Electromagnetism चा बहुमुखी  वैश्वानल  : बरसणारे इलेक्ट्रॉन्स, वेटोळे घालणारे चुंबकत्व, उधळणारे  फोटॉन्स,…,आणि फॅरेडेची अफाट बुद्धिमत्ता         

अशीच एक  पावसाळी, घोर अपरात्र वाटावी अशी अवसेची रात्र. दूर जिथे पाहावे तिथपर्यंत काळा कभिन्न अंधार पडलेला. आकाशात काळे ढग दाटून आल्याने रात्रीचा गडद पणा अधिकच वाढवलेला… क्षितीजाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत ढगांचा वेढा पडल्यावर, साऱ्या आसमंताला बंदिवासात टाकल्यावर, जेलरने गुरकावावे तसे ढगांचा गुरगुरणारा, डरकाळी फोडल्यासारखा आवाज सर्वांनाच एक धमकावणी वजा सूचना देऊन गेला. त्यापाठोपाठ पकडलेल्या कैद्यांच्या डोळ्यांसमोर अंधारीच आणण्यासाठी म्हणून कीं काय एक विजेचा मोठ्ठा सोटा दण्णकन सर्वांच्या डोळ्यांना अंधारी आणून निघून गेला.. डायरेक्ट फ्लडलाईटच डोळ्यात घातल्या सारखा.. आणि शेवटी सारी निश्चिती झाल्यावर, बंदी पुरता निष्क्रिय, निपचित आणि असाहाय्य आहे हे पटल्यावर त्याच्यावर लहान, मोठ्या थेंबांचा जबरदस्त वर्षाव जणू लाथा, बुक्क्या घालावेत तसा सुरु झाला..शेकडो, हजारो, लाखो, करोडो पावसाचे थेंब जमिनीच्या तुकड्या तुकड्याला अतिप्रचंड मार देत सुटले.   राजा विक्रम अशाच एका अट्टल कैद्यांना ठेवलेल्या कारागृहातून आल्यामुळे पावसाकडेही बघण्याचा त्याचा सौम्य दृष्टिकोन जाऊन आपण एका अशा अति भव्य जेल मध्ये आहोत आणि या सृष्टीला तो मुसळधार पाऊस मोठी शिक्षाच देत आहे कीं काय असे त्याला काही बाही वाटत होते.. वेताळाचे शव पाठीवर घेतले तरीही त्याच्या विचारांची बेडी  तुटतच नव्हती.. शेवटी वेताळच गुरगुरला..

” हें विक्रमा, किती हे अघोरी विचार घुमतायत तुझ्या डोक्यात.. तुम्हा राजे लोकांच्या डोक्यात कोणत्या वेळी काय चाललेले असेल हे दुसऱ्या कोणा माणसाला कळणे निव्वळ अशक्यच.. मी वेताळ तुझ्या मनावरच स्वार झालेला असल्याने मला कळते.. पण काय रे राजा असे पूर्ण वेढा घालून एखाद्याला सापळ्यात अडकवणे, पकडल्यावर त्याच्यावर हल्ला करणे आणि त्यात हाल झाल्याने त्या बंदीवानाने वेदनेने ओरडणे, त्याला भाजणे, अंगाची लाही लाही होणे  असे काही अघोरी प्रकार फक्त तुमच्या माणसांच्याच राज्यात चालत असतील ना? फिजिक्स मध्ये असे काही नसावे अशी मला आशा आहे..”

“वेताळा, म्हणशील तर हे अघोरी आहे, कैद्यांच्या बाबतीत नक्कीच हे कधीकधी जीवावरही बेतणारे आहे, पण अशाच प्रकारच्या क्रिया, अशाच प्रकारे एकाच ऊर्जेच्या वेगवेगळ्या परिणामांमुळे घडणारे वेगवेगळे परिणाम हे अंधाऱ्या गर्तेत चाचपडणाऱ्या या विश्वाला प्रकाश, ऊब आणि सरतेशेवटी सजीवत्व देणाऱ्याही  ठरतात. नव्हे, ह्याच प्रकारच्या क्रिया या विश्वत सर्वत्र सांचलेल्या, तरीही अनोळखी राहिलेल्या त्या वैश्वानलाची म्हणजेच प्रत्येक लहानमोठ्या वस्तूच्या अंतरंगात साचलेल्या आणि सदैव कार्यमग्न असलेल्या, अणु रेणूंना सतत हलवत ठेवणाऱ्या, त्यांच्यात सतत ढवळाढवळ करणाऱ्या या ऊर्जेच्या स्वरूपाची साक्ष देतात.. अणूंच्या आकारांतील अतिसूक्ष्म पिंडांपासून ब्रह्माण्डातील अजस्त्र, अगडबंब, हजारो सूर्यही गिळू शकतील अशा महाकाय ब्लॅक होल्स ना  सतत सक्रीय, हलतं ठेवण्याचं काम हा वैश्वानल करतो.. ब्रह्माण्डाला चालवणाऱ्या ऊर्जेचे दिसणारे, जाणवणारे, कळणारे, आपल्या विश्वात सतत सभोवती संचारणारे हे ऊर्जेचे रूप म्हणजेच फिजिक्स च्या भाषेत इलेक्ट्रोमॅग्नेटिझम..  १ डिग्री केल्विन किंवा -२७२ डिग्री सेल्सिअस च्या अतिशीत तापमानात ठेवलेल्या वस्तूंपासून ते १ कोटी अंश सेल्सिअस पर्यंत च्या अतितप्त ताऱ्यांपर्यंत सर्वच ठिकाणच्या पदार्थांमधून हा ऊर्जेचा प्रकार आणि त्याचे परिणाम आपल्याला जाणवत राहतात…निसर्गात जी  चार प्रमुख प्रकारची बळे आहेत four fundamental forces..त्यातला हा एक प्रकार, आपल्याला माहित असलेले बरेचसे ऊर्जेचे, तरंगाचे प्रकार हे याच electromagnetism ची देणगी ..        “

 

“ते ठीक आहे विक्रमा, अरे पण या सर्वसंचारी वैश्वानलाची किंवा फिजिक्स च्या भाषेत इलेकट्रोमॅग्नेटिझम ची ओळख पटली तरी कशी आणि कधी?”

“वेताळा फार आदिम काळापासून माणसाला त्याच्या मनात येणाऱ्या काही प्रश्नांनी कायम छळलेले होते.  म्हणजे दोन दगड एकमेकांवर घासल्यावर आग कशी तयार होते आणि प्रकाशही कसा बाहेर येतो? सूर्य आणि तारे यांना नक्की कशामुळे प्रकाश मिळतो? पावसाळ्याच्या अंधाऱ्या वातावरणात, कुट्ट काळोख पडलेला असताना अचानक एक`विजेचा महाकाय लोळ उंच आकाशापासून जमिनीपर्यंत लक्ख प्रकाश आणि बधीर करून टाकणारा आवाज घेऊन येतो, त्यात सापडणारी झाडे, पशु, पक्षी, माणसे, घरे अक्षरश: क्षणार्धात भस्मसात होऊन जातात हे कसे? त्या विजेचे बटन नक्की कोण दाबतो? मोठमोठ्या निर्मनुष्य वनांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे आगी कशा लागतात? त्यापासून ते अगदी निर्जीव चुंबकीय पट्टी जवळ लोखंडाचा चुरा टाकला तर त्या चुऱ्याचे असे पट्टे कसे तयार होतात? इथपर्यंत सारेच प्रश्न लोकांना पडत असत. त्यांची उत्तरे शोधण्याचे प्रयत्नही होत असत. अगदी पुरातन भारतीय ग्रंथांमध्येही यालाच सर्वच सृष्टी मध्ये, पिंडापासून ब्रह्माण्डपर्यंत सर्वत्र संचारणाऱ्या, सूक्ष्म आकारापासून भव्य आकारापर्यंत विविध आकार धारण करणाऱ्या वैश्वानलाचं म्हणजे अणुरेणूंना कार्यरत ठेवणाऱ्या, रंग, रूप देणाऱ्या सूक्ष्मरूपातील अग्नी पासून ते महाकाय जंगलांचा विनाश करणाऱ्या वणव्यांपर्यंत सर्वच ठिकाणी उपस्थित असणाऱ्या, सूक्ष्म आणि महाकाय आकारातील महाकाय आकारातील तेजाचं, तेज द्रव्याचं, अग्नीचं रूपक दिलं होतं. आधुनिक फिजिक्स च्या संदर्भात मात्र या इलेक्ट्रोमॅग्नेटिझम ची पहिली जाणीव तसा शिक्षणाने फिजिसिस्ट नसणाऱ्या फॅरेडेला १८३१च्या सुमारास झाली. आणि फॅरेडेच्या सिद्धांताची गणिती मांडणी जेम्स क्लार्क मॅक्सवेल याने १८६०च्या सुमारास केली. फॅरेडेलातर लोकांनी वेड्यात काढलं. त्याच्या शोधाची थट्टा झाली सुरुवातीला. पण तेच मान्य केल्यानं मानव जातीच्या हाती ह्या इलेक्ट्रो मॅग्नेटिझम च्या रूपाने मोठा खजिनाच लागला.. ”

faraday

source/copyright: interestingengineering (dot) com/michael-faraday-a-true-scientific-hero-behind-electromagnetism
“अरे खजिना वगैरे ठीक आहे.. पण फॅरेडे नक्की काय म्हणाला? त्याने काय प्रयोग केला आणि त्यातून काय सांगितलं? फॅरेडेला जाणवलेला इलेकट्रोमॅग्नेटिझम नक्की काय होता हे तरी सांगशील की नाही? नुसताच फाफटपसारा.. ”

“मला वाटतं वेताळा, हा अतिबुद्धिमान फॅरेडे फारसा आपल्याला कळलाच नाही, म्हणजे त्याची ग्रेटनेस समजलीच नाही.. फॅरेडेचं आपण घोकतो.. फॅरेडेचा इलेक्ट्रोमॅग्नेटीजम चा नियम..induced voltage in a circuit is proportional to the rate of change over time of the magnetic flux through that circuit.. म्हणजे साधारण १८३१ मध्ये त्याने सांगितलं की एका तांब्याच्या वायर मध्ये इलेक्ट्रिसिटी पास केली, बंद चालू, बंद चालू केली तर त्या वायर पासून जवळच असलेल्या, पण वायरला अजिबात स्पर्श न करणाऱ्या लोखंडामध्ये थोड्या काळाकरता चुंबकत्व निर्माण होते..पण हे असं बंद चालू बंद चालू करत राहिलं तरच..”

“अरे विक्रमा हे खूप वेळा झालंय ऐकून.. पण याचा अर्थ काय? उगीच कशाला कोण असं बंद चालू करत बसेल?”

“हीच तर खरी या नियमातली गम्मत आहे.. एक तांब्याची तार आहे तिच्यात वीज वाहतेय.. तिच्या पासून थोड्या अंतरावर लोखंडाची पट्टी आहे.. म्हणजे तसा काही स्पर्श नाही.. ना एक वायर ने दुसरीला ढकललं, ना ओढलं.. तरीपण हा परिणाम झाला कसा? बरं एकीत वीज वाहतेय आणि दुसऱ्यात चुंबकत्व किंवा magnetism आहे.. मग हे नक्की कसं होतंय? वायर मधून लोखंडात कुणी उडी मारतानाही दिसत नाहीये.. मग कोण करतं हा उद्योग? तर हा उद्योग चालतो या वायर मध्ये चाललेल्या वीजेमध्ये आणि त्या लोखंडात असलेल्या चुंबकत्वामध्ये..खरं तर या दोघांमध्ये असणाऱ्या इलेकट्रोन्स मध्ये.. ”

“पण नक्की कसा? ”

“सांगतो. हे बघ वीज वाहणे म्हणजे काय तर त्या वायर मध्ये जे असंख्य, अगणित, अतिशय लहान आकाराचे इलेक्ट्रॉन त्यांच्या प्रोटॉन्स भोवती पिंगा घालत, प्रदक्षिणा घालत फिरत असतात. आपल्या आपल्या घरी घरातल्या तुळशीला प्रदक्षिणा घालत फिरत असतात तसे . पण आषाढीची वारी आली की विठूभक्त वारकरी कसे जिथून, तिथून निघून पाढंरीच्या दिशेने चालू लागतात तसे हे इलेकट्रोन्स आपल्या जवळच्या प्रोटॉन्स ला सोडून वायरचे धन टोक जिकडे आहे तिकडे जाऊ लागतात. वायरमध्ये वाहणारी वीज म्हणजे अशा लाखो, करोडो, अब्जावधी इलेकट्रॉन्स ची वारीच. अगदी एका क्षणाच्याही १,०००,००० व्या भागात पूर्ण होणारी..आता या वायर मध्ये जेव्हा हि इलेकट्रोन्स ची वारी चालू होते तसं तिथून जवळच असलेल्या लोखंडाच्या तुकड्यात सुद्धा लोखंडाचे हजारो, लाखो, करोडो, अब्जावधी प्रोटॉन्स आणि त्यांच्याभोवती प्रदक्षिणा घालणारे इलेकट्रोन्स असतातच. जेव्हा तांब्याच्या तारेतले इलेकट्रोन्स वारीला जातात, एक दिशा मिळते तशी या विजेची खबर जवळच्या लोखंडाच्या तुकड्यातल्या इलेक्ट्रॉन्स ना लागते. इथून तिथून सारे इलेकट्रॉन्सच ते. पण लोखंडाच्या तुकड्यातले इलेकट्रॉन्स हे तांब्याच्या तुकड्यातल्या इलेकट्रॉन्स पेक्षा वेगळे असतात. तांब्याच्या तारेत हे इलेकट्रोन्स वीज मिळाली की पळायला लागतात. पण लोखंडातले इलेकट्रोन्स मात्र एका दिशेमध्ये स्वतः भोवती  फिरू लागतात.  म्हणजे शेजारच्या तांब्याच्या तारेतली वीज डावीकडून उजवीकडे जात असेल किंवा त्या तांब्यातले इलेकट्रोन्स उजवीकडून डावीकडे जात असतील तर ते इलेकट्रोन्स जणू लोखंडातल्या इलेकट्रोन्स ना हाक मारून किंवा खूण करून जातात, चला खेळायला अशी मुले जसे खुणेनेच एकमेकाला सांगतात आणि बोलावतात, तसे तांब्याचे इलेकट्रोन्स लोखंडाच्या इलेक्ट्रॉन्स ना खेळायला बोलावतात. पण लोखंडाचे इलेक्ट्रॉन्स पक्के बांधलेले असतात. सारे स्वतः भोवती फिरत असतात.”

“”फिरत असतात? कसे ते आरतीच्या मध्ये ‘घालीन लोटांगण वंदीन चरण’ म्हणताना सगळे स्वतः भोवती फिरतात, प्रदक्षिणा करतात तसे?”

“अगदी बरोबर, तस्सेच. या फिरण्यामुळेच(electron spin) प्रत्येक इलेक्ट्रॉन्स त्याच्या प्रोटॉन भोवती चुंबकीय क्षेत्र(magnetic field) तयार करतो. पण सर्व इलेकट्रोन्स ची फिरायची दिशा वेगवेगळी असते. याचे तोंड इकडे तर त्याचे तिकडे. त्यामुळे या इलेक्ट्रॉन च्या magnetism ला त्याच्या शेजारच्या इलेक्ट्रॉन चा magnetism संपवतो. त्यामुळे लोखंडात इतर वेळी चुंबकत्व शिल्लक राहत नाही. पण शेजारच्या तांब्याच्या तारेत  वीज जशी डावीकडून उजवीकडे जाऊ लागते, तसे लोखंडाचे इलेकट्रोन्स जणू उजवीकडे डोकं आणि डावीकडे पाय असे आडवे असतात असं समजू . एकूण एक लोखंडाचा इलेक्ट्रॉन असा डोकं उजवीकडे आणि पाय डावीकडे असा आडवा असतो तो स्वतः च्या डाव्या बाजूने स्वतः भोवती प्रदक्षिणा करू लागतो. लोखंडाचे सारे इलेकट्रोन्स फक्त स्वतः भोवती एका दिशेत प्रदक्षिणा करू लागतात.  या प्रकारामुळे लोखंडात दोन भाग किंवा दोन टोके तयार होतात. अर्थात इलेकट्रोन्स काही लोखंडाबाहेर उडी मारत नाहीत पण त्यांच्या या एकाच दिशेत फिरण्यामुळे प्रदक्षिणा सुरु करण्याचा भाग उत्तर टोक (Magnetic North Pole) आणि प्रदक्षिणा संपण्याचा भाग दक्षिण टोक (Magnetic South Pole) असे दोन भाग तयार होतात. दोन्ही कडचे इलेक्ट्रॉन्स असे संधान बांधतात आणि दोन वेगवेगळे परिणाम घडवतात. ”

“दोन्ही कडे इलेकट्रोन्स आहेत म्हणतोस तर मग तांब्यात चुंबकत्व का तयार होत नाही आणि लोखंडात वीज का वाहू लागत नाही?”

“खूपच छान प्रश्न वेताळा. पण लोखंडातही वीज वाहते. तांब्यात असणारे इलेक्ट्रॉन्स हे लोखंडाच्या इलेक्ट्रॉन्स पेक्षा मोकळे असतात, सैल असतात. जरा वीज मिळाली की निघाले भटकायला. पण लोखंडातले इलेक्ट्रॉन्स पक्के बांधलेले असतात. त्यामुळे ते फक्त स्वतः भोवती फिरत राहतात. पण हे खरे की तांब्यात अगदी क्षीण असं चुंबकत्व असते, फारच क्षीण. कारण लोखंडातले इलेक्ट्रॉन्स जसे शिस्तीने एक दिशेत स्वतः भोवती फिरतात, तसे तांब्यातले इलेक्ट्रॉन्स करत नाहीत. तांब्याच्या एका  इलेक्ट्रॉन मुळे तयार झालेल्या चुंबकीय क्षेत्राला  दुसऱ्या इलेक्ट्रॉन् मुळे तयार झालेले चुंबकीय क्षेत्र नष्ट करते. बरेचसे इलेक्ट्रॉन सैलसर सुटून धावत असतात एका टोकाकडून दुसरीकडे. त्यामुळे तांब्यातले चुंबकत्व अगदीच क्षुल्लक, क्षीण असते. आता दुसरे म्हणजे असे जवळच्या लोखंडात जेव्हा चुंबकत्व संचारते तेव्हा ते अगदी क्षणिकच असते. पण तेवढ्यातही जर मोठा प्रवाह वाहिला आणि धरणाऱ्या माणसाने सुरक्षेची काळजी घेतली नसेल तर हे चुंबक इलेक्ट्रिक शॉक सुद्धा देऊ शकते. ”

“पण विक्रमा हे इतके क्षणिक का असते?”

“क्षण म्हणजे सेकंड असेल तर ते सेकंदाच्याही १०,००,०००व्या भागापर्यंतच किंवा त्याहीपेक्षा कमी  टिकते. जसे तांब्याच्या तारेत वीज प्रवाह पूर्ण होतो, ती वीज वाहायला, सर्किट पूर्ण करायला जितका वेळ लागतो तेवढ्या वेळात लोखंडाचे इलेकट्रोन्स स्वतः भोवती प्रदक्षिणा करतात. थोडक्यांत तांब्याच्या तारेत एका रेषेत इलेकट्रॉन ढकलले गेले तर त्यामुळे लोखंडातले इलेक्ट्रॉन्स त्यांच्या स्वतः भोवती फिरवले जातात. जसे हे लाखो करोडो इलेक्ट्रॉन स्वतः;भोवती प्रदक्षिणा करत फिरतात तसा पूर्ण लोखंडाच्या तुकड्यात त्या फिरण्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. फिरणं संपलं की मॅग्नेटिझम फिनिश. मग तांब्याच्या तारेतली वीज बंद केली. तर पुन्हा इलेकट्रोन्स उलट्या दिशेत पण कमी जोराने ढकलले जाते. या ढकलल्या मुळे लोखंडातले इलेकट्रोन्स सुद्धा उलट्या बाजूने ढकलले जातात. पण यावेळेस आधी जिथे north होतं तिथे south येते आणि आधी जिथे south होती तिथे north येते. थोडक्यात फिरणं जिकडे सुरु होते ती north आणि संपते तिथे south होते… ”

“म्हणजे तुला असं म्हणायचंय की मॅग्नेटिजम जेव्हा संचारतो तेव्हा लोखंड असं खरंच ढकललं जातं? एका वायर मध्ये सरळ जाणारे इलेकट्रोन्स शेजारच्या लोखंडाच्या तारेला असे स्वतः भोवती फिरवतात, खरं खरं अक्षरश: ढकलतात? ”

“हो वेताळा, या फिरण्याचं, स्वतः भोवती फिरण्यातनंच जो परिणाम तयार होतो त्याला मॅग्नेटिझम म्हणतात. लोखंडाच्या लक्षावधी अणुरेणूंमधील प्रत्येक इलेक्ट्रॉन च्या एका दिशेत फिरण्यामुळेच हा मॅग्नेटीजम चा परिणाम तयार होतो. हा परिणाम त्या चुंबकापासून जितक्या अंतरावर जाणवत राहतो ते अंतर किंवा ते क्षेत्र म्हणजे चुंबकीय क्षेत्र किंवा magnetic field. लोखंडाच्या जवळ हे magnetic field ताकदवान असतं, लांब जावं तसं क्षीण होत जातं. यालाही तो inverse square law लागू होतो. दुसरा अर्थ असा की इलेकट्रोन्स चं फिरणं संपलं की मॅग्नेटीजम संपलं.. आणि ज्या अल्पकाळात हे सगळं घडतं त्यातून लक्षात आले की वीज आणि चुंबकीय क्षेत्र तर एका माळेचे मणी आहेतच.. पण ज्या अत्यल्प काळात ही वीज प्रवास पूर्ण करते, तो अतिभयंकर वेग दुसरा, तिसरा कशाचाही नसून प्रकाशाचा म्हणजे फोटॉन्स चा वेग असतो.. म्हणजे तांब्याच्या तारेतल्या इलेकट्रोन्स ला पळायला लावणारी वीज electricity, लोखंडाच्या इलेकट्रॉन्स ना स्वतः भोवती घुमवणारे चुंबकीय क्षेत्र magnetism आणि या इलेकट्रोन्स ने बाहेर टाकलेल्या लक्षावधी, अब्जावधी फोटॉन्स photons पासून तयार झालेला  प्रकाश हे सर्व परिणाम घडवणारी एकच ऊर्जा आहे किंवा ऊर्जेचे कूळ आहे ज्याचे नाव electromagnetism. तो electromagnetism विश्वात पिंडापासून ब्रह्माण्डापर्यंत सर्वत्र, सूक्ष्मरूपा पासून विराटरूपा पर्यंत परिणाम घडवत राहत असतो, तोच तो वैश्वानल.. विश्वात सर्वत्र असणारा ubiquitous असा वैश्विक स्वरूपाचा अग्नी..वैशेषिकात कणाद ऋषींनी या अग्नी तत्वाला एक द्रव्य म्हटलंय, प्रशस्तपादांनी तेच सोपं करून लिहिलंय.. वीज electricity, चुंबकत्व magnetism, प्रकाश photons हे या सूक्ष्म स्तरावर कार्यरत असणाऱ्या अग्नीने इलेकट्रॉन्स वर परिणाम करून दाखवलेले वेगवेगळे परिणाम.. फॅरेडेचं आणि त्याला गणितात मदत करणाऱ्या मॅक्सवेल चं मोठेपण हे की या तिन्ही परिंणामांचं मूळ एकच हे त्यांना प्रथम कळलं, या तिघातलं अद्वैत त्यांना प्रथम समजलं,  आणि त्यांनी ते सिद्धही केलं..पुढे पुढे तर या electromagnetism मध्ये अगदी आवाज sound, उष्णता heat, रंग colors, किरणोत्सारातून बाहेर पडणारे अल्फा, बीटा, गॅमा हे सारेच किरण किंवा तरंग  येतात हे निश्चित झालं..  आणि या मॅक्सवेल नेच तो या प्रवाहाची दिशा लक्षात घेण्याचा ठोकताळा thumb rule दिला.. ”

“आता हे काय?”

“हा एक ठोकताळा आहे.. वीज डावीकडून उजवीकडे वीज वाहते आहे तर समजा तिच्या भोवती, शॉक न लागेल असा उजव्या हाताचा पंजा गुंडाळला.. उजव्या हाताचा अंगठा प्रवाहाच्या दिशेत म्हणजे उजवीकडे ठेवला तर बोटे जशी लपेटलेली आहेत ती दिशा चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवते. अंगठा उजवीकडे असताना बोटे ही वायरला डावीकडून उजवीकडे अशी गोलाकार लपेटली गेली म्हणजे आपल्या भाषेत clock wise दिशेत चुंबकीय क्षेत्र आहे.. म्हणजे north pole वायर पलीकडे, बोटे जिथून सुरु होतात तिथे  आणि south pole जिथे बोटांची नखे आहेत तिथे आहे.. दिशा बदलली.. वीज उजवीकडून डावीकडे वाहू लागली की मग उजव्या हाताचा अंगठा डावीकडे आडवा केला त्यामुळे मग बोटांची मुळे आपल्या कडून सुरू होऊन वायर पलीकडे जाऊन गुंडाळू लागली.. म्हणजे चुंबकीय क्षेत्र उजवीकडून सुरु होऊन चक्राकार दिशेत डावीकडे जाऊं लागलं.. थोडक्यात आजकालच्या भाषेत anti-clock wise दिशा..”

“ओहो म्हणजे डावीकडून उजवीकडे वीज गेली की सारे लोखंडाचे इलेक्ट्रॉन स्वतः भोवती डावीकडून उजवीकडे  प्रदक्षिणा करणार clock wise फिरणार आणि वीज उजवीकडून डावीकडे गेली इलेक्ट्रॉन स्वतः भोवती उजवीकडून डावीकडे anti-clock wise फिरणार.. पण एक प्रश्न राहतोच की या इलेकट्रोन्स ना ढकलतं कोण? ”
“अरे हे कळणं म्हणजेच फॅरेडे किती अफाट बद्धिमत्ता असलेला होता त्याची कल्पना येणं.. जेव्हा एका तांब्याच्या तारेला copper wire एका ठिकाणी बॅटरीचं धन टोक positive आणि दुसरीकडे ऋण टोक negative लावलं जातं लावलं जातं तेव्हा संथ साचलेल्या पाण्यात एक उंच धबधब्याचा लोट जोरात पडू लागला तर साचलेल्या पाण्यातही प्रवाह तयार होतो तसा विजेचा प्रवाह तयार होतो.. खरं तर इलेकट्रोन्स चा प्रवाह negative कडून positive कडे वाहू लागतो..या ढकलणाऱ्या बळाला विद्युतदाब voltage असं म्हणतात.. हे वोल्टेज इलेकट्रोन्स ना ऋण कडून धन कडे जोरात ढकलू लागते.. मंदिराच्या दर्शन बारीत पोलीस येऊन कसे चला चला डोकं टिकवून पुढे चला म्हणायला लागतात, घुटमळत बसणाऱ्या भाविकांना दर्शन घेऊन लगेच बाहेर करतात तसं काम हे वोल्टेज करतं.. साध्या भाषेत इलेकट्रोन्स ना कामाला लावतं, धक्क्याला लावतं. घाटाच्या तळापासून इंजिन मागून धक्का देऊन रेल्वेला जसं ढकलतं तसं हे बळ इलेकट्रोन्स ना जोरात ढकलतं.  बळाच्या भाषेत याला विजेचं बळ किंवा electromotive force असं म्हणतात. हेच बळ शेजारच्या लोखंडातल्या इलेकट्रॉन्सना सुद्धा कामाला लावतं आणि तिथे चुंबकीय बळाच्या, चुंबकीय धक्क्याच्या magneto-motive force स्वरूपात तिथल्या इलेक्ट्रॉन्स ना स्वतः भोवती फिरायला लावतं.. ही दोन्ही बळे एकाच electromagnetism मधून निघतात हे फॅरेडेला कळलं म्हणून फॅरेडे ग्रेट.. ”

“होरे खरंय तुझं. फॅरेडे म्हणजे केवळ तांब्यात करंट सोडला की शेजारील लोखंडात चुंबकत्व येतं आणि ते कुठून कुठे जातंय हे पाहायचं तर त्या वायरला असा हात कल्पनेतच गुंडाळायचा म्हणजे करंट कुठे आणि मॅग्नेटीजम कुठे हे शोधत बसायचं. फ्लेमिंग ने तीच गुंडाळलेली बोटे सरळ केली आणि तीन दिशा वगैरे दाखवल्या. अशा रीतीने हा फॅरेडे या उजवा हात गुंडाळणे, करंट इकडे जातोय का तिकडे जातोय हे पाहणे या कसरतीपुरताच कळला. पण काय रे विक्रमा या करंट बद्दल किंवा विजेबद्दल तू कधीच काही सांगितलं नाहीस.. स्थिर वीज Direct Current आणि बदलणारी वीज Alternating Current ही नक्की काय भानगड आहे? धबधब्यावरून टर्बाईन वर पाणी पडतं त्यातून वीज तयार होते आणि या फॅरेडेच्या नियमात काही संबंध आहे का? असलं काहीतरी कामाचं सांगायचं सोडून हात असा गुंडाळायचा, अंगठा इकडे करायचा असलं काहीतरी सांगत बसलास, मला गुंडाळायचा प्रयत्न करू नकोस मी नाही फसणार.. मी वेताळ कायमच तुमच्या असल्या नियमापासून अलगद सुटणार.. हे बघ आताही सुटतो.. तो AC DC चा अभ्यास करून ये पुन्हा येताना.. हा मी चाललो, नष्ट झालो हा∫ हा∫∫ हा∫∫∫”

(क्रमश:)