच्च दर्जाचा आहे. तजेला देतो.
अधर्म(demerit): झोप उडवतो. अतिसेवन धोकादायक. भूक मरते.
कर्म(action)
अवक्षेपण: पातेल्यातून कपात ओतला, कपातून बशीत ओतला
सामान्य(classification)
मुख्यगट: पेय
उपगट: उष्णपेय
विशेष(individuality)
कलिलीकण(the colloidal particle of tea)
समवाय(inheritance)
साखर, दूध, पाणी, चहापत्ती, उष्णता यांपासून चहा बनतो

या विचारप्रणालीशी माझीही अजून तोंड ओळखच होते आहे. माझ्या आतापर्यंत शिकलेल्या तुलनेने आधुनिक संकल्पनांच्या आधारावरच मी या नव्याने कळलेल्या संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. शिवाय संस्कृतचे अज्ञान (शाळेत टि . म . वि . च्या ५ परीक्षा उत्तीर्ण होऊनही.. ) खूप आड येते. म्हणूनच मग इंग्रजी आणि हिंदी भाषांतराचा टेकू घ्यावा लागला . एवढे असूनही सुरुवातीलाच मला जाणवलेली वैशेषिकाची काही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे:

१. वैशेषिक विज्ञान तथाकथित जडवादी विज्ञान वाटत नाही. कारण यात मन , आत्मा यांचा विचार एक द्रव्य म्हणूनच केला आहे. आधुनिक भौतिक शास्त्र सुरुवातीला निश्चिततावादी (Deterministic approach) होतं. जसजसा पुंजवाद आला, जसं तरंग आणि मग mass -energy relation वगैरे आलं तसं मग संभाव्यतावादाकडे (Probabilistic approach) प्रवास झाला. पण वैशेषिकामध्ये सुरुवातीलाच व या पुस्तकानुसार २ऱ्या शतकात अजड वाद स्विकारला गेलाय. त्याची मुळे कणादांच्या सूत्रांमध्ये असणार. म्हणजे हा काळ आणखी आधी म्हणजे इसवीसन पूर्व काळात गेला. न्यूटन इत्यादींच्या म्हणण्यानुसर सर्व हालचाली या बाह्यबल वगैरेंशी संबंधित मानल्या जात होत्या. पण वैशेषिकात हालचाली मध्ये बाह्यबल हे कारण आहेच पण शिवाय मन आणि आत्मा सुद्धा आलाय.

याचं उदाहरण द्यायचं झालं तर मनुष्याने धनुष्याची दोरी ताणली व बाण लावलाय. वैशेषिकानुसार त्या मनुष्याचं मन त्याच्या ज्या बोटाने दोरी ताणली आहे तिथे आलंय. मन या द्रव्याचा हेतू हा गुणधर्म गणला गेलाय. आपल्या उदाहरणात त्या मनुष्याने बाण लावण्याच्या हेतूने दोरी ताणली आहे . मग पुढची पायरी म्हणजे माणसाचा हेतू बदलला. आता त्याला बाण मारायचा आहे. त्याने म्हणूनच ताणलेली दोरी सोडून दिली. त्यामुळे दोरीतल्या स्थितिस्थापकता गुणामुळे ती ताणलेली होती ती मोकळी झाली. त्यामुळे बाण सुटला.. वैशेषिकातील विचार पद्ध्तीचा हा अजूनेक नमुना झाला.

२. दुसरं म्हणजे वैशेषिकात सुरुवातीलाच हे नऊ वेगवेगळे अस्तित्व असणारी द्रव्ये मानल्यामुळे पुन्हा बघणारा कुठे आहे (observers frame of reference) ही गोष्ट वर पाहिलं तसं या विश्लेषणाचा भागच झाली. याबद्दल अधिकही लिहिता येईल. पण तूर्तास इथेच आवरत घेतो.

तर दोस्तांनो भारतीय संस्कृती ही केवळ आध्यात्मिकच आहे हे अज्ञान आता (तरी) स्वत:च्या मनातून काढून टाकूया. वर दिलेल्या चहाच्या उदाहरणातून वैशेषिकांच्या विचार पद्धतीची ओळख करुन देण्याचा यथाबुद्धी प्रयत्न केला. अधिक ज्ञानी लोकांना त्यात त्रुटी आढळल्यास त्या जरुर दाखवाव्यात. इथे केवळ काहीतरी नवीन माहिती रंजकपणे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न होता. तर आता तरी इतके दिवस विस्मृतीत धूळ खात पडलेल्या या जुन्याच पणत्या तर्कावर घासून पुन्हा लखलखीत करुया व त्यांद्वारे अज्ञानाच्या अंधकाराला मिटवूया. आधुनिक विचारधारेला या प्राचीन कोंदणात बसवूया. त्याज्य काहीच नाही या अज्ञानाच्या अंधकाराशिवाय..

तमसो मा ज्योतिर्गमय ‌|

मुख्य पान : विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्याजंगलात 
संदर्भ सूची (Bibliography)